13 January, 2019

गतीमान सेवा करीता कोषागार कार्यालयाचे आधुनिकीकरण - सुधीर मुनगंटीवार


वृत्त क्र.19                                                      दिनांक : 13 जानेवारी 2019

गतीमान सेवा करीता कोषागार कार्यालयाचे आधुनिकीकरण
- सुधीर मुनगंटीवार
हिंगोली, दि. 13: वित्त विभाग हा शासनाचा महत्वाचा विभाग असून या विभागातून नागरिकांना गतीमान  सेवा मिळाव्या याकरीता राज्यातील सर्व कोषागारे कार्यालयांचे आधुनिकीकरण करण्यात येत असल्याचे प्रतिपादन वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
येथील जिल्हा कोषागार कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी  वित्तमंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी पालकमंत्री दिलीप कांबळे, जि.प. अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार विप्लव बाजोरीया, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी आमदार गजानन घुगे, लेखा व कोषागारे विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, लेखा व कोषागारे विभागाचे संचालक ज. र. मेनन, लेखा व कोषागारे औरंगाबाद विभागाचे सहसंचालक डी.व्ही. जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुधाकर घुबडे आणि जिल्हा कोषागार अधिकारी पी. डी. पुंडगे यांची उपस्थिती होती.
 यावेळी बोलताना वित्‍त मंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, शासनाने नुकताच सातवा वेतन आयोग लागू केला असून, पेन्शन मध्ये पण वाढ करण्यात आली आहे. परंतू जनतेला याचा लाभ वेळेत नाही मिळाला तर याचा काही उपयोग नाही. याकरीताच नागरिकांना चांगल्या आणि गतीमान सेवा मिळण्यासाठी वित्त विभागाने अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले आहेत. याअनुषंगानेच राज्यातील कोषागार आणि उपकोषागार कार्यालय इमारतीचे नुतनीकरण, फर्निचर व बैठक व्यवस्था, संगणकीकरण आणि अनुषंगिक कामे, यासारख्या गोष्टीत एकसूत्रता आणण्यासाठी आधुनिकीकरण करण्यात येत असून, अनेक कार्यालयाचे कामे प्रगतीपथावर आहेत.
सर्व योजनाची गती वाढावी यासाठी शासनाने विविध उपक्रम व योजना कार्यान्वीत केल्या आहेत. तसेच माजी सैनिक राज्य शासनाच्या सेवेत आल्यानंतर त्यांना दोन्ही पेन्शन देण्याची आणि कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नीने पुर्नविवाह केल्यास पेन्शन सुरु ठेवण्याचा निर्णय वित्त विभागाने घेतला आहे. राज्य शासन हे जनतेच्या हिताचे काम करणारे शासन असून, जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे ही श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
पालकमंत्री श्री. कांबळे यावेळी म्हणाले की, हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत असून, जिल्ह्यात अनेक विकास कामे सुरु आहेत. राज्याचे वित्त मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आपल्या जिल्ह्यातील विकास कामाकरीता कधी ही निधी कमी पडू दिला नाही. यापूढे ही ते निधी उपलब्ध करुन देतील.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखा व कोषागारे विभागाचे संचालक ज. र. मेनन यांनी केले.  प्रारंभी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि पालकमंत्री यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन मार्डीकर यांनी केले तर जिल्हा कोषागार अधिकारी पी. डी. पुंडगे यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांची उपस्थिती होती.
****

No comments: