20 October, 2021

 अनुज्ञप्ती विषयक कामासाठी वैद्यकीय व्यवसायिकांनी

युजर आयडी प्राप्त करुन घेण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा

 

             हिंगोली (जिमाका), दि.20 :  शासनाने आधार क्रमांकाचा वापर करुन फेसलेस शिकाऊ अनुज्ञप्ती सेवेचा लाभ घेण्याची तरतूद केली आहे. त्याअन्वये अर्जदारास घरबसल्या शिकाऊ अनुज्ञप्तीची चाचणी देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या चाचणीत उत्तीर्ण होऊन त्यास घरबसल्या शिकाऊ  अनुज्ञप्तीची प्रिंट मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांना कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही व त्यांच्या वेळेमध्ये बचत होणार आहे.

            त्याप्रमाणे मोटार वाहन कायदा व अनुषंगिक नियमांमध्ये नमूद अनुज्ञप्ती विषयक कामासाठी आवश्यक नमुना 1 (अ) हे वैद्यकीय प्रमाणपत्र सुध्दा नोंदणी कृत एमबीबीएस वैद्यकीय व्यवसायिक किंवा त्यावरील अर्हता प्राप्त पात्र डॉक्टरांमार्फत ऑनलाईन पध्दतीने  देण्याची सुविधा राष्ट्रीय सूचना केंद्रामार्फत विकसित करण्यात आली आहे. याद्वारे अर्जदारांची तपासणी संबंधित डॉक्टरांमार्फत करण्यात येऊन नमुना 1 (अ) अपलोड करण्यात येणार आहे. यासाठी  जिल्ह्यातील  पात्र डॉक्टरांनी  उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली  यांच्याद्वारे आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करुन परिवहन कार्यालयामार्फत युजर आयडी प्राप्त  करायचे आहे.

            सर्व संबंधित वैद्यकीय व्यवसायिकांनी  एमबीबीएस डिग्री, मेडिकल कौन्सिल  ऑफ इंडिया, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, इत्यादी आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रतींसह अनुज्ञप्ती विभाग उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा व युजर आयडी प्राप्त करुन घेण्या संबंधी पुढील कार्यवाही करुन घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*****

No comments: