13 January, 2019

लोकशाहीचा केंद्रबिंदू विकास असायला पाहिजे - वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार



लोकशाहीचा केंद्रबिंदू विकास असायला पाहिजे
                                                                - वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार

हिंगोली,दि.13: आपल्या हातून राज्य आणि राष्ट्र निर्माणाचे उत्तम कार्य व्हावे या भावनेतून शासन आतापर्यंत काम करत आले आहे. राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा याकरीता लोकशाहीचा केंद्रबिंदू हा विकास मानुनच कार्य करायला पाहिजे, असे प्रतिपादन वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
येथील हिंगोली नगर परिषदेच्या विविध विकास कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी वित्त मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते, यावेळी पालकमंत्री दिलीप कांबळे, आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी आमदार गजानन घुगे, मुख्याधिकारी रामदास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
हिंगोली शहरातील विविध विकास कामाकरीता 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी 43 कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत उपलब्ध करुन दिला असून, उर्वरीत 7 कोटी रुपयांचा निधी देखील लवकर उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगत वित्त मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, हिंगोली नगर परिषदेत 35 नगर सेवक हे विविध पक्षाचे आहेत, परंतू शहराच्या विकासासाठी हे सर्व एकत्र येवून काम करतात. आणि हेच खरे लोकशाहीचे यश आहे. कारण शेवटी लोकसेवक म्हणुन जनतेसाठी आपण काय कार्य केले हे महत्वाचे ठरते. मराठवाडा पर्यायाने हिंगोली जिल्ह्याशी माझे जवळचे नाते आहे. आणि या जिल्ह्याच्या विकास कामासाठी कधी निधी कमी पडू देणार नाही असे मी वचन देतो, तसेच नरसी नामदेव येथील विकासकार्यासाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन लवकर उपलब्‍ध करुन देणार असल्याची ग्वाही ही श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.
            हिंगोली शहरातील विविध विकासकामांचा वित्त व नियोजन मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते आज शुभारंभ झाला असल्याचे सांगत जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे म्हणाले की, प्रत्येक शहराचा व ग्रामीण भागाचा विकास करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. आणि या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटीबध्द आहे. याकरीता विविध योजनाच्या माध्यमांतून जिल्ह्यात अनेक विकास कामे प्रगतीपथावर आहेत. सर्वांना बरोबर घेवुनच जिल्ह्याचा पर्यायाने राज्याचा आणि देशाचा विकास करण्यास शासन प्राधान्य देत आहे. शहराच्या विकास कामासाठी आवश्यक तेवढा निधी देण्याचे अर्थ मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जाहिर केले होते. त्यानुसार त्यांनी आपल्या जिल्ह्याला निधी उपलब्ध करुन दिला आहे असेही श्री. कांबळे यावेळी म्हणाले.
            प्रास्ताविकात मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी हिंगोली नगर परिषदे मार्फत करण्यात आलेल्या आणि करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांची सविस्तर माहिती दिली. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे आणि नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांची ही समयोचित भाषणे झाली.
            प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते हिंगोली नगर परिषदेची प्रशासकीय इमारत, नाट्यगृह बांधकाम, कै. शिवाजीराव देशमुख सभागृह, कयाधु नदीवरील हिंदु स्मशान भूमी विकसीत करणे, शेतकरी भवन  या विकासकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
****

No comments: