राज्य शासनाच्या दोन
वर्षपूर्तीनिमित्त
लोककलांच्या माध्यमातून
जन कल्याणकारी योजनांचा जागर
हिंगोली, दि. 11 (जिमाका) : राज्य
शासनाच्या दोन वर्षपूर्ती निमित्त राज्यात राबविण्यात आलेल्या विविध जन कल्याणकारी
योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व
जिल्हा माहिती कार्यालयातर्फे हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात गावोगावी लोककलांच्या
माध्यमातून जागर सुरु आहे.
महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण
झाल्यामुळे जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती जयभवानी कला
मंडळाचे नारायण घोंगडे यांनी गोंधळाच्या
माध्यमातून रात्री वसमत तालुक्यातील रेवलगाव येथे व आज अकोली येथे मनोरंजनाच्या
माध्यमातून लोकप्रबोधन करत दिली. संत गजानन महाराज लोककला व पथनाट्य मंडळाचे
नामदेव कल्याणकर यांच्या पथकानेही रात्री सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे व आज सेनगाव
तालुक्यातील वरुड समद, सरकाळी, हिंगोली तालुक्यातील गिलोरी येथे लोककलेच्या
माध्यमातून मनोरंजन करत शासनाच्या विविध योजनांची, उपक्रमांची जनजागृती केली. तर
सूर्यप्रकाश बहुउद्देशीय सेवा संस्थेचे कलापथक प्रमुख शाहीर प्रकाश दांडेकर यांनी
शाहिरीच्या माध्यमातून रात्री अंजनवाडा तांडा येथे तर आज मेथा, साळणा, कोंडसी येथे
शासनाच्या योजनांची, उपक्रमांची जनजागृती करण्यात आली. या कलापथकांच्या
कार्यक्रमाला गावागावांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
वरील कलापथकाच्या माध्यमातून शासनाच्या योजना
साध्या आणि सोप्या भाषेत लोकगीते, भारुडे, गवळणी, बतावणी या माध्यमातून जनतेपर्यंत
पोहचविणे हाच उद्देश माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा आहे. त्यामुळे जिल्हा
माहिती कार्यालय, हिंगोली यांच्याकडून या कलापथकांचा जागर 17 मार्च पर्यंत सुरु
आहे. जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या या जागराचा
नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
******
No comments:
Post a Comment