13 July, 2020

कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेवून योग्य नियोजन करा - विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर







कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेवून योग्य नियोजन करा   

- विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर


हिंगोली,दि.13: दिवसेंदिवस कोरेानाचा प्रादुर्भाव वाढत असून, येणाऱ्या कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची शक्यता लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी राधा बिनोद शर्मा, पोलीस अधिक्षक योगेश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उप विभागीय अधिकारी अतुल चोरमारे आणि जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धन्वंतकुमार माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी श्री. केंद्रेकर म्हणाले की, मराठवाड्यातील इतर जिल्ह्यापेक्षा हिंगोली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी, येणाऱ्या कालावधीत कोरोनाचे संकट वाढण्याचे संकेत असल्याने रुग्णाची संख्या देखील वाढण्याची शक्यता लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने आतापासूनच नियोजन करावे. याकरीता खाटांची संख्या वाढण्याची आवश्‍यकता आहे. याकरीता जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांची माहिती तयार करुन तेथील खाटांची उपलब्धतेची माहिती तयार करावी. तसेच पाणी, वीज आणि स्वच्छता गृहाची उपलब्धता आहे अशा वापरात नसलेल्या इमारतीची पाहणी करुन ठेवावी. जिल्ह्यातील तसेच कोरोना बाधीत रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता अतिमहत्वाची असल्याने रुग्ण रुग्णालयात दाखल होताच त्यास ऑक्सिजन मिळावा याकरीता प्राथमिक उपचार कक्षात ऑक्सिजनची सुविधेसह 3 ते 4 खाटांची सुविधा असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयातील सर्व खाटांवर ऑक्सिजनची सुविधा करुन घ्यावी. तसेच जिल्ह्यातील डेडीकेटेड कोवीड हॉस्पिटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर आणि कोवीड केअर सेंटर या ठिकाणी देखील ऑक्सिजनच्या सुविधेसह खाटांचे नियोजन करावे. रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन तयार करण्याचा प्लान्ट लावावा. तसेच जिल्ह्यातील डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटरमधील 350 खाटांची संख्या ही किमान 2 हजार खाटापर्यंत वाढवावी.  तसेच रुग्णालयात जेवढ्या सुविधा देणे शक्य आहे तेवढ्या देण्याचा प्रयत्न करावा. जिल्ह्यातील शासकीय डॉक्टर आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा ग्रुप तयार करून वेळोवेळी सूचनांचे अदानप्रदान करावे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात तसेच गल्लीमध्ये कोरोना रक्षक समिती स्थापन करावी. ज्या व्यक्तींना मधुमेह, रक्तदाब,हृदयविकार इत्यादी व्याधी असणाऱ्या व्यक्तींची माहिती तयार करावी. जिल्ह्यातील कार्यालये, दुकाने आदी ठिकाणी तपासणी केंद्रे तयार करुन तपासणी करावी. बाधीत किंवा संशयीत रुग्णास होम क्वारंटाईन न करता संस्थात्मक क्वारंटाईन मध्येच ठेवावे. कोरोना विषाणु संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी पहिले पाच दिवस अत्यंत महत्वाचे असतात. तसेच येणारा कालावधी हा चिंताजनक असून याकरीता डॉक्टरांनी या कालावधीत वेळोवेळी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्याशी संवाद साधुन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करावा. तसेच ज्या भागात रुग्ण आढळला त्याठिकाणी योग्य निर्णय घेवून कडक जनता कर्फ्यू लावावा असेही श्री. केंद्रेकर यावेळी म्हणाले.

यावेळी कृषि, रोहयो, पाणी पुरवठा विभागांचा आढावा घेत विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर म्हणाले की, ज्या शेतातील बियांणांची उगवण झाली नाही अशा बियांणाचे नमुने घेवून तपासणी करावी. तसेच ज्या कंपनीचे बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याने उगवण झाली नाही अशा कपंनीच्या मालकावर गुन्हे दाखल करा, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी त्यांनी रोजगार हमी योजना अंतर्गत जिल्ह्याला मंजूर झालेल्या 600 विहिरीचा आढावा घेतला. तसेच पर्यावरणांचे संतुलन राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यालय, रस्त्यांच्या दूतर्फा, वन विभागाच्या जागेवर आणि माळरानावरील टेकड्यावर वृक्षारोपण करावे असे ही त्यांनी यावेळी निर्देश दिले.

नागरिकांनी देखील अतिमहित्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन ही विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी यावेळी केले. यावेळी विविध विभागाचे विभाग प्रमुख यांच्यासह जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टर आणि पत्रकार यांची उपस्थिती होती.

यावेळी विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर यांनी जिल्हा परिषद परिसरात केलेली वृक्ष लागवडीची पाहणी केली. तसेच हिंगोली येथील डेडीकेटेड कोवीड रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयातील सुविधांची पाहणी करत जिल्हा रुग्णालयातील उपचाराकरीता भरती असलेल्या रुग्णांची भेट घेवून त्यांच्याशी संवाद साधुन त्यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या.

******

 


No comments: