आयुष्यमान
भारत योजने अंतर्गत नागरिकांना मिळणार मोफत उपचार
-पालकमंत्री दिलीप कांबळे
हिंगोली,दि.26: केंद्र शासनाची महत्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन
आरोग्य योजने’ चा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाला असून, या
आरोग्य योजनेमुळे हिंगोली जिल्ह्यातील 1 लाख 7 हजार 28 कुटुंबाना मोफत उपचाराचा
लाभ मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.
गोरेगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्राचे उद्घाटन
कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री दिलीप कांबळे बोलत होते. यावेळी आमदार तान्हाजी
मुटकुळे, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी.
तुम्मोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे
कार्यकारी अभियंता श्री. घुबडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री कांबळे म्हणाले की, आयुष्यमान भारत जन आरोग्य
योजनेसोबतच राज्य शासनाची ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ ही एकत्रितपणे राबविण्यात येत
आहे. आयुष्यमान जन आरोग्य योजनेचा लाभ देशातील प्रत्येक नागरिकाला मिळणार असून,
यात धर्म, जात, पंथ असा भेदभाव असणार नाही. या योजने अंतर्गत 1300 हून अधिक गंभीर
आजारांवर लाभार्थ्यांना 5 लाखापर्यंत मोफत उपचार देण्यात येणार आहे. रुग्णांना हे
उपचार देशातील कोणत्याही शासकीय किंवा खासगी रुग्णालयांमध्ये घेता येणार आहे. या
महत्वकांक्षी योजनेमुळे देशातील नगारिकांना आरोग्य सुरक्षा प्राप्त झाली असून,
नागरिकांनी या योजने अंतर्गत आपल्या आरोग्याची तपासणी करुन घेत गंभीर आजारापासून
सावध राहण्याकरीता वेळीच निदान करुन घ्यावे. तसेच सर्व नागरिकांनी आपला अपघात विमा
काढून घ्यावा असेही आवाहन पालकमंत्री श्री. कांबळे यांनी केले.
यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना
आयुष्यमान भारत योजनेचे कार्डचे वितरण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने
नागरिकांची उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. कांबळे यांच्या हस्ते भूमीपूजन
पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते गोरेगाव येथील 31 कि.मी.
लांबीच्या सिमेंट काँक्रीट रस्ता आणि विविध विकास कामांचे देखील यावेळी भूमिपूजन
करण्यात आले.
****
No comments:
Post a Comment