05 January, 2019

बाळशास्त्री जांभेकर : मराठी पत्रकारितेचे जनक


विशेष लेख क्र.1                                                                                 दिनांक : 5 जानेवारी 2019
बाळशास्त्री जांभेकर : मराठी पत्रकारितेचे जनक
‘दर्पण’ या वृत्तपत्राद्वारे मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे; इंग्रजी राजवटीच्या सुरुवातीच्या काळातील एक उच्चविद्याविभूषित, पंडिती व्यक्तिमत्त्व म्हणजे बाळशास्त्री जांभेकर होत. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात मराठी समाजमन घडविण्यात बाळशास्त्री जांभेकरांचा फार मोठा वाटा होता. कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले या गावी जन्मलेल्या बाळशास्त्रींनी अनेक विषयांचे अभ्यासक-संशोधक, अध्यापक, उत्कृष्ट लेखक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार म्हणून आपल्या कार्याचा ठसा 1832 ते 1846 या काळात उमटवला.
भारतात ब्रिटिशांनी येताच कलकत्यामध्ये पहिलं वृत्तपत्र 'बेंगाल गॅझेट' नावानं इंग्रजी साप्ताहिक 29 जानेवारी, 1780 रोजी सुरु केले. ब्रिटिश सरकारने आपल्या स्वार्थासाठी ठिकठिकाणी मुद्रणालयं सुरु केली. समाज प्रबोधन करण्यासाठी हे महत्वाचं साधन आहे. त्याकरीता समाजाचे विचार परिवर्तन न होणारे वृत्तपत्र निघू नये अशी त्यांची धारणा होती. परंतू कालांतराने आपले विचार प्रकट करण्यासाठी वृत्तपत्र हे प्रभावी माध्यम असल्याची भारतीयांना जाणीव झाली. यानंतर अनेक भारतीय भाषांतील वृत्तपत्र निघू लागली. बंगालीनंतर मराठी असा भाषिक वृत्तपत्रांचा क्रम लागतो.
            ब्रिटीशांनी भारतात आपलं बस्तान सार्वजनिक केल्यानंतर पाश्चिमात्य संस्कृती मूल्यांचा भारतातील पारंपरिक जुन्या मूल्यांशी संषर्घ निर्माण झाला. तथापि, पाश्चात्य संस्कृतीच्या परिचयामुळं भारतीय पंडितांना समाजातल्या घडामोडींची भौतिक दृष्टीनं कारणमीमांसा करण्यास प्रोत्साहनही मिळालं. समाजातील वर्णव्यवस्था, जातीभेद, स्त्री दास्य, सती प्रथा, अस्पृश्यता, बालविवाह आदी जुन्या मूल्यांचा पुनर्विचार करण्यास पंडितांना भाग पाडलं  यातूनच एकसंध समाज निर्माण करण्यासाठी समाजातील भेदाभेद गेले पाहिजेत. याची त्यांना जाणीव झाली. हळूहळू समाज प्रबोधनांची प्रक्रिया सुरु झाली. यातच वृत्तपत्रांच आगमन ही घटना क्रांतीकारक ठरली. ब्रिटीश सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या कलकत्ता, मद्रास (चेन्नई), मुंबई येथे इंग्रजी वृत्तपत्रांची सुरुवात झाली. परंतू जनतेच्या अस्तित्वाला या वृत्तपत्रात विशेष स्थान देण्यात येत नसे. या वृत्तपत्रांवर सरकारचे विशेष लक्ष होतं. जहाजांची ये-जा, जाणाऱ्या - येणाऱ्या प्रमुख व्यक्तींची नावं, सरकारी जाहिराती आदी मजकूर वृत्तपत्रांत प्रसिध्द करण्यात येत असे. यामुळे भारतीय सुशिक्षित वर्गात वृत्तपत्र ही कल्पना रुजू लागली आणि तर इंग्रजी भाषेत वृत्तपत्रं निघतात तर भारतीय भाषांतही अशी वृत्तपत्रं का निघू नयेत असा प्रश्न निर्माण झाला. आणि कलकत्त्ता येथे पहिलं इंग्रजी वृत्तपत्र निघाल्यामुळं या शहरात पहिल्या भाषिक वृत्तपत्राचाही प्रारंभ झाला. भारतीय समाजानं नवीन वैचारिक जागृती आणि नवी जाणीव निर्माण होण्यास या वृत्तपत्रामुळे मदत झाली.
            ब्रिटिश अधिकारी जेम्स ऑगस्ट हिकीच्या इंग्रजी 'बेंगॉल गॅझेट' च्या अगमनानंतर तब्बल अर्ध्या दशकानंतर म्हणजेच 52 वर्षांनी 6 जानेवारी, 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर या विद्वानानं ' दर्पण ' च्या रुपानं पहिलं मराठी वृत्तपत्रं सुरु केलं. मुंबईत बाळशास्त्री जांभेकरांनी ' दर्पण ' च्या माध्यमातून सुरु केलेली वैचारिक प्रबोधनाची पेरणी मराठी भूमित रुजण्यास सुरुवात झाली.
एक उतुंग व्यक्तिमत्व असलेल्या बाळशास्त्री जांभेकरांना आपण ‘दर्पण’कार जांभेकर म्हणूनच ओळखतो. ब्रिटिश कालखंडात त्यांनी दर्पणच्या संपादनाची धुरा समर्थपणे वाहिली. भविष्यकाळातील या माध्यमाची जबरदस्त ताकद त्यांनी तेव्हाच ओळखली होती. परकी सत्तेला उलथून टाकायचे असेल, तर समाजजागृती घडवायला हवी आणि त्यासाठी लेखणीला पर्याय नाही हे त्यांना फार पूर्वीच समजले होते. बाळशास्त्री कडवे देशाभिमानी होते. त्यांच्या या देशसेवा आणि समाजसेवेच्या जाणिवेतूनच दर्पणसारख्या नियतकालिकाचा जन्म झाला आणि मराठी वृत्तपत्रविश्र्वात नवी पहाट उगवली. दर्पणाचा जन्म होताना गोविंद कुंटे व भाऊ महाजन यांचेही सहकार्य बाळशास्त्रींना लाभले. त्या वेळी
बाळशास्त्रींचे वय अवघे वीस वर्षांचे होते. एका वृत्तपत्राच्या संपादकाला आवश्यक असणारी भाषेची जाण आणि सामाजिकतेचे भान त्यांच्याकडे होते.
दर्पणाचा पहिला अंक 6 जानेवारी, 1832 रोजी प्रकाशित झाला. इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषेत प्रकाशित होणारे हे वृत्तपत्र! या अंकात दोन स्तंभ असत. उभ्या मजकुरात एक स्तंभ (कॉलम) मराठीत आणि एक स्तंभ इंग्रजीत असे. मराठी मजकूर अर्थातच सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि इंग्रजी मजकूर वृत्तपत्रात काय लिहिले आहे, हे राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठी इंग्रजी मजकूर होता. वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी लोकांना नवीन होती. त्यामुळे दर्पणचे वर्गणीदार सुरुवातीच्या काळात खूप कमी होते. पण हळूहळू लोकांमध्ये ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. दर्पणवर प्रथमपासूनच बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता. दर्पण अशा रीतीने  साडे आठ वर्षे चालले आणि जुलै, 1840 ला त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्रातील पहिल्या पिढीतील समाजसुधारक होते. ‘दर्पण’ हे बाळशास्त्रींच्या हातातील एक लोक शिक्षणाचे माध्यम होते. त्यांनी त्याचा उत्तम वापर प्रबोधनासाठी करून घेतला. यात विशेष उल्लेख त्यांनी हाताळलेल्या विधवांच्या पुनर्विवाहाच्या प्रश्नांचा व वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसाराचा करावा लागेल. बाळशास्त्रींनी या विषयांवर विपुल लिखाण केले. त्यामुळे त्यावर विचारमंथन होऊन त्याचे रूपांतर पुढे विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीत झाले. ज्ञान, बौद्धिक विकास आणि विद्याभ्यास या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटत. उपयोजीत ज्ञानाचा प्रसार समाजात व्हावा, ही त्यांची तळमळ होती. देशाची प्रगती, आधुनिक विचार आणि संस्कृतीचा विकास यासाठी वैज्ञानिक ज्ञानाची गरज आहे, तसेच सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याच्या विवेकनिष्ठ भूमिकेसाठी शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसाराची आवश्यकता आहे, याची जाणीव त्यांना झाली होती. विज्ञाननिष्ठ मानव उभा करणे हे