16 March, 2022








भारुड, गोंधळ, पोवाडा, शाहिरीतून शासनाच्या योजनांचा जागर

  • लोककलेतून योजनेंच्या प्रचार, प्रसारास नागरिक, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

 

हिंगोली, दि. 16  (जिमाका) :  शासनाने राज्यातील जनतेच्या विकासासाठी दोन वर्षात राबविलेल्या योजना, उपक्रमांना भारुड, गोंधळ, पोवाडा, शाहिरी, पथनाट्य आदी लोककलेच्या माध्यमातून शासनाच्या योजनांचा जागर जिल्ह्यात सुरु आहे.  

महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यामुळे जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती कलापथकाच्या माध्यमातून शासनाच्या योजना साध्या आणि सोप्या भाषेत गोंधळ, लोकगीते, भारुडे, गवळणी, बतावणी या माध्यमातून जिल्ह्यातील बाजारांची गावे, गर्दीच्या ठिकाणी शासकीय योजनांची लोककलेच्या सादरीकरणातून माहिती देऊन योजनांचा प्रचार, प्रसार करण्यात येत आहे. लोककला प्रकारांना नागरिक, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.  या माध्यमातून शासनाच्या योजना, उपक्रमांची माहितीही जनतेला होत आहे.

जयभवानी कला मंडळाचे नारायण घोंगडे यांनी  पारंपारिक गोंधळाच्या माध्यमातून काल वसमत तालुक्यातील वसमत, कौठा, हिरडगाव येथे व आज आरळ येथे मनोरंजनाच्या माध्यमातून लोकप्रबोधन करत माहिती दिली. संत गजानन महाराज लोककला व पथनाट्य मंडळाचे नामदेव कल्याणकर यांच्या पथकानेही काल हिंगोली तालुक्यातील नांदुरा, खांबाल व सेनगाव तालुक्यातील तळणी येथे लोककलेच्या माध्यमातून मनोरंजन करत शासनाच्या विविध योजनांची, उपक्रमांची माहिती केली. तर सूर्यप्रकाश बहुउद्देशीय सेवा संस्थेचे कलापथक प्रमुख शाहीर प्रकाश दांडेकर यांनी शाहिरी, पोवाडा, बतावणी, लोकगिताच्या माध्यमातून काल कळमनुरी तालुक्यातील खरवड, मसोड, मोरवड येथे शासनाच्या योजनांची, उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम केले.

दोन वर्षात शासनाने राबविलेल्या महत्वाच्या योजना, कोविड काळातील उपाययोजना, उद्योजक, शेतकरी, सर्वसामान्य माणसाचा विचार करुन घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय, आरोग्य यंत्रणा सक्षम बनविणे, नवतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, शिष्यवृत्ती वाटप,  पाणी पुरवठा योजना, सामाजिक न्यायाच्या योजना आदींसह सर्वच क्षेत्रातील माहिती लोककलेच्या माध्यमातून या पथकांनी जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. या उपक्रमांस जनतेतूनही भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

******   


No comments: