भूकंपाचे धक्के बसणाऱ्या गावातील घरांच्या
पत्रावरील दगड काढण्याचे काम प्राधान्याने करावे
--- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
हिंगोली, दि. 08
(जिमाका) : जिल्ह्यातील 40 गावांमध्ये भूकंपाचे वारंवार
धक्के बसत आहेत. त्यासाठी जिवित हानी टाळण्यासाठी या गावातील ज्या घराची छते पत्र्याची
आहेत, त्यांच्या घराच्या पत्रावरील दगड काढण्याचे काम प्राधान्याने करावेत, असे
निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पूर्व तयारी व सतत होणाऱ्या
भूकंपाच्या धक्क्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आढावा बैठक आयोजित करण्यात
आली होती. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे, आपत्ती व्यवस्थापन तज्ञ उल्हास केळकर, सर्व
तहसीलदार, सर्व गट विकास अधिकारी, भूकंपाचे धक्के बसणाऱ्या संबंधित गावचे सरपंच, ग्रामसेवक
यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री.
पापळकर म्हणाले, भूकंपाचे धक्के बसणाऱ्या गावातील घरावरचे दगड काढून तार बांधण्याचे
काम प्राधान्याने करावेत. यासाठी संबंधित गावचे सरपंच, ग्रामसेवक यांनी तातडीने कार्यवाही
करावी. सर्वप्रथम या भूकंपग्रस्त गावातील घरांची पक्की घरे, झोपडीची घरे आणि पत्र्यांची
घरे याप्रमाणे वर्गीकरण करुन माहिती तयार करावी.
त्यासाठीचा प्रस्ताव तयार करावा. सर्व गावांचा एकत्रित प्रस्ताव तयार करुन शासनाकडे
पाठविण्यात येईल. वेळप्रसंगी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा वापर करावा. तसेच सर्व शाळांमध्ये
भूकंप झाल्यानंतर बाहेर कसे पडावे, परिसर कसा ठेवावा याबाबतचे प्रशिक्षण कार्यक्रमाचे
आयोजन करावे. तसेच शाळेतील मुलांमार्फत जनजागृती करावी. पोलीस विभागाच्या मदतीने पाच लोकांची टीम करुन संबंधित
गावातील लोकांना माहिती द्यावी व पत्रावरील दगड काढण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना
दिल्या.
तसेच आगामी येणाऱ्या मान्सूनमध्ये पूर
परिस्थती हाताळण्यासाठी पोलीस, होमगार्ड, नगर परिषद आदी विभागातील दहा-दहा जणांची टीम
तयार करुन त्यांना बोट वापरण्याचे, रोपवेचे प्रशिक्षण द्यावे. यासाठी प्रत्येक तालुक्यातील
पाच पोलीस कर्मचारी व पाच इतर कर्मचारी यांचा ग्रुप तयार करुन प्रशिक्षण देणे आवश्यक
आहे. यासाठी योग्य नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिल्या.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकरी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी व आपत्ती
व्यवस्थापन तज्ञ उल्हास केळकर यांनीही विविध प्रकारच्या उपाययोजना करण्याची
आवश्यकता असल्याचे सांगितले .
******
No comments:
Post a Comment