30 March, 2022

 ऱ्हदय शस्त्रक्रियेसाठी बालकांना घेऊन जाणाऱ्या बसला

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना

 

            हिंगोली, (जिमाका) दि. 30 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या वैद्यकीय पथकाकडून 0 ते 18 वर्षे वयोगटातील संदर्भित संशयित ऱ्हदयरुग्णांसाठी दि. 8 मार्च, 2022 रोजी येथील जिल्हा रुग्णालयात 2डी-इको तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ऱ्हदयशस्त्रक्रिया करण्यासाठी 26 विद्यार्थ्यांना संदर्भीत करण्यात आले होते. यापैकी  15 बालकांच्या ऱ्हदयशस्त्रक्रिया करण्यासाठी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) वर्धा येथे घेऊन जाणाऱ्या बसला आज दि. 30 मार्च, 2022 रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून बस रवाना करण्यात आली.

      यावेळी आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव यांनी सर्व बालकांना शुभेच्छा देऊन आरोग्य विभागाचे कौतुक केले. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, बालरोग तज्ञ डॉ.स्नेहल नगरे, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, डीईआयसीचे व्यवस्थापक डॉ. नांदूरकर, प्रशांत तुपकरी, लक्ष्मण गाभणे, ज्ञानोबा चव्हाण व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

            राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत उर्वरित 11 बालकांना ऱ्हदयशस्त्रक्रियासाठी लवकरच पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्क यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

            हिंगोली जिल्ह्यातील गरजू रुग्णांना हा कार्यक्रम वरदान ठरला आहे. या कार्यक्रमांतर्गत सन 2021-22 मध्ये यापूर्वी 45 बालकांच्या ऱ्हदयशस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. तसेच या कार्यक्रमांतर्गत कर्णबधीर आजार असलेल्या 12 बालकांची कॉकलिअर इप्लांट शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. या योजनेचा लाभ घेतलेल्या व योग्य उपचार मिळालेल्या पालकांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.  

*****  

No comments: