हिंगोली,दि.15: येणाऱ्या कालावधीत कोवीड-19 प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील खाजगी
रुग्णालयामध्ये देखील रुग्णांना उपचाराकरीता भरती करावे लागणार असून या आजारामध्ये
रुग्णाला ऑक्सिजन मिळणे खुप महत्वाचे आहे. त्याकरीता खाजगी रुग्णालयातील सर्व
खाटांना ऑक्सिजन लाईनची सुविधा तयार करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश
जयवंशी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सभागृहात जिल्हा प्रशासन आणि खाजगी डॉक्टर
यांच्या कोवीड-19 उपाययोजनाबाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी जयवंशी हे बोलत
होते. यावेळी पोलीस अधिक्षक योगेश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी
उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशार श्रीवास,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम
आणि जिल्हा इंडियन मेडीकल असोसिएशनचे प्रतिनीधी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले की, हिंगोली जिल्ह्यातील कोरोना
रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी, येणाऱ्या कालावधीत कोरोनाचे संकट वाढण्याचे
संकेत जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहेत. यामुळे रुग्णाची संख्या वाढण्याची शक्यता
लक्षात घेवून जिल्हा प्रशासनामार्फत आतापासूनच नियोजन करण्यातयेत आहे. जिल्ह्यातील
शासकीय रुग्णालयातील खाटांची संख्या मर्यादीत असल्याने आणि रुग्णाची संख्या
वाढल्यास खाजगी रुग्णालयातील खाटांची आवश्यकता भासणार आहे. याकरीता जिल्ह्यातील
खाजगी रुग्णालयांतील सर्व खाटांना ऑक्सिजन लाईनने जोडावे. तसेच आपल्या रुग्णालयात
किती खाटा आहेत त्यापैकी किती खाटांवर रुग्ण भरती आहे आणि किती खाटां रिक्त आहेत
याची माहिती रुग्णालयाबाहेर लावावी. तसेच कोवीड रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता
अतिमहत्वाची असल्याने रुग्ण रुग्णालयात दाखल होताच त्यास ऑक्सिजन मिळावा याकरीता
प्राथमिक उपचार कक्षात ऑक्सिजनची सुविधा असलेली 3 ते 4 खाटांची आवश्यक आहे. तसेच
रुग्णालयात जेवढ्या सुविधा देणे शक्य आहे तेवढ्या देण्याचा प्रयत्न करावा. जिल्हा
प्रशासन आणि जिल्ह्यातील खाजगी तज्ज्ञ डॉक्टरांचा ग्रुप तयार करून वेळोवेळी माहिती
व सूचनांचे अदान-प्रदान करावे. तसेच खाजगी रुग्णालयात मधुमेह, रक्तदाब, हृद्यविकार
(को-मॉर्बीड) आदी व्याधी असणाऱ्या व्यक्तींची माहिती आहे. ती जिल्हा रुग्णालयाकडे
सादर करावी. तसेच संशयीत रुग्ण तपासणीकरीता आल्यास त्या रुग्णांची माहिती शासकीय
आणि खाजगी डॉक्टरांना द्यावी.
जिल्ह्यातील जो भाग क्वारंटाईन करण्यात येईल त्याठिकाणी फिव्हर
क्लिनिक सुरु करुन तपासणी करण्यात यावी. तसेच हिंगाली शहरातील कल्याण मंडपम येथे
देखील फिव्हर क्लिनिक सुरु करुन तपासणी करण्यात यावी, याकरीता खाजगी डॉक्टरांची
सेवा घेण्यात यावी असेही जयवंशी यावेळी म्हणाले.
जिल्हा इंडियन मेडीकल असोसिएशनच्या प्रतिनीधीनी यावेळी
सर्वोत्तोपरी मदत करण्यात येईल असे सांगुन कोवीड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुचना
मांडल्या. तसेच आयुर्वेदीक, होमीओपॅथीक, युनानी, फार्मसी, लॅबोरेटरी असोसिएशनची
देखील याकरीता मदत घेता येईल असे सांगितले. तसेच दैनंदिन व्यवहार करतांना रुपयांची
होणारी देवाण-घेवाण आणि बाहेर शौचास जाणाऱ्यामुळे कोवीड-19 चा प्रादूर्भाव अधिक
वाढण्याची शक्यता असल्याने याबाबत उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच
उपचार करण्याकरीता लागणाऱ्या औषधीचा साठा देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक
असल्याचे सांगुन रुग्ण तपासणीचे काम देखील करण्यात येईल असे आश्वासन जिल्हा इंडियन
मेडीकल असोसिएशनच्या प्रतिनीधीनी यावेळी दिले.
****
No comments:
Post a Comment