09 March, 2022









दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची

शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांचा लोककलांच्या माध्यमातून गावोगावी जागर

 

हिंगोली, दि. 09 (जिमाका) : गेल्या दोन वर्षात राज्यात राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आजपासून जिल्ह्यात शासनाच्या जन कल्याणकारी योजनांचा लोककलांच्या माध्यमातून जागर करण्यास प्रारंभ करण्यात आला.

शासनाच्या योजना साध्या आणि सोप्या भाषेत लोकगीते, भारुडे, गवळणी, बतावणी या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविणे हाच उद्देश माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा आहे. त्यामुळे जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली यांच्याकडून या कलापथकांचा जागर दिनांक 9 ते 17 मार्च पर्यंत करण्यात येणार आहे. लोककलेच्या माध्यमातून निवडक मोठ्या गावांमधून गर्दीच्या ठिकाणी विशेषतः बाजाराच्या ठिकाणी लोककलेच्या या कार्यक्रमास आजपासून प्रारंभ झाला आहे. याची सुरुवात वसमत तालुक्यातील पुयनी येथून झाली. तसेच आज पंचायत समिती हिंगोली, कळमनुरी तालुक्यातील मालेगाव व पारडी येथे लोककला पथकाचे कार्यक्रम घेण्यात आले.

 यामध्ये कन्यादान योजना, सामाजिक न्याय विभागाकडील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना, रमाई आवास योजना,  कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी 5 लाखांची मुदत ठेव योजना यांसह अनेक योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम या कलापथकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

जिल्ह्यामध्ये आजपासून प्रारंभ झालेल्या या जागराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

******

 

No comments: