01 January, 2019

ईव्हीएम व व्हीव्हीपॅट संदर्भात शंकांचे निरसन करून घ्यावे - डॉ. पुरुषोत्तम भापकर



ईव्हीएम व व्हीव्हीपॅट संदर्भात शंकांचे निरसन करून घ्यावे
- डॉ. पुरुषोत्तम भापकर

हिंगोली, दि.1:  भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या प्रात्यक्षिकाद्वारे विशेष मोहिम हाती घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. मोहिमेदरम्यान नागरिकांनी सहभागी होऊन ईव्हीएम व व्हीव्हीपॅट संदर्भात शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केले.
विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या उपस्थितीत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचे प्रशिक्षण आज हिंगा्रली तालुक्यातील संतूक पिंपरी येथे आयोजित प्रशिक्षण शिबीरात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य वन संरक्षक प्रकाश महाजन, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी खुदाबक्श तडवी, उपविभागायी अधिकारी अतुल चोरमारे आणि श्री. फुलारी, तहसिलदार गजानन शिंदे यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. भापकर म्हणाले की, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर केला जाणार आहे. नागरिकाच्या मनात कुठलाही संभ्रम राहू नये म्हणून व्हीव्हीपॅट यंत्रणेची तरतूद निवडणूक आयोगाने केली आहे. या मशीनबाबत नागरिकांच्या मनातील शंका दूर करण्याच्या उद्देशाने नागरिकांसाठी सर्वत्र ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत जनजागृतीचे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.
व्हीव्हीपॅट हे प्रिंटरप्रमाणे काम करणारे यंत्र असून, मतदान कक्षातील बॅलेट युनिटसोबत ते जोडलेले राहील. मतदार जेव्हा मतदान करतील तेंव्हा व्हीव्हीपॅटच्या स्क्रीनमध्ये सात सेकंदापर्यंत पेपरस्लीप डिस्प्ले होईल. अशाप्रकारे व्हीव्हीपॅटमुळे ज्या उमेदवाराला मत दिले आहे, त्याच उमेदवाराला मत पडल्याची खात्री मतदार करू शकणार आहे. इतकी ही सुस्पष्ट व पारदर्शी प्रक्रिया आहे. ज्या नागरिकांचे मतदान यादीत नाव नाही किंवा नुकतेच ज्यांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केली, त्यांनी तत्काळ मतदान यादीत आपले नाव नोंदवावे. नागरिकांनी त्यात सहभागी होऊन निवडणुकीच्या पवित्र व राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावे असे ही डॉ. भापकर यावेळी म्हणाले.
प्रारंभी नागरिकांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांची माहिती देण्यात आली. तसेच नागरिकांकडून मतदान करण्यात आले. यावेळी प्रात्यक्षिकात ज्या उमेदवाराला मतदान केले, त्यालाच मत मिळाल्याची खात्री नागरिकांना करता येत असल्याचे निदर्शनास आणुन दिले.
****


No comments: