17 March, 2022

 होळी, धुलीवंदन व रंगपंचमी सणासाठी मार्गदर्शक सूचना जारी

 

हिंगोली, दि. 17 (जिमाका) : राज्यात 17 मार्च रोजी होळी, 18 मार्च रोजी धुलिवंदन व 22 मार्च, 2022 रोजी रंगपंचमी हे सण साजरे करण्यात येणार आहेत. ही सणे कोरोना नियमाचे पालन करुन साजरी करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केले आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी हिंगोली जिल्ह्यात होळी, धुलिवंदन व रंगपंचमी साजरी करण्यासाठी खालीलप्रमाणे आदेश दिले आहेत.

महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या दि. 1 मार्च, 2022 च्या परिपत्रकान्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. होळी, शिमगा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी दि. 17 मार्च, 2022 रोजी होळीचा सण आहे. कोविड संक्रमणामुळे हा सण शक्यतोवर गर्दी न करता कोविड अनुरुप वर्तणूक नियमांचे पालन करुन साजरा करावा. तसेच दि. 18 मार्च, 2022 रोजी धुलिवंदन व 22 मार्च, 2022 रोजी रंगपंचमी हे सण साजरे करण्यात येणार आहेत. या सणानिमित्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करण्यात येत असते. परंतु कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी धुलिवंदन व रंगपंचमी सण साधेपणाने साजरे करावेत.

होळी, शिमगा सणानिमित्ताने (विशेष करुन कोकणात) पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षी देखील पालखी घरोघरी न नेता स्थानिक मंदिरातच दर्शनाची व्यवस्था होईल यासाठी स्थानिक प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. तसेच त्याठिकाणी गर्दी होणार नाही व कोविड अनुरुप वर्तणूक  नियमांचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घ्यावी.

कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच पोलीस प्रशासन , स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे. या आदेशाची अंमलबजावणी  करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी जि.प.हिंगोली, पोलीस अधीक्षक हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी नगर परिषद/नगर पंचायत तसेच सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची असेल, असेही आदेशात नमूद केले आहे.

*****

No comments: