दिवाळीच्या
शुभ मुहूर्तावर विविध घरकुल योजनेतील
एक हजार लाभार्थ्यांचे गृह प्रवेश
हिंगोली,
(जिमाका) दि. 29 : दसरा व दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर एक
हजार घरांचे बांधकाम पूर्ण करुन गृहप्रवेश कार्यक्रम घेण्यासाठी जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने आणि प्रकल्प संचालक निलेश
कानवडे यांनी तालुकास्तरावर घरकुलांच्या प्रगतीबाबत वेळोवेळी आढावा घेऊन सूचना
दिल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्ह्यातून एक हजार पेक्षा जास्त घरकूल पूर्णत्वास
आले आहेत. त्यामुळे वेळेत गृह बांधणीचे काम पूर्ण करणाऱ्या सर्व शासकीय यंत्रणेचे
अभिनंदन केले आहे. पूर्णत्वास आलेल्या घरकुल लाभार्थ्यांची दसरा व दिवाळी नवीन
घरात आनंदात साजरी व्हावी, यासाठी गृह प्रवेश कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
प्रातिनिधिक
स्वरुपात सर्व तालुक्यातील निवडक ग्रामपंचायतीमध्ये अधिकारी व लोकप्रतिनिधी
यांच्या सहभागाने दिवाळीपूर्वी गृहप्रवेश कार्यक्रमाचे गटविकास अधिकारी पंचायत
समिती यांच्यामार्फत आयोजन करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री
आवास योजना (ग्रामीण) तसेच राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या
घरकुलांमध्ये 01 जून, 2021 पासून आजपर्यंत 783 लाभधारकांचे घरकुल पूर्ण झाले आहेत.
विविध घरकुल योजनेत शासनाकडून 01 लाख 20 हजार रुपये तसेच नरेगा योजनेंतर्गत 18
हजार 500 व स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत 12 हजार 500 रुपये असे एकूण 01 लाख 50
हजार एवढे अनुदान लाभधारकांना दिले जाते.
जिल्ह्यात
पूर्ण झालेल्या घरकुलामध्ये 01 जून, 2021 पासून आजपर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत औंढा नागनाथ
-98, वसमत-147, हिंगोली-24, कळमनुरी-115, व सेनगाव-241 असे एकूण 625 घरकुले पूर्ण
झाली आहेत. तसेच रमाई व शबरी या राज्य पुरस्कृत योजनेत औंढा नागनाथ-26, वसमत-10,
हिंगोली-136, कळमनुरी-40 व सेनगाव-20 असे एकूण 158 घरकुले पूर्ण झाली आहेत. अशा
एकूण 783 घरकुले पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांचे दिवाळीपूर्वी गृहप्रवेश कार्यक्रम
जिल्ह्यात सुरु आहेत. तसेच विविध शहरी घरकुल योजनेत औंढा नागनाथ-15, वसमत-10,
हिंगोली-136, कळमनुरी-40 व सेनगाव-20 असे एकूण 221 घरकुले पूर्ण झाली असून शहरी व
ग्रामीण घरकुले मिळून 01 हजार 4 घरकुले पूर्ण झाली आहेत.
26
जानेवारी, 2022 पर्यंत जिल्ह्यातील वार्षिक उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या अनुषंगाने पाठपुरावा
करण्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने,
प्रकल्प संचालक निलेश कानवडे यांनी सर्व गटविकास अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत.
*******
No comments:
Post a Comment