कोरोना
विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बँकेची विड्रॉल सुविधा बंद
हिंगोली,दि.20:
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या जिल्ह्यातील
बँकांची विड्रॉल (पैसे काढण्याची सुविधा) सुविधा बंद करण्यात येत असून, नागरिकांची
गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनामार्फत पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्यात येत
आहेत.
यामध्ये
ज्या क्षेत्रात तसेच ज्या गावामध्ये बँकांचे बिझनेस करस्पाँडेन्ट तसेच कस्टमर
सर्व्हिस सेंटर आहेत अशा ठिकाणी बिझनेस करस्पाँडेन्ट, कस्टमर सर्व्हिस सेंटरच्या
माध्यमातून रक्कमेचे वाटप करण्यात येणार आहे. परंतू रक्कम वितरण करतांना सर्व
केंद्रात सामाजिक अंतर राखणे, मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असणार
आहे.
तसेच ज्या क्षेत्रात किंवा गावात बिझनेस करस्पाँडेन्ट,
कस्टमर सर्व्हिस सेंटर केंद्रामार्फत रोख
रक्कम वाटप करणे शक्य नाही अशा ठिकाणी ग्रामसेवक यांच्यामार्फत
पुढीलप्रमाणे नियोजन करुन रोख रक्कमेचे वितरण करावे. बँकांना जी गावे दत्तक देण्यात
आली आहेत असे गावनिहाय रक्कम वाटप करण्यासाठी वेळापत्रक तयार करावे. तसेच तयार
केलेले वेळापत्रक पोलीस विभाग, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पंचायत समिती,
संबंधित ग्रामपंचायत यांना देखील कळवावे. ग्रामसेवक यांनी गावामध्ये ज्या
नागरिकांना रोख रक्कम काढावयाची आहे अशांना विड्रॉल स्लीप देवून स्लीप भरुन घ्यावी. ग्रामसेवक यांनी वेळापत्रकानुसार
रक्कम वाटप करावयाच्या एक दिवस अगोदर विड्रॉल स्लीप संबंधित बँकांमध्ये जमा करावी.
वेळापत्रकानुसार निश्चित केलेल्या गावात जातांना सोबत पोलीस विभागाचे पथक घेवून
जावे. रक्कम वाटप करते वेळी पथकाने संबंधित नागरिकांची ओळख पटण्यासाठी त्याचे
आवश्यक कागदपत्रे, पुरावे याची तपासणी करुनच रक्कम वाटप करावी. तसेच योग्य ती
खबरदारी घेवून निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार गावात जाण्याची तसेच रक्कम वाटप
करते वेळी पोलीस विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी. रक्कम वाटप करते वेळी
संबंधितांनी शासनाच्या नियमानुसार सामाजिक अंतर राखुन मास्कचा वापर व हातांची
स्वच्छता करावी.
नागरिकांची
गैरसोय होवू नये म्हणून सदर आदेशाची अंमलबजावणी दि. 27 जुलै, 2020 रोजीपासून
करण्यात आली होती. त्यावेळी सर्व बँकांचे खातेदारांनी सर्व नियमाचे पालन करुन दिलेल्या सूचनेप्रमाणे व्यवहार करुन प्रशासनास
सहकार्य केले होते. यासाठी सर्व बँकेचे अधिकारी व कर्मचारी बिझनेस करस्पाँडेन्ट
तसेच कस्टमर सर्व्हिस सेंटर केंद्रांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी,
पत्रकार यांनी देखील सदर कामासाठी सहकार्य केल्याबद्दल प्रशासनामार्फत सर्वांचे
आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
कोरोनाचा
विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व बँकेत होणारी गर्दी टाळण्यासाठी पुन्हा
दि. 23 जुलै, 2020 च्या आदेशातील सूचना पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्यात येत असून
वरील कार्यपध्दती प्रमाणे पुन्हा व्यवहार
करण्यासाठी नागरिकांना व सर्व संबंधित अधिकारी/ कर्मचारी यांना यापूर्वी
केलेल्या सहकार्याप्रमाणे पुन्हा सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश
जयवंशी यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment