जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया कलम 144
लागू
· 31 जुलैपर्यंत राहणार ताळेबंदी
हिंगोली,दि.1: कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक
उपाययोजनेच्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील संपूर्ण हद्दीमध्ये 1 ते 31 जुलै
2020 रोजी मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3)अन्वये
जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आदेश निर्गमीत केला आहे. याअनुषंगाने
यापुर्वी निर्गमीत केलेले आदेश जशास तसे लागू राहणार आहे.
राज्य शासनाचे आदेश 29 जून 2020 नुसार राज्यात नियम व
अटीच्या अधिन ताळेबंदीचा कालावधी 31 जुलै, 2020 पर्यंत वाढून मार्गदर्शन सुचना,
निर्देश निर्गमित केले आहेत. त्याअनुषंगाने आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व
अधिकाऱ्यांनी नियमांची काटेकोरपणे, नियमाला धरुन व मानवी दृष्टिकोनातून अंमलजबावणी
करावी. संबंधित सर्व यंत्रणांनी अत्यावश्यक साधने, सुविधांची
साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करावी. या आदेशाची अंमलबजावणी
करीत असतांना सद्हेतूने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व
कर्मचाऱ्यांविरुद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार
नाही.
तसेच सदर कालावधीत जिल्ह्यात सांस्कृतिक सभा, आंदोलने,
निदर्शने, धरणे, कार्यक्रम, सण उत्सव उरुस, जत्रा, मनोरंजनाचे कार्यक्रम क्रिडा व
इतर सर्व स्पर्धा, खाजगी व सार्वजनिक ठिकाणी कार्यशाळा, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग,
बैठक, मिरवणूक, देशातंर्गत व परदेशी सहली, खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाच
पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे सर्व उपहार गृहे, खाद्यगृहे, खानावळ, मॉल्स,
मनोरंजनाची ठिकाणे, क्लब, पब, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, शाळा,
महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा, संग्रहालये तसेच सर्व
प्रार्थनास्थळे जसे की (मंदीर, मस्जीद, चर्च, गुरुद्वारा, बौध्द विहार इत्यादी)
जनतेसाठी बंद राहतील. तसेच सर्व नागरिकांना अनावश्यकरित्या सार्वजनिक ठिकाणी विहित
कारणाशिवाय संचार करण्यास मनाई करण्यात येत आहे.
तसेच हे आदेश शासकीय, निमशासकीय कार्यालये, सरकारी
महामंडळाचे उपक्रम, आस्थापना, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, सर्व शासकीय, खाजगी
रुग्णालय, पॅथोलॉजी लॅबोरेटरी, सर्व प्रकारचे वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग
कॉलेज, रेल्वेस्टेशन, एस.टी. स्टँड, बँक, पेट्रोल पंप, अंत्यविधी (कमाल 10
व्यक्तींपुरती मर्यादित), औषधालये, उपहारगृहांनी योग्य ती सर्व खबरदारी घेऊन खाद्यपदार्थ बनविणे, पार्सल स्वरुपात काऊंटर
तसेच इतर मार्गानी विक्री करण्यास परवानगी राहील. तसेच सर्व हॉटेल, लॉज यांना तेथे
वास्तव्यास असणाऱ्या ग्राहकांना आरोग्य विषयक आवश्यक ती खबरदारी घेऊन
रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ बनवून देण्यास परवानगी राहील. ज्या आस्थापना (माहिती व
तंत्रज्ञान उद्योग) ज्याच्याकडे देश व परदेशातील अतिमहत्वाच्या उपक्रमाची जबाबदारी
आहे. सदर आस्थापना बंद राहिल्याने अशा उपक्रमांच्या प्रक्रीयेला बाधा येऊ शकते
असे सर्व संबंधित उपक्रम कार्यान्वित राहू
शकतील. प्रसारमाध्यमांचे कार्यालय, घरपोच देणाऱ्या सेवा उदा. ॲमेझॉन, फ्लीपकार्ट
इत्यादी सुरु राहतील.
आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा
समुहे हे साथरोग प्रतिबंध कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अणि भारतीय
दंड संहितेचे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येवून
संबंधीतावर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी
यांनी नमूद केले आहे.
****
No comments:
Post a Comment