10 March, 2022

 







शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेच्या चित्ररथाचा

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते शुभारंभ

 

हिंगोली, (जिमाका) दि. 10 : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनाची व सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती संबंधित लाभार्थ्यांना व्हावी यासाठी सर्वसाधारण व अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या चित्ररथाचा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते आज हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.

या चित्ररथावर योजना माझ्यासाठी सर्वांसाठी अंतर्गत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, माझी कन्या भाग्यश्री, स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, दुधाळ जनावरांचे गट वाटप, शालेय शिक्षण विभाग तर योजना सामाजिक न्यायाच्या अंतर्गत रमाई आवास (घरकुल) योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना यासह अनेक योजनांची व कोरोना जनजागृतीची माहिती चित्ररथावर देण्यात आली आहे.

सोबतच सर्वसाधारण आणि समाज कल्याणच्या विविध योजनांचे ऑडिओ जिंगल्सद्वारे लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती देवून त्यांना संबंधित योजनेचा लाभ घेण्यास मदत होणार आहे. हा चित्ररथ हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात फिरणार असून अनेक लाभार्थ्यांना तसेच नागरिकांना याचा लाभ होणार आहे.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव चक्के, माहिती सहाय्यक चंद्रकांत कारभारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

*****

No comments: