19 August, 2020

नागरिकांच्या सहकार्यानेच लॉकडाऊनची मोहीम यशस्वी -जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

 

नागरिकांच्या सहकार्यानेच लॉकडाऊनची मोहीम यशस्वी

                              -जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

 

·         जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी व्यक्त केले आभार

 

हिंगोली,दि.19: कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. 6 ते 19 ऑगास्ट, 2020 या चौदा दिवसाच्या कालावधीत संपुर्ण जिल्ह्यात संचारबंदी (लॉकडाउन) लागु करण्यात आली होती. याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी जिल्हा प्रशासनामार्फत पूर्वकल्पना देण्यात आली होती. या कालावधीत दुध, औषध व कृषी विषयक सेवांना मर्यादीत कालावधीसाठी सवलत देण्यात आली होती. या व्यतीरिक्त कोणत्याही व्यवसायास सवलत देण्यात आली नसतांना देखील लॉकडाऊन सक्तीने करण्याची आवश्यकता भासली नाही. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सुजाण जनता, व्यावसायिक, सामाजिक संस्था, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार यांनी लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आदेशाचे पालन करुन लॉकडाऊनची मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच आरोग्य, पोलीस, नगरपालीका, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्व शासकीय यंत्रणानी देखील लॉकडाऊनच्या कालावधीत त्यांचे कर्तव्य चोख पार पाडल्याबद्दल त्यांचे देखील जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आभार व्यक्त केले आहेत.

या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील व्यावसायीकांची रॅपीड अँटीजन टेस्ट करण्याची मोहीम घेण्यात आली होती. त्यामध्ये देखील व्यावसायीकांनी तपासणी करुन घेऊन प्रशासनास मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. तसेच यावेळी तांत्रिक अडचणीमुळे काही व्यावसायीकांचे रॅपीड अँटीजन टेस्ट करणे राहीले असल्याने त्यांचे लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर तीन दिवसाच्या आत रॅपीड अँटीजन टेस्ट करुन घेण्याच्या अटीवर दि. 20 ऑगस्ट, 2020 पासुन त्यांची प्रतीष्ठाने/दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

आगामी कालावधी हा सण, उत्सवाचा कालावधी असल्याने सर्व व्यावसायीकांना आपली प्रतीष्ठाने/दूकाने दि. 20 ऑगस्ट, 2020 रोजीपासुन सकाळी 9.00 वाजेपासुन ते सायं. 7.00 वाजेपर्यंतच उघडे ठेवता येणार आहेत. प्रतिष्ठाने/दूकाने उघडत असतांना संपुर्ण दूकानाचे सॅनिटायजेशन करुनच उघडावीत. तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार दूकानामध्ये येणाऱ्या सर्व ग्राहकांचे पल्स ऑक्सीमीटरद्वारे ऑक्सीजन, थर्मलगनद्वारे ताप तपासणी करावी. प्रत्येक ग्राहकांची आपल्या प्रतीष्ठाने/दूकानातील  नोंदवहीमध्ये नोंद करावी. तसेच दुकानाबाहेर ग्राहकांना थांबण्यासाठी गोल/चौकोनाची आखणी करुन ग्राहकांना त्यामध्ये उभे करुन सोशल डिस्टंसींगचे पालन होईल व दुकानामध्ये गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी वरील नियामांचे पालन करुन स्वत:ची, आपल्या कुंटूंबाच्याआणि आपल्या समाजाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

 

****

 

No comments: