10 May, 2024

शेतकऱ्यांना दर्जेदार कृषि निविष्ठांचा पुरवठा करण्याचे निर्देश

हिंगोली (जिमाका), दि. 10 : हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 मध्ये दर्जेदार, गुणवत्तापूर्ण, आवश्यक त्या प्रमाणात, एमआरपी दराने व वेळीच कृषि निविष्ठांचा पुरवठा करण्याचे निर्देश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी आज येथे दिले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित कृषि निविष्ठा उत्पादक कंपन्यांचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, घाऊक विक्रेते, वितरकांचा समन्वय साधण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी श्री. कदम बोलत होते. या बैठकीला उपविभागीय कृषि अधिकारी, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी, सर्व तालुका कृषि अधिकारी, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक, मोहिम अधिकारी आणि सर्व पंचायत समितीचे गुण नियंत्रण निरीक्षक तथा कृषि अधिकारी उपस्थित होते. कृषि निविष्ठेचा व्यवसाय हा कायद्याने निश्चित करुन दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार करावा. कायदेशीर तरतुदीचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कृषि निविष्ठा उत्पादक कंपनीचे कृषि निविष्ठांचे घाऊक विक्रेते, वितरक यांच्याकडे ते व्यवसाय करीत असलेल्या उत्पादक कंपनीचे बियाणे, खते, किटकनाशके इत्यादी कृषि निविष्ठांच्या उत्पादनांच्या उगम प्रमाणपत्रांचा त्यांच्या परवान्यामध्ये कायद्याने समावेश आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांची विशिष्ट वाणाची मागणी असलेल्या कापूस बियाणांची विक्री कृषि विभागाच्या निगराणीखाली करण्यात येणार असून शेतकऱ्यांना जादा दराने कापूस बियाणांची विक्री केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. कदम यांनी दिल्या. या व्यतिरिक्त रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी हिंगोली जिल्ह्यास मंजूर आराखड्याप्रमाणे रासायनिक खतांचा पुरवठा करावा. रासायनिक खतांचा पुरवठा करतांना जिल्ह्यातील पाचही तालुक्यामध्ये आवश्यकतेनुसार समतोल राखावा. रासायनिक खतांसोबत इतर अनावश्यक उत्पादनांची रासायनिक खते उत्पादक कंपन्यांनी घाऊक विक्रेत्यांना, त्यांनी किरकोळ विक्रेत्यांना आणि किरकोळ विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना खरेदीसाठी सक्ती करु नये, अशा सूचना दिल्या. किटकनाशके हाताळणी करताना विषबाधा होऊ नये याबाबत क्षेत्रीय स्तरावर शेतकरी मेळावे आयोजित करुन शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे. किटकनाशके उत्पादक कंपन्यांनी किटकनाशके विक्रेत्यांच्या दुकानात लिफलेट, पाँम्पलेट, पोस्टर, बॅनर, ऑडिओ-व्हिडिओ जाहिराती इत्यादी प्रसार माध्यमांचा वापर करुन जनजागृती करावी. तसेच किटकनाशके उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांना सेफ्टी किटचे विनामूल्य वाटप करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. किरकोळ विक्रेत्यांना देखील याबाबत प्रशिक्षण देण्यासाठी दि. 13 मे रोजी सकाळी 11 वाजता औंढा नागनाथ येथे, दुपारी 3 वाजता वसमत, दि. 16 मे रोजी सकाळी 11 वाजता कळमनुरी येथे व दि. 17 मे रोजी सकाळी 11 वाजता सेनगाव येथे, दुपारी 3 वाजता हिंगोली येथे तालुकानिहाय बैठकांचे आयोजन करण्याच्या सूचनाही जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी दिल्या आहेत. ******

No comments: