बोकड पालनाच्या व्यवसायातून कविताने
साधला आर्थिक विकास
प्रतिकूल परिस्थितीवर
मात करत औंढा येथील रहिवासी असलेल्या कविता साहेबराव नाईकवाड यांची दीक्षाभूमी
स्वयं सहायता महिला बचत गटाच्या माध्यमातून सुरु असलेली वाटचाल इतर महिलांसाठी
प्रेरणादायी आहे. कविता नाईकवाड ह्या महाराष्ट्र मानव विकास कार्यक्रमांतर्गत
कौशल्य विकास व रोजगार निर्मिती या योजनेंतर्गत दीक्षाभूमी स्वयं सहायता महिला बचत
गटात मागील 6 वर्षापासून सभासद आहेत.
कविताचा बचत गट महिला आर्थिक विकास महामंडळ हिंगोली स्थापित
लोकसंचलित साधन केंद्र औंढा अंतर्गत स्थापन करण्यात आला आहे. या गटामध्ये येण्या
अगोदर त्यांची बचत होत नव्हती. तसेच बँक व्यवहाराबद्दल देखील त्यांना माहिती
नव्हती. कविता आणि त्यांचे मालक मिळेल ती मजुरी करुन संसार चालवत होते. कवितानी बचत
गटात आल्यानंतर त्यांच्या गटाने सुरुवातीला आय सी आय सी आय बँकेचे 01 लाख रुपयाचे कर्ज
घेतले. त्यामधून कविताला 10 हजार रुपये कर्ज मिळाले. या पैशातून त्या मोठा व्यवसाय
करु शकत नव्हत्या. परंतु कविताला वाटले एखादी शेळी खरेदी केली तर त्या पासून सहा
महिन्यात पैसे मिळतील व ही शेळी शेतात मजुरी काम करत करत चारु शकते. या बाबतीत कविताच्या
नवऱ्याने देखील होकार दिला व त्यांनी एक गावातूनच गाभण शेळी खरेदी केली. काही
दिवसातच तिला तीन पिल्ले झाले. त्यामध्ये 2 बोकड व एक पाठ होती.
पुढे पाच महिन्यातच एक व्यापारी कविताच्या घरी आला व त्याने कविताकडे
असलेले 2 बोकड दहा हजार रुपये किमतीला खरेदी केले. पूर्ण महिनाभर लोकांच्या शेतात
काम करुन दोन अडीच हजार मिळत होते ते आता त्यांना कमी कष्टात शेळी पालनाच्या
माध्यमातून मिळाल्याने कविताला समाधान वाटले. तेव्हापासून कविता आणि तिच्या पतीने
शेळी पालन व्यवसाय करण्याचे ठरविले. मध्यंतरीच्या काळात त्यांच्याकडे असलेल्या
शेळ्या त्यांना चारायला नेणे अवघड होऊ लागले. तसेच घरात आर्थिक अडचण भासू
लागल्यामुळे कविताला नाविलाजाने त्यांच्याकडे असलेल्या शेळ्या विकाव्या लागल्या.
अशातच मागील वर्षी त्यांच्या बचत गटाच्या मॅडम गटाची बैठक घेण्यासाठी
आल्या होत्या. त्या वेळेस त्यांनी महाराष्ट्र मानव विकास कार्यक्रमांतर्गत कौशल्य
विकास व रोजगार निर्मिती या योजनेअंतर्गत ज्या महिला बोकड पालन करण्यास इच्छुक
आहेत अशांची नावे विचारली. तेव्हा कवितांनी त्यांचे नाव दिले. घरची आर्थिक
स्थितीही नाजूकच होती. अशात ही योजना त्यांना खूप आधार देणारी वाटली. त्यामुळे
कवितांनी या योजनेचा लाभ घ्यायचा असे ठरविले. याला कविताच्या नवऱ्याने देखील संमती
दिली. कवितांनी त्यांच्या गटाचे कार्यालय लोकसंचलित साधन केंद्राकडे अर्ज केला. त्या
बरोबर एके दिवशी त्यांच्या गटाच्या कार्यालयात बोकड पालन करणाऱ्या महिलांची बैठक
घेण्यात आली. या बैठकीला सर्व महिला तसेच जिल्हा कार्यालयातील जिल्हा समन्वय
अधिकारी विलास जगताप, संकेत महाजन सर त्या बरोबर लोकसंचलित साधन केंद्राचे व्यवस्थापक
विलास पंडित, लेखापाल प्रिती पारसकर व सर्व सहयोगिनी उपस्थित होत्या.
महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक विलास जगताप सरांनी
सर्व निवड केलेल्या महिलांना या योजनेबद्दल माहिती सांगितली. यामध्ये या
व्यवसायासाठी निवड केलेल्या महिलांना या योजनेच्या माध्यमातून प्रती महिला 01 लाख
20 हजार रुपये मिळणार आहेत असे सांगितले. त्यामध्ये महिलांना शेड मिळणार, तसेच बोकडासाठी
लागणारे चारा दाणी, पाणी स्टँड, बोकडाचा विमा या बाबी सांगण्यात आल्या. कवितांने जवळा
बाजार येथून माहे जानेवारी मध्ये 10 बोकड खरेदी केले. त्याच ठिकाणी त्यांच्या सर्व
बोकडांचा विमा काढण्यात आला.
कवितांने सर्व बोकड तीन महिन्याच्या वर वय असलेले खरेदी केले. त्यांची
चांगली देखभाल केली त्यामुळे अवघ्या पाच महिन्यात कविताला 40 हजार रुपये निव्वळ
नफा झाला. पाच महिने कविता मजुरीने कितीही काम केले असते तरी त्यांना एवढा पैसा
मिळाला नसता. खरच या व्यवसायामुळे कविता नाईकवाड व त्यांच्या कुटुंबाला खूप आधार
मिळाला आहे. त्यामुळे कविताने हा व्यवसाय जो पर्यंत धडधाकट आहे तो पर्यंत करणार असल्याचे
सांगून या योजनेमुळे माझा नक्कीच आर्थिक विकास झाला असल्याचे सांगितले .
-- चंद्रकांत स. कारभारी
माहिती सहायक,
जिल्हा माहिती
कार्यालय, हिंगोली
******
No comments:
Post a Comment