01 October, 2021

 



ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनेची सर्व कामे

प्रक्रिया पूर्ण करुन त्वरित सुरु करावीत

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

हिंगोली, (जिमाका) दि. 01 : ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनेच्या सर्व कामाचे डीपीआर ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करावेत. तसेच त्याची निविदा प्रक्रिया व इतर तांत्रिक बाबीची नोव्हेंबर मध्ये पूर्तता करुन कामे त्वरित सुरु करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज बैठकीत दिल्या.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनची बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव चक्के उपस्थित होते.

या बैठकीत जलजीवन मिशन अंतर्गत दरडोई खर्चाच्या निकषात बसणाऱ्या 15 लाख ते 5 कोटी रुपयापर्यंतच्या नळ पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनला आहेत. त्यामुळे कळमनुरी तालुक्यातील खरवड व जटाळवाडी या दोन नवीन पाणी पुरवठा योजना व हिंगोली तालुक्यातील दाटेगाव, कळमनुरी तालुक्यातील पुयना, आसोलवाडी, सुकळीवीर, तेलंगवाडी या पुनर्जोडणी करावयाच्या 06 प्रस्तावावर 3 कोटी 28 लाख 34 हजार 750 रुपयाच्या खर्चास शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचना, अटी, शर्तीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या मिशनच्या मान्यतेनंतर प्रशासकीय मान्यतेचे आदेश सहअध्यक्ष जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावरुन निर्गमित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिल्या.

जल जीवन मिशनचा सन 2021-22 चा वार्षिक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात कवठा प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. यामध्ये कवठा, कोळसा, कहाकर खु. , कोडवाडा, सिंदगी खांबा, सावरखेडा ही 06 गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. आता नव्याने जयपूर, साखरा, पाटोदा हत्ता व हत्ता तांडा या 04 गावांच्या ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार सदरची गावे प्रस्तावित प्रादेशिक योजनेत समाविष्ट  करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे मागणी केलेली आहे. त्यानुसार या 04 गावांचे परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्यामुळे कवठा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेत नव्याने समाविष्ट करण्यासाठी मान्यता देण्यात आली. ही सर्व कामे तांत्रिक बाबींची पूर्तता करुन कायमस्वरुपी व भविष्यात पाण्याची अडचण भासणार नाही याची काळजी घेऊन करावीत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी दिल्या.

   यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे प्रकल्प संचालक, सामाजिक वनीकरण विभागाचे प्रतिनिधी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी, कृषि विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

*******

No comments: