07 October, 2021

 




हिंगोली जिल्ह्यात 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान ‘‘मिशन कवच कुंडल’’ मोहिमेचे आयोजन

कोरोनाला रोखण्यासाठी विशेष लसीकरण मोहिम राबवावी

--जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

हिंगोली, (जिमाका) दि. 07 : राज्यात लसीकरण मोठ्यात प्रमाणात झाले असून त्या तुलनेत हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी लसीकरण झाले आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे. यासाठी दि. 8 ते 14 ऑक्टोबर, 2021 दरम्यान ‘‘मिशन कवच कुंडल’’ मोहिमेच्या माध्यमातून कोरोनाला रोखण्यासाठी विशेष लसीकरण राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले आहेत.

आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दि. 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान कोविड-19 लसीकरणाची विशेष मोहिम राबविण्यासाठी जिल्हा टास्क फोर्स समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधकारी कमलाकर फड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.

 यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले, मिशन कवच कुंडल मोहिमेच्या माध्यमातून दि. 8 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत यापूर्वी लसीकरणापासून वंचित राहिलेल्या सर्व लोकांचे लसीचा पहिला डोस पूर्ण करावेत. यासाठी आशा कार्यकर्ती, अंगणवाडी शिक्षिका, सेविका, पोलीस पाटील, कोतवाल, स्वस्त धान्य दुकानदार यांची मदत घ्यावी. आशा स्वयंसेविकांकडून पहिला व दुसऱ्या डोसचे किती लाभार्थी राहिले आहेत याची यादी घ्यावी. सर्व गावातील राहिलेल्या लोकांची यादी तयार करण्यास सांगावे व राहिलेल्या 18 वर्षावरील सर्व नागरिकांना लसीकरण करावे. यासाठी प्रत्येक गावनिहाय, वार्डनिहाय शिबीरे आयोजित करावीत. सूक्ष्म नियोजन करुन त्याचे वेळापत्रक तयार करावे, हे वेळापत्रक जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना शेअर करावी. जिल्ह्यात प्रत्येक दिवशी किमान 25 ते 30 हजार लसीकरण होईल यासाठी प्रयत्न करावेत. शंभर टक्के लसीकरण पूर्ण होईल याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

सध्या सर्व लोक हे शेतीच्या व बिगारी कामावर दिवसभर असतात. त्यासाठी सकाळी व संध्याकाळी वेळा ठरवून लसीकरण करावेत. या वेळेबाबतची माहिती आशा, अंगणवाडी शिक्षिका, मदतनीस, पोलीस पाटील, कोतवाल यांच्यामार्फत व ध्वनीक्षेपकामार्फत जनजागृती करावी. लसीकरणाच्या नोंदीसाठी शिक्षकांच्या नेमणुका कराव्यात. तसेच शाळेतील मुलांना आपल्या घरातील सदस्यांनी लसीकरण केले किंवा नाही याची माहिती शिक्षकांनी घ्यावी व पात्र असलेल्या नागरिकांचे जास्तीत जास्त लसीकरणासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिल्या.  

तसेच लसीकरणाची मोहिम शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सर्व गावातील सरपंच, सदस्य, गावस्तरीय विविध समित्याचे सदस्य यांना व्हीसीद्वारे रविवारी सकाळी 11.30 वाजता संपर्क साधणार आहेत. या सर्वांची उपस्थिती ठेवण्याची जबाबदारी ग्रामसेवक, तलाठी यांची राहील, असे सांगितले. तसेच मंत्री महोदयांनीही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना पत्र पाठवून लसीकरण वाढविण्यासाठी आवाहन करणार आहेत. तसेच राज्यातील पहिल्या येणाऱ्या पाच जिल्ह्यांचा गौरव करणार आहेत, अशी  माहिती यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिली.  

यावेळी बैठकीस जिल्ह्यातील सर्व जिल्हास्तरीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.

******

No comments: