01 January, 2019

टंचाई सदृश्य परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणानी संवेदनशीलरित्या कामे करावी -डॉ. पुरुषोत्तम भापकर








टंचाई सदृश्य परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणानी संवेदनशीलरित्या कामे करावी
-डॉ. पुरुषोत्तम भापकर

हिंगोली,दि.1: यावर्षी मराठवाड्यात कमी पाऊस झाल्याने टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी संवेदनशीलरित्या कामे करावी अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर यांनी दिल्या.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.सी. सभागृहात आयोजित टंचाईसदृश परिस्थिती व इतर योजनांचा आढावा बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी,  मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ. एच.पी तुम्मोड, अप्प्‍र जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बनसोडे, सहायक आयुक्त (विकास) अनंत कुंभार, अधिक्षक कृषि अधिक्षक (रोहयो) पोपट शिंदे, सहायक संचालक (रेशीम) श्री. हाके यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ.भापकर म्हणाले की, इतर जिल्ह्याच्या तूलनेत हिंगोली जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. परंतू पावसाने ओढ घेतल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थितीत निर्माण झाली आहे. या परिस्थीतीत काम करण्यासाठी 8 महिन्याचा कालावधी आहे. या कालावधीत अनेक लोकहिताची कामे करण्याची संधी प्रशासनाकडे आहे. या संकटाला संधी मानून सर्व यंत्रणानी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता आहे. सर्व विभागाच्या ग्राम, तालुका आणि जिल्हास्तरीय अधिकारी/कर्मचाऱ्यांनी योग्य समन्वयाने ग्राम विकासाच्या योजना राबविल्यास नागरिकांना या योजनचा फायदा मिळेल. हिंगोली जिल्ह्याला 10 हजार विहिरी मंजूर झाल्या असून, या विहिरीचे कामे लवकरात लवकर पूर्ण करावे. तसेच प्रत्येक तालुक्याला ग्रामसंपर्क अधिकारी नेमण्यात आला असून, ग्रामस्तरावर ग्राम संपर्क अधिकारी हा त्या गावाचा पालक अधिकारी असल्याने त्या गावातील सर्व विकासात्मक कामांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आठवड्यातील एक दिवस सर्व ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांनी एकत्र येवून गावातील विविध प्रश्न मार्गी लावावेत. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीं मध्ये या माध्यमातून ग्राम विकासाच्या योजना राबविल्यास गाव आणि नागरिकांना याचा फायदा होण्यास मदत होईल.
टंचाई सदृश परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील नागरिक हे कामाच्या शोधात इतरत्र स्थलांतरीत होत आहे. अशा नागरिकांची गाव निहाय माहिती तयार करावी. तसेच त्यांना रोहयो अंतर्गत कामे उपलब्ध करुन द्यावीत. सर्व यंत्रणांनी टंचाई परिस्थिती दूर करण्यासाठी नाविन्यपूर्ण कामे करावीत. तसेच टंचाईच्या परिस्थितीत जिल्ह्यातील पशुधनाकरीता चारा-पाणी उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्याकरीता संरक्षीत चाऱ्याचे योग्य नियोजन पशुसंवर्धन व कृषी यंत्रणांनी समन्वयाने करण्याचे निर्देश ही डॉ. भापकर यांनी यावेळी दिले.
यावेळी डॉ. भापकर यांनी पर्जन्यमान्य, पाणी टंचाई,  टँकर, चारा नियोजन, नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना, वृक्ष लागवड, वनीकरण, पशुसंवर्धन, रेशीम विकास, रोजगार हमी योजना आदी विषयांची सविस्तर माहिती संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.
            प्रारंभी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या योजना, टंचाई सदृश्य परिस्थिती तसेच विविध उपक्रमांची माहिती सादरीकरणांद्वारे दिली. यावेळी मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन यांनी 33 कोटी वृक्ष लागवडीचा कालबध्द कार्यक्रम आणि सहायक संचालक (रेशीम) श्री. हाके यांनी तूती लागवड विषयक सविस्तर माहिती दिली.
या बैठकीस जिल्ह्यातील सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
****



No comments: