20 August, 2020

कोरोनाची पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी घेवून नागरिकांनी गणेशोत्सव साजरा करावा - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

 


 

* सर्व गणेश मंडळे व नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेशाची प्रतिष्ठापना आपल्या घरीच करावी.

* गणेशोत्सव व गौरी सणानिमित्त सर्व नागरिकांनी कोविड-19 च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे.

 

हिंगोली दि.20:सद्या सर्वत्र कोरोना विषाणूचे संकट असुन हिंगोली जिल्हा प्रशासन देखील कोरोना प्रतिबंधासाठी प्रयत्न करत आहे. परंतु दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. येणाऱ्या गणेशात्सवात नागरिकांनीही आपल्या घरीच गणेशाची प्रतिष्ठापना करुन विसर्जनाच्यावेळी पाण्यात सहज विरघळणारी मूर्ती बसविण्याचे  आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले.

            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डिपीसी सभागृहात आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत जिल्हाधिकारी जयवंशी हे बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उप विभागीय अधिकारी अतुल चोरमारे, उप विभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजने, जिल्हा प्रशासन अधिकारी रामदास पाटील, तहसीलदार गजानन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी पुढे म्हणाले की, कोविड-19 च्या अनुषंगाने यावर्षी जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी श्री गणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी 04 फुट व घरगुती गणपती 02 फुटांच्या मर्यादेत प्रतिष्ठापणा करावी. सार्वजनिकरीत्या गणपती न बसवता घरच्या घरीच पर्यावरणपुरक गणपतीची प्रतिष्ठापना करावी. आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मीक कार्यक्रम आयोजित करतांना 4 पेक्षा जास्त लोक असु नये. गणेशाच्या मूर्ती या धातू अथवा संगमरवरी नसाव्यात त्या शाडूच्या अथवा पाण्यात सहजपणे विरघळून जाणाऱ्या असाव्यात. यासाठी गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा. तसेच शक्य असल्यास गणेश मुर्तीचे विसर्जन पुढील वर्षी सन 2021 च्या भाद्रपद महिन्यात करता येणे शक्य आहे. जेणेकरुन आगमन/विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वत: व कुटुंबियांचे कोरोना साथीच्या रोगापासून संरक्षण होईल असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

आरती, भजन किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना 04 पेक्षा जास्त लोक असु नये. तसेच भाविकांसाठी Facebook Live, Cable किंवा अन्य माध्यमातुन Online प्रक्षेपण करावे. पर्यावरण नियंत्रण मंडळाने किंवा इतर प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या मापदंडाचे उल्लंघन करीत फटाक्याचा वापर करुन ध्वनी किंवा हवेचे प्रदुषण करण्यास प्रतिबंध असेल. सार्वजनिक गणेश मंडळाच्या ठिकाणी तिर्थ प्रसाद व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येवू नये. सार्वजनिक गणेश मंडाळाच्या समित्यांनी सोशल मिडीयाचा वापर करुन थेट प्रक्षेपण करावे. जेणेकरुन भक्तांना घर बसल्या दर्शनाचा लाभ घेता येईल. आरतीच्या वेळी जास्तीत-जास्त 04 व्यक्तींनाच उपस्थित राहता येईल. मंदीर परिसर / विसर्जनाच्या ठिकाणी/गणेश उत्सवाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून कलाकारांच्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी परवानगी राहणार नाही असेही जिल्हाधिकारी जयवंशी यावेळी म्हणाले.

श्रीगणेशाचे विसर्जनही घरच्या घरीच करावे. तर नागरी भागातील विसर्जन हे नगर पालीकेमार्फत आपल्या वार्डात विशेष गाडीच्या मार्फत करण्यात येणार असून कोविड-19 चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत चाललेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपले एक जबाबदार नागरिक असल्याचे कर्तव्य पार पाडावे व गणेशोत्सव, गौरी पूजन व मोहरमच्या अनुषंगाने गर्दी न करता कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले.   

              यावेळी पोलीस अधिक्षक  योगेश कुमार यांनी गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना व विसर्जन अशा कोणत्याही प्रकारच्या मिरवणूकीस परवानगी नसल्याचे स्पष्ट करतांना सोशल मिडीयावर सायबर सेलचे विशेष लक्ष असुन आक्षेपार्ह मजकुर पसरविनाऱ्यास कडक कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच गणेशोत्सव, गौरी पुजन व मोहरम निमित्त पोलीस विभागामार्फत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

              प्रारंभी उपविभागीय अधिकारी रामेश्वर वैंजने यांनी सार्वजनिक गणेशोत्सव 2020 च्या अनुषंगाने राज्य शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांची माहिती बैठकीत उपस्थित सर्व गणेश मंडळ यांच्या प्रतिनिधींना दिली.

****

No comments: