मार्गदर्शक सूचनांचा
अवलंब करुन नवरात्रोत्सव सण साजरा करावा
- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश
हिंगोली, (जिमाका) दि. 05 :
शासन व जिल्हास्तरावरुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात
येत आहेत. त्याअनुषंगाने सार्वजनिक नवरात्रोत्सव-2021
बाबत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी संपूर्ण
हिंगोली जिल्ह्याच्या हद्दीत नवरात्रोत्सव सण साजरा करण्याबाबत पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित
केले आहेत.
1. कोविड-19 च्या
संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन,
मदत व पुनर्वसन विभागाने दि. 4 जून, 2021 रोजी निर्गमित केलेले परिपत्रक, सार्वजनिक
आरोग्य विभागाचे दि. 11 ऑगस्ट, 2021 चे आदेश, तसेच ब्रेक द चेन अंतर्गत दि. 24 सप्टेंबर,
2021 अन्वये दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांचे तंतोतत पालन करावे.
2. सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी
मंडळानी नगरपालिका, नगर पंचायत, ग्रामपंचायत, स्थानिक प्रशासन यांच्या धोरणानुसार यथोचित
परवानगी घेणे आवश्यक राहील.
3. कोविड-19 मुळे
उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता आणि नगर परिषद-नगर पंचायत तसेच संबंधित
स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप
उभारण्यात यावेत.
4. यावर्षीचा नवरात्रोत्सव
साध्या पध्दतीने साजरा करण्याच्या अनुषंगाने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मूर्तीची
सजावट त्याअनुषंगाने करण्यात यावी.
5. देवीच्या मूर्तीची
उंची सार्वजनिक मंडळाकरिता 4 फूट व घरगुती देवीच्या मूर्तीची उंची 2 फूटाच्या मर्यादेत
असावी.
6. मागील वर्षीप्रमाणे
शक्यतो देवीच्या मूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. मूर्ती
शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे
शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात प्रशासनाशी समन्वय ठेवावा.
7. नवरात्रोत्सवासाठी
वर्गणी, देणगी स्वच्छेने दिल्यास त्याचा स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे
गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती
प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच ‘‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’’ या मोहिमेबाबत
देखील जनजागृती करण्यात यावी.
8. गरबा, दांडिया
व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रमे, शिबीरे
(उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात
यावेत आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्याचे प्रतिबंधात्मक
उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.
9. देवीच्या दर्शनासाठी
मंडळाने ऑनलाईन प्रक्षेपण, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबूक इत्यादी द्वारे उपलब्ध करुन
देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करावी.
10. देवीच्या मंडपामध्ये
प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या बाबतीत सार्वजनिक आरोग्य विभागाने दि. 24 सप्टेंबर, 2021 च्या आदेशान्वये ‘ब्रेक
द चेन’ अंतर्गत दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांचे व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे
उघडण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या मार्गदर्शक सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन
करण्यात यावे.
11. आरती, भजन,
कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही. तसेच ध्वनी प्रदूषणांसंदर्भातील
नियमाचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे.
12. मंडपात एकाच
वेळी 5 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपामध्ये खाद्यपदार्थ
अथवा पेयपानाची व्यवस्था करण्यास सक्त मनाई असेल.
13. देवीच्या आगमन
व विसर्जन मिरवणुका काढू नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीतील विसर्जन स्थळी होणारी
आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी
सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण गावातील, नगरातील, इमारतीतील
सर्व घरगुती देवीच्या मूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये.
14. नगरपालिका,
विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने
कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात यावी. तसेच नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी स्थानिक
प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय मूर्ती स्वीकृती केंद्राची व्यवस्था करावी. याबाबत जास्तीत
जास्त प्रसिध्दी देण्यात यावी.
15. विसर्जनाच्या
तारखेस जर घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्रात
असेल तर मूर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल.
16. दसऱ्याच्या
दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून करण्यात यावा. रावण
दहनाकरिता आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील. प्रेक्षक बोलावू
नयेत. त्यांना फेसबूक इत्यादी समाज माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे बघण्याची व्यवस्था
करावी.
17. कोविड-19 या
विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन , आरोग्य, पर्यावरण , वैद्यकीय
शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस , स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या
नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच यानंतर प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या
कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्याचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील.
या आदेशाची काटेकोरपणे
अंमलबजावणी करुन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी
मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.हिंगोली, पोलीस अधीक्षक, हिंगोली, उपविभागीय अधिकारी,
तहसीलदार, मुख्याधिकारी नगर परिषद-नगर पंचायत, तसेच इतर सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी
यांची असेल. आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह हे भारतीय दंड संहिता
1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्ती व्यवस्थापन
अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहतील, असे आदेशात नमूद केले आहे.
****
No comments:
Post a Comment