25 October, 2021

 



तुळजापुरवाडी येथील लसीकरण पूर्ण

मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी केले सरपंच व ग्रामसेवकांचे अभिनंदन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 25 : पंचायत समिती वसमत अंतर्गत ग्रामपंचायत तुळजापुरवाडी येथे कोविड लसीकरणाचे काम पूर्ण झाले असून नुकतेच गावात राहत असलेल्या सर्वांना कोविड डोस देण्यात आला आहे.

ही लसीकरण मोहिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, गट विकास अधिकारी विठल सुरोसे याच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्यात आली.

        या मोहिमेत तुळजापुरवाडी येथील सरपंच सौ.कमलताई गिरी, ग्रामसेवक संजय कातोरे, उपसरपंच सौ.आशा चव्हाण, अंतरावर चव्हाण, पंडीतराव चव्हाण, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी देशमुख, एएनएम प्रतिभा काटे, अंगणवाडीताई पार्वती राखोंडे, आशा वर्कर उर्मिला चव्हाण, रोजगार सेवक अनंता चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी प्रभाकर चव्हाण, मदतनीस पार्वती चव्हाण व ग्रामस्थ यांच्या अथक परिश्रमांतून यशस्वी करण्यात आली. 

      गावातील एक जेष्ठ नागरिक मंचकराव चव्हाण हे लस घेण्यास तयारच नव्हते तेव्हा ग्रामसेवक त्यांच्या घरी गेले आणि जोपर्यंत तुम्ही लस घेणार नाही तो पर्यंत मी घरच सोडणार नाही, असे ग्रामसेवक यांनी सांगितले व शेवटी मंचकराव तात्या यांनी लस घेतली. 

येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी तात्काळ सरपंच  सौ. कमलताई गिरी, ग्रामसेवक संजय कातोरे व समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी देशमुख यांचे प्रत्यक्ष व मोबाईलद्वारे संपर्क करुन अभिनंदन केले व गावात येणारी पाहुणे मंडळींचे देखील लसीकरण करण्याचा सुचना दिल्या. 

       मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी सरपंचताई तुम्ही अतिशय चांगले काम केले आहे, मी तुळजापुरवाडीला नक्की भेट देणार आहे असे बोलत असताना सरपंचताई  यांचे मन भरुन आले व त्यांना फार आनंद झाला. 

       जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार यांनी देखील तुळजापुरवाडी येथील सरपंच व ग्रामसेवक यांचे अभिनंदन केले आणि जिल्ह्यातील लसीकरण बाबत चांगले काम करणारे निवडक  सरपंच व ग्रामसेवक यांचा सत्कार व गौरव थोड्याच दिवसात जिल्हा परिषद हिंगोली येथे करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

****

No comments: