08 October, 2021

 

सेनगाव तालुक्यातील नवीन रास्तभाव दुकान मंजुरीसाठी

15 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज करावेत

 

हिंगोली, (जिमाका) दि. 08 : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दिनांक 6 जुलै 2017 शासन निर्णयाच्या अनुषंगाने सेनगाव तालुक्यातील मन्नासपिंप्री, गोरेगाव-01, गोरेगाव-02, गोरेगाव-03, गोरेगाव-04, लिंगपिंपरी, चांगेफळ, खैरी, तांदुळवाडी, बोडखा या 10 रास्तभाव दुकानासाठी जाहीर प्रगटन काढण्यात आलेले आहे.

हे जाहीर प्रगटन तहसील कार्यालयामार्फत गावात डकवण्यात आलेले आहे. या जाहीर प्रगटनानुसार भरावयाचे अर्ज तहसील कार्यालय, सेनगाव येथे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.

रास्तभाव दुकाने, किरकोळ केरोसीन परवाने दि. 6 जुलै, 2017 च्या शासन निर्णयानुसार पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था), नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था महिला स्वयंसहायता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था या प्राधान्य क्रमानुसार मंजूर करण्यात येतील .

वरील प्राधान्य क्रमानुसार रास्तभाव दुकाने व किरकोळ केरोसीन परवाने मंजूर केलेल्या दुकानाचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदायाद्वारे करणे आवश्यक राहील. अधिकृत स्वयं सहायता गटांना प्राधिकारपत्राच्या अटी, शर्तीच्या पालनार्थ भरावयाच्या प्रतिभूती ठेवीच्या रकमा चलनाद्वारे शासन नियमानुसार बँकेत जमा कराव्या लागतील. रास्तभाव दुकान, किरकोळ केरोसीन परवाने मंजूर करण्यासाठी प्राथम्य सूची दि. 3 नोव्हेंबर, 2007 च्या शासन निर्णयानुसार व दि. 25 जून, 2010 च्या शासन पत्रानुसार विचारात घेतली जाईल. प्राथम्य सूचीनुसार गटांची निवड करताना, ज्येष्ठ , वर्धनक्षम व नियमित कार्यरत असलेल्या, अंतर्गत व्यवहार पारदर्शक व परतफेड चोख व नियमित असलेल्या व प्रतिवर्षी लेखापरिक्षण केलेल्या गटास प्राधान्य देण्यात येईल. निवड करावयाच्या गटाचे हिशेब व लेखे अद्यावत असावेत व परतफेडीचे प्रमाण किमान 80 टक्के असावे. आवेदन करणाऱ्या संस्थांनी दि.3 नोव्हेंबर, 2007, दि.6 जुलै,  2017 व 1 ऑगस्ट 2017 च्या शासन निर्णयांचे वाचन करुन आवेदन पत्र अचूक भरावे.

यापूर्वी ज्या पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था), नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी  संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वयंसहायता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था यांनी दिनांक 21 जानेवारी 2020 अन्वये या कार्यालयास  अर्ज दिलेले आहेत त्यांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तसेच संबंधितांचे काही कागदपत्रे, पुरावे, जाहीर प्रगटनाची फिस अथवा चलन जोडण्याची संधी देण्यात येत आहे. चलन भरणा केल्याची प्रत जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयास सादर करावी . तसेच जास्तीत जास्त बचत गट , संस्था, सहकारी संस्था यांनी तहसील कार्यालयास नवीन रास्तभाव दुकान मंजुरीसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

विहित नमुन्यातील अर्ज दिनांक 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत तहसील कार्यालयात कार्यालयीन वेळेत स्विकारण्यात येत आहेत.

            वरील दाव्याचे पृष्ठीकरिता लेखी पुरावे सादर करणे आवश्यक आहे. स्वयंसहायता बचत  गटाची निवड करण्याचे काम त्या गावच्या महिला ग्रामसभेची शिफारस विचारात घेऊन जिल्हा पुरवठा अधिकारी अध्यक्ष असलेली शासन नियुक्त समिती करणार आहे. जाहीरनाम्यामध्ये अंशत: किंवा पूर्णत: बदल करण्याचे अधिकार जिल्हा पुरवठा अधिकारी, हिंगोली यांनी राखून ठेवले आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकद्वारे दिली आहे.

*****

No comments: