जिल्हा महिला व बालविकास कार्यालयात
जागतिक महिला दिन साजरा
महिला बचतगटांनी हळदीवर प्रक्रिया करुन उत्पादन केल्यास
आर्थिक सुबत्ता तयार करता येईल
--- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
हिंगोली, दि. 08
(जिमाका) : शेतीशिवाय आपल्याला पर्याय नाही. या शेतीवर
विविध उद्योग उभारावयाचे आहेत. आपली हळद जिल्ह्यात, राज्यात तसेच देशाबाहेर जात
आहे. आपल्या हळदीला जीआय नामांकन मिळाले तर ही हळद जागतिक बाजारपेठेत पोहोचणार
आहे. त्यामुळे सर्व महिला बचतगटांनी हळदीवर प्रक्रिया करुन
त्याचे विविध उत्पादन बाजारात उपलब्ध करुन दिल्यास आर्थिक सुबत्ता तयार करता येईल.
या माध्यमातून सर्व महिलांना सक्षम करता येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर यांनी आज केले.
येथील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी
कार्यालयात जिल्हा महिला व बालविकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त
विद्यमाने जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. पापळकर
बोलत होते. यावेळी महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे, जिल्हा कौशल्य विकास आयुक्त
राजपाल कोल्हे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे समन्वयक विलास जगताप, जिल्हा उद्योग
केंद्राचे उद्योग निरीक्षक गोपाळ पवार, सेवासदनच्या मीरा कदम यांची प्रमुख उपस्थिती
होती.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री.
पापळकर म्हणाले, महिलांनी मागील तीन कोविडच्या लाटेमध्ये आपापली
घरे, कुटुंब अत्यंत चांगल्या प्रकारे सांभाळली आहेत. त्यामुळे त्यांच्या शैार्याला
सलाम करुन त्यांचे अभिनंदन केले व महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कौशल्य
विकास विभागाच्या माध्यमातून आवश्यक तांत्रिक प्रशिक्षण देऊन महिलांना प्रशिक्षित
करण्याचे कार्य करावे. महिला बाजारांमध्ये
चांगल्या पध्दतीने उत्पादनाची विक्री करु शकतात. यासाठी महिलांनी त्यांच्याकडे
असलेल्या सुप्त गुणांना वाव द्यावा, असे आवाहन केले. माविममुळे अनेक गट व संस्था
निर्माण झाल्या आहेत. बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण पातळीवर आर्थिक व्यवस्था
निर्माण झाली आहे. माविमच्या सहयोगिनींनी त्याला महत्वाचे आर्थिक बळ मिळाले आहे.
यामध्ये आयसीआयसीआय बँकेचे मोठे योगदान आहे. आयसीआयसीय बँक ग्रामीण भागापर्यंत
पोहोचली आहे. असेच काम मोठ्या जोमाने सुरु ठेवावे. आपला जिल्हा औद्योगिक व आर्थिक
दृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे शेतीवर
आधारित विविध उद्योग उभारता येतील, असे श्री. पापळकर यांनी सांगितले.
तसेच येथील सेवासदनच्या मीरा कदम यांचे काम चांगले आहे. त्यांनी आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील मुलांसाठी सेवासदन
नावाचे वसतीगृह सुरु केले आहे. या वसतीगृहाला भेट दिल्यानंतर सामाजिक बांधिलकी कशी
असते, समाजाचे रुण कसे फेडायचे याचे उत्कृष्ट उदाहरण पहावयास मिळेल. त्या शिक्षिका
असल्यामुळे तेथील मुलांना चागंले वळण लावले आहे. त्यांनी एका मुलांला मेडिकलला
लावले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी दिली.
यावेळी उद्योग निरीक्षक जी. एम. पवार यांनी जिल्हा उद्योग
केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. मीरा कदम यांनी
महिला सबलीकरणाची माहिती दिली. तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे
यांनी मुली व महिलांच्या अनुषंगाने लिंगभेद संवेदनशिलता, मुलीची छेडछाड, मुलींचे
घटते प्रमाण, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण, हुंडा प्रतिबंध
अधिनियमांची महिलांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनाचे काम
माया सुर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रमाता जिजाऊ व
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन दीप
प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी महिला दिनाची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाच्या
यशस्वीतेसाठी माया सुर्यवंशी, सुनिल वाठोरे, विद्या नागशेट्टीवार, रेखा भुरके,
निलेश कोटलवार, उर्मिला तांबे यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहयोगिनी महिला,
वन स्टॉप सेंटर येथील महिला व परिसरातील महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
******
No comments:
Post a Comment