29 July, 2016

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत जास्तीत-जास्त शेतकऱ्यांना सहभागी करुन घ्यावे
   --- जिल्हाधिकारी अनिल भंडारी
हिंगोली, दि.29 :-  प्रधानमंत्री  पिक  विमा  योजनेबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व बँकाना येणाऱ्या अडचणीबाबत संबंधीत विमा कंपनीचे अधिकारी यांनी उपस्थित राहुन दि. 31 जुलै, 2016 पर्यंत बँकांना व शेतकऱ्यांना पिक विमा संदर्भात येणा-या अडचणी सोडवून जास्तीत-जास्त शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी करुन घेण्याचे, निर्देश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिले आहे.
प्रधानमंञी  पिक  विमा  योजनेबाबत जिल्ह्यातील शेतक-यांना व बँकाना येणा-या अडचणीबाबत जिल्हाधिकारी यांनी इफको टोकियो जनरल ईन्शुरन्स कंपनी, अग्रणी बँक व्यवस्थापक, जिल्हा उपनिबंधक, कृषि विभाग यांची बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी श्री. भंडारी म्हणाले की, शेतकऱ्यांना विमा कंपनीनेही  विमा प्रस्ताव उपलब्ध करुन दिलेले आहेत. परंतु कृषि विभागाने पूरवठा केलेले विमा प्रस्ताव (फॅार्म) देखील त्यांना वापरता येणार आहे. तसेच प्रत्येक पिकासाठी शेतकऱ्यांना स्वतंत्र प्रस्ताव भरण्याची गरज नाही. एका शेतक-यास एका महसूल मंडळासाठी सर्व पिकासाठी एकच फॅार्म चालेल. प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र फॅार्म भरण्याची गरज नाही. पिक कर्ज घेतलेल्या शेतक-यांनी त्यांचा पिक विमा त्या बँकेमार्फतच भरण्याचे बंधनकारक आहे. मात्र               शेतक-यांनी सदर बँकेस संपर्क करुन आपला पिक विमा भरल्याबाबतची खात्री करुन घ्यावी. एखाद्या शेतक-याने एका पिकासाठी कर्ज घेतले मात्र प्रत्यक्षात दुस-याच पिकाची लागवड केली असल्यास अशा शेतक-याने बँकेस पीक बदल केल्याबाबतचा प्रस्ताव सादर करणे आवश्यक असून त्याची पोच घ्यावी तसेच उर्वरित विमा हप्ता बँकेत भरावा. अन्यथा ज्या क्षेत्रासाठी व पिकासाठी पीक कर्ज घेतले आहे ते क्षेत्र वगळुन उर्वरित क्षेञाचा पीकविमा बिगर कर्जदार शेतकरी म्हणुन स्वतंत्रपणे वेगळा भरावा. थकबाकीदार (NPA) शेतक-यांचा पिक विमा बिगर कर्जदार म्हणुन संबंधित बँकानी भरुन घ्यावा, असे ही निर्देश यावेळी जिल्हाधिकारी भंडारी यांनी संबंधीतांना दिले. दत्तक बँकेतच विमा भरण्याची कोणतीही अट नसून शेतक-यांचे हिंगोली जिल्ह्यामध्ये ज्या बँकेत बचत खाते आहे त्या बँकेत ते पिक विमा भरु शकतात. शेतकऱ्यांनी स्वघोषित केलेला पिक पेरा चालेल मात्र त्यावर संबधीत तलाठ्याची स्वाक्षरी व शिक्का असणे आवश्यक आहे. असेही जिल्हाधिकारी श्री. भंडारी यावेळी म्हणाले.

*****

No comments: