पीक कर्ज वाटप मेळाव्याचे आयोजन करावे
---
किशोर तिवारी
हिंगोली, दि.
16 :- खरीप हंगामासाठी पात्र शेतकऱ्यांपैकी 80 टक्के शेतकऱ्यांना 31 मेपर्यंत पीक कर्ज वाटप करण्याचे निर्देश मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यास सन 2016-2017
करीता 960 कोटी एवढे पीक कर्जाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. परंतु, आतापर्यंत केवळ 34.14 टक्के इतकेच पीक कर्ज बँकांनी शेतकऱ्यांना वितरीत केले आहे. तरी सर्व बँकांनी पीक कर्ज वाटप मेळाव्याचे आयोजन करावे, असे कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी निर्देश दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित खरीप पीक कर्ज आढावा बैठकीतते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नईम कुरेशी, उपविभागीय अधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी राहूल खांडेभऱ्हाड, उपविभागीय अधिकारी अमित शेंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. तिवारी पुढे म्हणाले की, हिंगोली जिल्ह्यास 960 कोटी पीक कर्जाचे उद्दिष्टापैकी 750 कोटींचे उद्दिष्ट हे राष्ट्रीयकृत बँकाना होते. परंतु, राष्ट्रीयकृत बँकानी आतापर्यंत केवळ 226 कोटी 30 लाख कर्ज वाटप केले आहे. शेतकऱ्यांना 31 मे पूर्वी सदर पीक कर्ज वाटप होणे, अपेक्षित होते. कर्ज वाटप न केल्याने शेतकऱ्यांना खरीपाची पेरणी करता येत नाही. यामुळे या बँकाना नोटीस देवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश श्री. किशोर तिवारी यांनी यावेळी दिले.
राष्ट्रीयकृत बँकांनी उद्दिष्टापैकी खुप कमी प्रमाणात पीक कर्ज वाटप केले आहे. कर्ज पुरवठा करणे हे कर्तव्य असून त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाने घेतलेली आहे, असे असतांनाही राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरीत करीत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी आप-आपल्या कार्यक्षेत्रातील तालुक्यात पीक कर्ज वाटप मेळाव्याचे आयोजन करुन तात्काळ शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरीत करावेत. अन्यथा ज्या बँका याबाबत दिरंगाई अथवा कर्ज वाटप करणार नाहीत अशा बँकावर जबाबदारीनिश्चित करुन कारवाई करणार तसेच पीक कर्जाकरिता आवश्यक असलेल्या अतिरिक्त निधीदेखील तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे श्री. तिवारी यावेळी म्हणाले.
ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यास विलंब अथवा टाळाटाळ करत असेल त्यांनी जिल्ह्याचे अग्रिम बँक मॅनेजर श्री. मदान (मो.
9423102684) आणि कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष श्री. किशोर तिवारी (मो.
9422108846) या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करण्याचे आवाहन श्री. किशोर तिवारी यांनी यावेळी केले.
बैठकीपूर्वी जिल्ह्यातील खातेदार व कर्जदार शेतकरी, जिल्ह्यातील कर्ज वाटप करणाऱ्या बँका , जिल्ह्यातील बँकाची स्थिती व त्यांचा लक्षांक , वर्षनिहाय दुष्काळग्रस्त गावे (50 पैशापेक्षा कती आणेवरी असलेले गावांची माहिती), मागील वर्षातील 2015-2016
मधील पीक कर्ज वाटप व शेतकरी संख्या तसेच थकीत कर्जाचे पुनर्गठण , खरीप -2015 मधील पीक कर्जाचे पुनर्गठन, सन 2016-2017
साठी बँक निहाय पीक कर्जाचा लक्षांक व साध्य , जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक स्थिती , जिल्हा बँकेकडील निधी उपलब्धता-नाबार्ड फेरकर्ज 2016-2017
, शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्धता अतिरिक्त लागणाऱ्या निधीची आवश्यकता आदिबाबतची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था,हिंगोली यांनी पॉवर प्रझेटेंशनद्वारे सादर केली.
यावेळी बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती ढेरे, सेनगांव तहसीलदार श्री. मेंढके, औंढा तहसीलदार श्री. मदनुरकर, कळमनुरी तहसीलदार डॉ. प्रतीभा गोरे , वसमत तहसीलदार सुरेखा नांदे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बी. पी. लोंढे यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख आणि बँक मॅनेजर यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यात 340 कोटी 40 लाख पीक कर्जाचे वितरण
जिल्ह्यात आज रोजीपर्यंत 34 टक्के पीक कर्ज वितरण करण्यात आले आहे. सन 2016-2017
हंगामासाठी 968 कोटी 50 लाख उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. यापैकी आतापर्यंत 72 हजार 892 शेतकऱ्यांना 340 कोटी 40 लाख पीक कर्ज वितरण करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांनी 226 कोटी 30 लाख, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 64 कोटी 7 लाख तर ग्रामिण बँकेने 50 कोटी 3 लाख रुपयांचे पीक कर्ज वितरण केले आहे.
*****
No comments:
Post a Comment