प्रशासनाच्या
सतर्कतेमुळे केंद्रा बु. येथील ऐनवेळी होणारा बालविवाह थांबविण्यात यश
हिंगोली, (जिमाका) दि.
23 : सेनगाव तालुक्यातील मौजे केंद्रा (बु.) येथे आज दि. 23 मार्च, 2022
रोजी सकाळी 10.00 वाजता अल्पवयीन बालिकेचा बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती
मिळताच बालविवाह निर्मूलन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या आदेशानुसार गोरेगाव पोलीस स्टेशनच्या
सहायक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील व त्यांचा स्टाफ यांच्या सहकार्याने तसेच
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्ही. जी. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा
बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी गणेश मोरे, जरीबखॉन पठाण,
सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, समुपदेशक सचिन पठाडे, क्षेत्रीय कार्यकर्ता
अनिरुध्द घनसावंत आदींनी विवाहस्थळी भेट देऊन बालिकेचे आणि त्यांच्या पालकांचे
समुपदेशन करुन होणारा बालविवाह थांबविला.
यावेळी ग्राम बाल सरंक्षण
समिती, बालविवाह प्रतिबंध अधिकारी तथा ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका तथा सदस्य सचिव,
गावातील सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष इत्यादी व्यक्तींच्या समक्ष कुटुंबियांकडून
आम्ही बालिकेचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न करणार नाही असा लेखी जबाब
घेण्यात आला.
जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बालविवाह प्रतिबंध
समिती स्थापन आहे. तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने जिल्ह्यात बालविवाह
प्रतिबंधासाठी विविध ठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले आहेत. शासनाने
बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 नुसार मुलीचे लग्नाचे वय 18 वर्षे व मुलांचे वय 21
वर्षे ठरविले आहे. परंतु ग्रामीण
भागामध्ये अनेक ठिकाणी नागरिक आपल्या मुलांचे कमी वयात लग्न लावून देत आहेत असे
चित्र पहावयास मिळत आहे. बालविवाह होत असल्यास गोपनीय माहिती कोणताही नागरिक 1098
या टोल फ्री क्रमांकावर देऊ शकतात, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी
विठ्ठल शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
*****
No comments:
Post a Comment