01 May, 2024
हिंगोली येथे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
जिल्ह्याची चौफेर प्रगती करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करु या
- पालकमंत्री अब्दुल सत्तार
• महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या जनतेला शुभेच्छा
हिंगोली (जिमाका), दि. 01 : विकासाकडे झेपावणारा आपला हिंगोली जिल्हा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करीत आहे. जिल्ह्याची चौफेर प्रगती व्हावी यासाठी जागरुक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करु या, असे प्रतिपादन राज्याचे अल्पसंख्याक विकास, औकाफ व पणन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
येथील संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, राज्य राखीव पोलीस बलाच्या समादेशक पोर्णिमा गायकवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, गणेश वाघ, यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. अब्दुल सत्तार म्हणाले, महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी योगदान व बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात, महान विभूतींना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. 1 मे, 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तेंव्हा पासूनच राज्याने सर्वच क्षेत्रामध्ये विकासाची मोठी भरारी घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, साहित्य-संस्कृती या क्षेत्रातही अभूतपूर्व प्रगती करीत देशाच्या विकासामध्ये नेहमीच सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यामुळेच आज आपले राज्य देशातील अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. आज आपण आंतरराष्ट्रीय कामगार दिन ही साजरा करीत असून, देशाला प्रगतीपथावर आणण्यामध्ये कामगार बांधवांचा महत्वाचा वाटा आहे.
सध्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा आपला हिंगोली जिल्हा दिनांक 1 मे, 1999 रोजी निर्माण झाला. आज आपल्या जिल्ह्याच्या स्थापनेचा देखील वर्धापन दिन आहे. विकासाकडे झेपावणारा आपला हिंगोली जिल्हा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करीत आहे, असे सांगून महाराष्ट्र राज्याचा 64 वा वर्धापन दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त आज येथे जमलेल्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, खासदार-आमदार, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, कामगार बंधू, विद्यार्थी, आणि पत्रकार यांना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पंडीत अवचार यांनी केले. यावेळी पोलीस, राज्य राखीव दल, होमगार्ड पथक तसेच बँक पथकाने परेडचे शानदार संचालन केले. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नितीन तडस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मुणगल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलास शेळके, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ.राजेंद्र कदम यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment