हिंगोली,दि.15: जगात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असून, या महामारीचा
समर्थपणे लढा देत जिल्ह्याची विकासकडे वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री
तथा
जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी केले.
येथील
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित
ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमप्रसंगी पालकमंत्री वर्षाताई गायकवाड बोलत होत्या.
यावेळी आमदार सर्वश्री तान्हाजी मुटकुळे, राजु नवघरे, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, राज्य
राखीव पोलीस दलाचे समादेशक मंचक इप्पर, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी
उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री गायकवाड पुढे म्हणाल्या की, यावर्षी
जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 73 टक्क्याहून अधिक समाधानकारक पाऊस झाला आहे.
खरीप हंगामात जिल्ह्यात सुमारे 96.00 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असुन शेतकऱ्यांना
पेरणीकरीता खत आणि बियाणांचे नियोजन करुन शेतकरी गटामार्फत 5 हजार 251 मेट्रीक टन खत
तर 620 मेट्रीक टन बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर वितरीत करण्यात आले आहे. महात्मा जोतिराव
फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत जिल्ह्यातील 81 हजाराहून अधिक शेतकऱ्यांच्या
खात्यावर 544 कोटी 58 लाख रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे. खरीप
हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 340 कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वितरण करण्यात आले
आहे. जिल्ह्यातील 2 लाख 93 हजार शेतकरी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी झाल्याने
ते संरक्षीत झाले आहे. तसेच जिल्ह्यातील 17 हजार 960 शेतकऱ्यांचा 4 लाख
20 हजार 852 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. तसेच अतिवृष्टी
बाधीत शेतकऱ्यांना मदत म्हणून 222 कोटी 40 लाख रुपये वितरीत करण्यात आले असल्याचे त्यांनी
यावेळी सांगितले.
कोरोना महामारी विरुध्द आपण सर्वजण समर्थपणे लढा
देत असून याचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा पहिल्या दिवसापासून
अविरत कार्यरत असल्याचे सांगत पालकमंत्री गायकवाड म्हणाल्या की, संभाव्य रुग्णवाढ विचारात
घेऊन जिल्ह्यात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांवर
उपचार करण्यासाठी 320 खाटांचे 02 डेडीकेटेड हॉस्पीटल, 350 खाटांचे 6 डेडीकेटेड कोवीड
हेल्थ सेंटर, तर 1500 खाटांचे 18 कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहेत. बाहेरील
जिल्ह्यातून आलेल्या सुमारे 50 हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली असून ॲन्टीजेन टेस्टद्वारे
जिल्ह्यातील 1 लाख नागरिकांची तपासणी करण्याचे नियोजन असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.
मधुमेह, रक्तदाब, ह्दयविकार, क्षयरोग, कर्करोग, दमा, किडनी आदी विकार असलेल्या व्यक्तींना
कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याने अशा व्यक्तींची माहिती संकलीत करण्यात आली असून, त्यांच्या
आरोग्याच्या दृष्टीकोनातून प्रशासनामार्फत काळजी घेतली जात आहे असल्याचे त्या यावेळी
म्हणाल्या.
तसेच राज्यातील गरीब व गरजू व्यक्तींना सवलतीच्या
दरात भोजन उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने
‘शिवभोजन’ ही योजना सुरु केली असून या योजनेतंर्गत जिल्ह्यातील लॉकडाऊनच्या कालावधीत
9 केंद्रामार्फत सुमारे 2 लाखाहून अधिक शिवभोजन थाळींचे वितरण करण्यात आले आहे. तसेच
जिल्ह्यातील 1 लाख 26 हजारहून अधिक शिधापत्रिकाधारकांना 7 हजार 204 मेट्रीक टन अन्न-धान्याचे
वितरण करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोविड-19 विषाणूच्या विविध
उपाययोजनांसाठी 5 कोटी 43 लाख निधी वितरीत करण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
कोरोना विरुध्दच्या लढ्यात जिल्हा
प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा जिल्ह्यात प्रभावीपणे काम करत असून याकरीता खाजगी डॉक्टरांचे
देखील सहकार्य घेतले जात आहे. नागरीकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरीता फिजिकल
डिस्टन्सींगचे पालन करावे, तसेच वारंवार आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत. जिल्ह्यातील सर्व सुजाण नागरिकांनी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला आतापर्यंत खुप
चांगले सहकार्य केल्याने त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांचे आभार मानुन यापूढे ही सर्वानी
आरोग्याची काळजी घेत कोरोनाचा एकजुटीने मुकाबला करावयाचा आहे यासाठी सर्वांनी सहकार्य
करावे, असेही त्यांनी याप्रसंगी आवाहन
केले.
यावेळी
पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी उपस्थितांना तंबाखु मुक्तीची शपथ दिली. तसेच
त्यांच्या हस्ते सन 2019 मध्ये प्रशंसनीय सेवा केल्याबद्दल पोलीस हवालदार परशराम
तुकाराम कुरुडे यांचा सन्मानचिह देवून गौरव केला.
यावेळी
जिल्हा
पुरवठा अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय
अधिकारी अतुल चोरमारे, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, सह जिल्हा निबंधक संजय
पाटील, सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, उपविभागीय वन अधिकारी कामाजी पवार, जिल्हा
नियोजन अधिकारी किरण गिरगावकर यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी,
स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार,
विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
****
No comments:
Post a Comment