हिंगोली,दि.21: राज्यातील जास्तीत-जास्त
तरुणांपर्यंत मुद्रा बँक योजनेचा लाभ पोहचविण्यासाठी तसेच या योजनेचा ग्रामीण तसेच
दुर्गम भागात प्रभावी प्रचार, प्रसार आणि समन्वयासाठी जिल्हास्तरीय समन्वय समितीची
बैठक जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली (दि. 20 जुलै, 2016 रोजी) त्यांच्या
कक्षात संपन्न झाली.
यावेळी बैठकीस समिती सदस्य जिल्हा अग्रणी बँकेचे
व्यवस्थापक महेश मदान, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांचे प्रतिनिधी जी.
एम. पवार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे उपसंचालक यांचे प्रतिनिधी प्राचार्य एम. ए.
घाडगे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक संचालक पी.एस.
खंदारे आणि जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव अरुण सुर्यवंशी यांची उपस्थिती
होती.
या बैठकीत मुद्रा बँक योजनेचा ग्रामीण आणि दुर्गम
भागातील जनमानसात प्रभावीपणे प्रचार, प्रसार आणि समन्वय करण्यासाठी नियोजन विभागाच्या
दि. 14 जून 2016 रोजीच्या शासन निर्णयानूसार मुद्रा बँक योजना समन्वय समिती स्थापन
करण्यासंबंधी चर्चा झाली.
जिल्हा अग्रणी बँकेने जिल्ह्यातील बँक प्रमुखांच्या
वेळोवेळी बैठका घेवून सन 2016-17 या आर्थिक वर्षासाठी या योजनेंतर्गत बँकांना शिशु
गट, किशोर गट आणि तरुण गट निहाय कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करून द्यावे. तसेच कर्ज
वाटपाच्या उद्दिष्टाप्रमाणे लक्ष्यपुर्तीसाठी संनियंत्रण करावे आणि संबंधित यंत्रणाबरोबर
समन्वय ठेवावा. सर्व बँकांनी सदर योजनेचा लाभ छोटे-छोटे उद्योग करु इच्छिणाऱ्या पात्र
लाभार्थ्याना द्यावा. जिल्हा अग्रणी बँकेने सर्व बँकामार्फत सदर योजनेचे माहिती पुस्तिका
/ घडीपत्रिका, फ्लेक्स आदी प्रसिध्दी साहित्य तयार करुन जिल्ह्यातील सर्व औद्योगिक
प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन संस्था, विविध कौशल्यावर आधारित प्रशिक्षण संस्था तसेच
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगर पंचायत, जिल्हा परिषद आणि नगर परिषद सदस्य यांना
देवून त्यांच्यामार्फत व्यापक प्रसिध्दी करावी. जिल्हा उद्योग केंद्र, औद्योगिक
प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग यांच्या मार्फत
आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्यात तरुणांना मुद्रा बँक योजनेची माहिती द्यावी.
जेणेकरून तरुण उद्योजकांना व्यवसाय उभारणीमध्ये त्यांचे कर्तुत्व दाखविण्यास वाव मिळेल.
तसेच जिल्हा माहिती आधिकारी यांनी मुद्रा बँक योजनेबाबत
वेळोवेळी वृत्त, लेख , यशकथा वर्तमानपत्रात प्रसिध्द करावीत. तसेच लोकल केबल चित्रपटगृह,
दुरदर्शनव्दारे योजनेची प्रसिध्दी करावी. तसेच जिंगल्सद्वारे आणि त्यांच्या अधिनस्त जाहिरात फलकांवर योजनेची विस्तृत
माहिती असलेले फ्लेक्स लावून प्रसिध्दी करावी.
मुद्रा बँक योजना राबविणाऱ्या संबंधित विभागांनी सदर योजनेच्या महत्वाच्या कार्यक्रमांची
प्रसार व प्रसिध्दी व्यापकरित्या होण्यासाठी स्थानिक स्तरावर आयोजित कार्यक्रमाची माहिती
जिल्हा माहिती अधिकारी यांना कळवावी. अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. भंडारी यांनी यावेळी
बैठकीत दिल्या.
*****
No comments:
Post a Comment