त्यांचे स्वप्न होते. थोडक्यात, आजच्यासारखा ज्ञानाधिष्ठित समाज त्यांना दोनशे वर्षांपूर्वीच अपेक्षित होता. त्या अर्थाने ते द्रष्टे समाजसुधारक होते. सार्वजनिक ग्रंथालयांचे महत्त्व ओळखून त्यांनी ‘बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना केली. विविध समस्यांवर सकस चर्चा घडवण्यासाठी ‘नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटी’ची स्थापना केली. यातूनच पुढे ‘स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी’ या संस्थेला प्रेरणा मिळाली व दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड यांसारखे दिग्गज कार्यरत झाले. 1840 मध्येच त्यांनी ‘दिग्दर्शन’ या मराठीतील पहिल्या मासिकाची सुरुवात केली. या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी ५ वर्षे काम पाहिले. या मासिकातून त्यांनी भूगोल, इतिहास, रसायन शास्त्र,पदार्थ विज्ञान, निसर्ग विज्ञान आदी विषय नकाशे व आकृत्यांच्या साहाय्याने प्रसिद्ध केले. या अभिनव माध्यमातून त्यांनी लोकांची आकलनक्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला.  त्यांच्या विद्वत्तेला जोड होती ती त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची. संस्कृत, मराठी, इंग्रजी आणि हिंदी या त्या काळच्या प्रचलित भाषांवर त्यांचे प्रभुत्व होतेच, याशिवाय ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, बंगाली आणि गुजराती भाषाही त्यांना उत्तम अवगत होत्या. या भाषांसह विज्ञान, गणित, भूगोल, शरीरशास्त्र व सामान्य ज्ञान या विषयांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. आज मराठीतील वृत्तपत्रांचे जनक असा जसा त्यांचा नावलौकिक आहे, तसाच एल्फिन्स्टन कॉलेजमधील नावाजलेले, हिंदीचे पहिले प्राध्यापक असाही त्यांचा लौकिक आहे. त्याचबरोबर रॉयल एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिकात शोधनिबंध प्रसिद्ध झालेले पहिले भारतीय असाही मान त्यांच्याकडे जातो. 1845 मध्ये त्यांनी केलेले ज्ञानेश्वरीचे मुद्रण हे या ग्रंथाचे पहिले मुद्रण मानले जाते. बाळशास्त्रींनी कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणूनही काम पाहिले. तसेच त्यांनी नीतिकथा, इंग्लंड देशाची बखर, इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप, हिंदुस्थानचा इतिहास, शून्यलब्धिगणित आदी ग्रंथांची निर्मिती केली.
साधारणपणे 1830 ते 1846 या काळात बाळशास्त्रींनी आपले योगदान महाराष्ट्राला (व भारताला) दिले. या काळात बहुसंख्येने समाज निरक्षर, अंधश्रद्ध व अज्ञानी होता. म्हणूनच अवघ्या 33 वर्षांच्या आयुष्यात, विविध क्षेत्रांत त्यांनी केलेले प्रचंड कार्य मूलभूत, मौल्यवान व अद्‌भूत  ठरते. 6 जानेवारी रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला. हाच योगायोगाने बाळशास्त्रींचाही जन्मदिवस. त्यांच्या स्मृत्यर्थ हाच दिवस ‘पत्रकार दिन’ म्हणून आज महाराष्ट्रात साजरा केला जातो.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी आपल्या पत्रकारितेचा वापर केलाय त्याच बरोबर जातीभेद निर्मुलन आणि विधवा पुनर्विवाह यालाही त्यांनी प्राधान्य दिलं. त्यामुळंच त्यांचा उल्लेख "अद्य समाजसुधारक" असा केला जातो. परंतु कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंभूर्ले येथे 1812 च्या उतरार्धात जन्म झालेल्या बाळशास्त्री यांच वयाच्या अवघ्या 33 वर्षी  1846 मध्ये निधन झालं.

जिल्हा माहिती कार्यालय
हिंगोली
***********

No comments: