07 June, 2018

जिल्ह्यात कलम 144 लागू जिल्ह्यातील 7 केंद्रांवर 1728 परीक्षार्थी देणार लोकसेवा आयोगाची परीक्षा


जिल्ह्यात कलम 144 लागू
जिल्ह्यातील 7 केंद्रांवर 1728 परीक्षार्थी  देणार लोकसेवा आयोगाची परीक्षा

        हिंगोली, दि.07: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत  महाराष्ट्र गट क पूर्व परीक्षा 2018 हिंगोली मुख्यालय ठिकाणी दिनांक 10 जून रोजी सकाळी 10.30 ते 12.00 या वेळेत  घेण्यात येणार आहे . सदर परीक्षेसाठी  एकूण 07 उपकेंद्रावर  एकूण 1 हजार 728 परीक्षार्थी  परीक्षा देणार आहेत.
                सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून परीक्षेत बसण्याच्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर डिजिटल डायरी, कॅल्क्युलेटर, पुस्तके, पेपर्स, पेजर मायक्रोफोन, मोबाईल फोन कॅमेरा अंतर्भूत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिमकार्ड, दूरसंचार साधने म्हणून वापरण्या योग्य कोणतीही वस्तू, बॅग्ज अथवा शासनाने बंदी घातलेल्या इतर कोणत्याही साहित्यासह परीक्षा केंद्राच्या परीसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास अथवा स्वत:जवळ बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. तसेच सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून परीक्षा केंद्रावरील कायदा व व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी परीक्षा केंद्रावर  फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आली आहे. सदर परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच परीक्षा केंद्रावर मुख्य प्रवेशद्वारावर प्रत्येक परीक्षार्थींची पोलीस यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात येणार आहे.
                सदर परीक्षेच्या दरम्यान परीक्षा  कक्षात उमेदवारांकडे मोबाईल फोन / दुरसंचार  साधनासह आयोगामार्फत बंदी घातलेले  इतर कोणतेही साहित्य आढळून आल्यास तसेच कॉपीचा/गैरप्रकाराचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवाराविरुध्द फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. याची सर्व संबंधित परीक्षार्थींनी नोंद घ्यावी.
                 तसेच सदर परीक्षेची पूर्व तयारी बाबतचे पहिले प्रशिक्षण दिनांक 6 जून रोजी घेण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणास उपकेंद्र  प्रमुख 01, पर्यवेक्षक 07, समवेक्षक 16 हे गैरहजर असल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस  देण्यात आल्या आहेत. तसेच उपरोक्त  गैरहजर उपकेंद्र प्रमुख/पर्यवेक्षक/समवेक्षक दुसऱ्या प्रशिक्षणास हजर न झाल्यास त्यांचे विरुध्द प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार आहे .
0000

No comments: