बँकांनी उद्दीष्टानुसार तात्काळ पिक कर्जाचे वितरण करावे
- पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड
हिंगोली,दि.14: खरीप हंगाम
2020-21 करीता जिल्ह्यातील बँकांना पिक कर्ज वितरीत करण्यासाठी 1 हजार 169 कोटी
उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. त्यापैकी 57 हजार 343 शेतकऱ्यांना उद्दिष्टाच्या
केवळ 340 कोटी म्हणजे 29 टक्के पिक कर्ज वितरीत केले आहे. त्याकरीता सर्व शेतकऱ्यांना
तात्काळ पिक कर्ज मिळावे यासाठी बँकांनी त्यांना देण्यात आलेल्या उद्दिष्टानुसार
कोणत्याही परिस्थितीत तात्काळ पिक कर्ज वितरण करण्याचे निर्देश जिल्ह्याच्या
पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित आढावा
बैठकीत पालकमंत्री प्रा. गायकवाड या बोलत होत्या. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शंकर
बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या की, यावर्षी पाऊस चांगला झाला
असल्याने शेतकरी बांधवांना पिक कर्जाची आवश्यकता आहे. परंतू अद्यापपर्यंत जिल्ह्यातील 71 टक्के शेतकऱ्यांना
पिक कर्जाचे वितरण झालेले नाही. बँका शेतकऱ्यांना पिक कर्ज वितरणाकरीता टाळा-टाळ करुन दिरंगाई करत
असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व बॅंकांनी पिक कर्ज वितरणांसाठी गाव व बॅंक
निहाय आराखडा तयार करुन तात्काळ पिक कर्ज वितरण करण्याचे निर्देश पालकमंत्री
वर्षाताई गायकवाड यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यातील अनेक बँकाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने बँक कर्मचारी
हे दररोज जास्त वेळ थांबून सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील कामकाज करत आहेत.
तसेच बँकेचे सर्व कामकाज हे ऑनलाईन रित्या चालते परंतू याठिकाणी इंटरनेट
कनेक्टीव्हीटी ची समस्या असल्याचे बँक व्यवस्थापकांनी आपल्या समस्या यावेळी
पालकमंत्री श्रीमती गायकवाड यांच्या पूढे मांडल्या.
यावेळी अग्रणी बँक व्यवस्थापक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व बँकांचे
व्यवस्थापक उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment