कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेवून योग्य नियोजन करा
- पालकमंत्री वर्षाताई गायकवाड
· कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी खासगी डॉक्टरांनी सहभाग देण्याचे आवाहन
हिंगोली,दि.14: जिल्ह्यात सद्य:स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, कोरोनाचा प्रादुर्भाव
वाढण्याची शक्यता लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने नियोजन करण्याचे निर्देश
पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत वर्षाताई गायकवाड या
बोलत होत्या. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी
चंद्रकांत सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री गायकवाड म्हणाल्या की, इतर जिल्ह्यापेक्षा हिंगोलीतील
कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी, मागील काही दिवसांपासून रुग्णांच्या
संख्येत वाढ होत आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने
शासकीय डॉक्टर व खासगी डॉक्टर यांच्याशी चर्चा करुन नियोजन करावे. तसेच कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी
देखील आपला सहभाग द्यावा,असेही आवाहन यावेळी पालकमंत्री यांनी केले. सद्या
जिल्ह्यात लॉकडाऊन सुरु असुन या कालावधीत जिल्ह्यातील कंन्टेमेंट झोन भागातील
नागरिकांची तपासणी करावी. कोरोना विरुध्द सर्वांनी एकत्र येवून लढा देण्याची
आवश्यकता आहे. जिल्ह्यात वाढणारी रुग्ण संख्या कमी करण्यासाठी तात्काळ उपाययोजना
करण्याची आवश्यकता असल्याचेही पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यावेळी म्हणाल्या.
यावेळी पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी खरीप हंगाम पेरणी, पाऊस,
अतिवृष्टी नुकसान अनुदान वाटप, पीक कर्ज वितरण, कर्ज मुक्तीसह कोरोना विषयक
उपाययोजनांचा आढावा घेतला.
यावेळी विविध विभागाचे विभाग प्रमुख यांच्यासह जिल्ह्यातील तज्ज्ञ
डॉक्टर यांची उपस्थिती होती.
****
No comments:
Post a Comment