01 October, 2021






 केंद्रीय अन्नपूर्णा वृध्दाश्रमात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा

 

हिंगोली, (जिमाका) दि. 01 : येथील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय व स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित केंद्रीय अन्नपुर्णा वृध्दाश्रम, जवळा पळशी, ता.सेनगांव, जि.हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने जवळा पळशी येथील केंद्रीय अन्नपूर्णा वृध्दाश्रमात जागतिक जेष्ठ नागरिक दिन आज साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे, स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बिरकुंअर अण्णा, समाज कल्याण निरीक्षक सुनिल वडकुते, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल गजानन बिहाडे, सामाजिक कार्यकर्ता शेषराव जाधव व बहुसंख्य जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांमार्फत जेष्ठ वयोवृध्दासाठी शासनाकडून विविध उपक्रम चालविले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून आज हिंगोली जिल्हयात दिनांक 1 ऑक्टोंबर हा दिवस जागतिक जेष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.

यावेळी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी जेष्ठ नागरिकानी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपले उर्वरित आयुष्य सुखदायी करावे. तसेच या वृध्दाश्रमात निवास व भोजन व्यवस्था मोफत करण्यात येत आहे. याचा जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा. कांही अडचणी असल्यास सहायक आयुक्त , समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.   

यावेळी हिंगोली जिल्ह्यातील गरजू जेष्ठ नागरिकांनी अण्णपूर्णा वृध्दाश्रम, जवळा पळशी, ता.सेनगांव, जि.हिंगोली येथे  येऊन त्यांची उतार वयात होत असलेली हेंळसांड थांबविण्यासाठी वृध्दाश्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थाध्यक्षांनी केले.

याप्रसंगी वृध्दाश्रमात रहात असलेल्या जेष्ठ नागरिकांनी आपले अनुभव कथन केले व सामाजिक न्याय विभागांमार्फत सुरु असलेल्या कार्य जेष्ठ नागरिकांसाठी दिलासादायक असून दररोज योगा, हलके-फुलके व्यायाम, (चालणे, हसणे, खेळणे, गप्पा-गोष्टी) असे विविध कार्यक्रम दिवसभर चालत असल्याचे मत व्यक्त करुन आभार मानले.

या कार्यक्रमात सहायक आयुक्त, समाज कल्याणच्या वतीने जेष्ठ नागरीकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व फळाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रमेश झिझांडे तर आभार प्रदर्शन माधुरी काळबांडे यांनी केले.

******* 

No comments: