28 February, 2023

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे ग्राम बाल संरक्षण समितीची बैठक संपन्न

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 28 :  वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार ग्राम बाल संरक्षण समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ग्राम बाल संरक्षण समिती  रचना व कार्यपध्दती विषयी तसेच ग्राम बाल संरक्षण समितीमध्ये नव्याने 20 ते 30 वयोगटातील युवक-युवतीची बाल मित्र म्हणून निवड करण्यात यावी याविषयी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे क्षेत्रबाह्य कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत यांनी माहिती दिली.

तसेच बाल कायद्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले, बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 विषयी सविस्तर माहिती सांगण्यात आली. ज्यामध्ये मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 असावे आणि जर मुलाचे व मुलीचे वय यापेक्षा कमी असेल तर असे विवाह बेकायदेशीर ठरले जातात व अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व 02 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा होऊ शकते. तसेच बाल विवाहाची कारणे व दुष्परिणाम याविषयी माहिती दिली. तसेच बाल विवाहास प्रतिबंध करण्यासाठी  दि. 21 ऑक्टोंबर, 2022 रोजी दिलेल्या अधिसुचनेनुसार ग्राम सेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात बाल विवाह होऊ नयेत याबाबत खबरदारी घेण्यात यावी. तसेच विद्यार्थी शाळेत सतत 15 दिवस गैरहजर असेल तर संबंधित विद्यार्थ्याची नोंद करुन ग्राम सेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी यांच्याकडे देण्याबाबत तसेच गावात ज्यांचे ज्यांचे लग्न ठरलेले आहेत त्यांच्या वयाची पडताळणी करुन त्यापैकी कोणी अल्पवयीन आहे का ? याची शहानिशा करण्याबाबत माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे यांनी दिली.

या बैठकीस ग्राम बाल संरक्षण समिती सदस्य व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

**** 

 जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या विशेष बाल पोलीस पथक अधिकारी यांची

एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

 


हिंगोली (जिमाका), दि. 28 : येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन येथील विशेष बाल पोलीस पथक अधिकारी यांची जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेचे प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे यांनी केले. बाल कल्याण समितीचे अध्यक्ष सुधाकर तानाजी इंगोले यांनी बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अंतर्गत बाल कल्याण समिती रचना व कार्यप्रणाली विषयी सविस्तर माहिती दिली. बाल कल्याण समिती सदस्य परसराम हेंबाडे यांनी काळजी व संरक्षणाची गरज असलेला बालक पोलिसांमार्फत बाल कल्याण समिती समोर सादर केला जातो त्यावेळेस कुठल्या कागदपत्रांची आवश्यकता आहे. तसेच 17 नंबरचा फार्म कसा भरावा याविषयी माहिती दिली, समिती सदस्या संगिता दुबे यांनी बाल विवाह प्रतिबंध कायदा 2006 विषयी माहिती दिली. समिती सदस्या बाली भोसले यांनी लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 विषयी सविस्तर माहिती दिली. प्रशिक्षण झाल्यानंतर येणाऱ्या अडचणी विषयी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून चर्चा करण्यात आली.

या प्रशिक्षणामध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी जिल्हा बाल संरक्षण कक्षाबाबत सविस्तर माहिती दिली. कायदा तथा परिविक्षा अधिकारी अॅड. अनुराधा पंडित यांनी प्रशिक्षणाचे सुत्र संचालन केले. समुपदेशक सचिन पठाडे व सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे यानी प्रशिक्षणात सहकार्य केले.

**** 

 

मुख्यमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत

वैयक्तीक शेततळे घटकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तीक शेततळे या घटकाचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज स्वीकृती सुरु आहे. यात 15x15x3 ते 34x34x3 मीटर शेततळ्याच्या एकूण आठ आकारमानासाठी रक्कम 14 हजार 443 रुपये ते कमाल 75 हजार रुपये अनुदान देय आहे. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची ऑनलाईन लॉटरीद्वारे निवड करण्यात येत आहे.

महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी शेततळ्यासाठी केलेले जुने अर्ज रद्द करुन मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना अंतर्गत वैयक्तीक शेततळे या बाबीसाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/ या लिंकवर लॉगिन करुन अर्ज करणे आवश्यक आहे. वरील लिंकवर अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा- सिंचन सुविधा व साधने ही बाब निवडा-वैयक्तीक शेततळे ही बाब निवडा, इनलेट आणि आउटलेटसह किंवा इनलेट आणि आउटलेटशिवाय यापैकी एक उपघटक निवडा-परिमाण निवडा (शेततळ्याचा आकार)-स्लोप निवडा-जतन करा-अर्जाचे शुल्क ऑनलाईन अदा करा याप्रमाणे माहिती भरावी.

जास्तीत जास्त इच्छूक शेतकरी बांधवांनी वैयक्तीक शेततळ्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी  शिवराज घोरपडे यांनी केले आहे.

****  

 

पौष्टिक तृणधान्य प्रभात फेरीचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ

 



हिंगोली (जिमाका), दि. 28 : पौष्टिक तृणधान्य पिकातील पोषण मूल्य व त्यांच्या सेवनामुळे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम जन सामान्याच्या लक्षात येण्यासाठी कृषि विभागामार्फत आयोजित पौष्टिक तृणधान्य प्रभात फेरीचे पुणे येथील कृषी आयुक्तालयाच्या कृषि अधिकारी नीलम बोरकर यांच्या हस्ते आज येथील जिल्हा परिषद शाळा येथून हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.

ही प्रभात फेरी  जिल्हा परिषद शाळा- पिपल्स बँक-आखरे मेडिकल पॉईट-जवाहर रोड-गांधी चौक-इंदिरा गांधी चौक या मार्गे अण्णाभाऊ साठे वाचनालय येथे विसर्जित झाली.

सहभागी झालेल्या अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी ‘‘नाचणीचे लाडू लागतात गोड पचनशक्तीला नाही तोड’’ अशा घोषणा, तृणधान्य आधारित अभंग, पोवाडे इत्यादीद्वारे जनजागृती करुन प्रभात फेरी पार पडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांनी केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालय येथे पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व या विषयावर डॉ. संजय घुगे यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले.  

"आंतरराष्ट्रीय पोष्टिक तृणधान्य वर्ष 2023" या संकल्पनेअंतर्गत ज्वारी, बाजरी, नाचणी " इत्यादी पौष्टिक तृणधान्य पिकाच्या उत्पादन वाढीबरोबरच या पिकांचे आरोग्यविषयक फायद्याबाबत जनजागृती करुन लोकांच्या आहारातील त्यांचे प्रमाण वाढविणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.

"आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023" साजरे करण्यासाठी केंद्र शासनाने "विशेष महिना म्हणुन महाराष्ट्र राज्यासाठी फेब्रुवारी-2023 हा महिना नेमून दिलेला असल्याने या महिन्यात या तृणधान्य पिकांची जास्तीत  जास्त प्रसिध्दी करावयाची आहे. त्याचबरोबर "पोष्टिक तृणधान्य विशेष माहिना (मिलेट ऑफ द मंथ)" या संकल्पनेअंतर्गत फेब्रुवारी महिना हा ज्वारी पिकासाठी समर्पित असल्याने ज्वारी पिकाच्या प्रचार व प्रसिध्दीवर विशेष भर द्यावयाचा आहे.

या प्रभात फेरी दरम्यान हिंगोली शहर पोलिसांनी उत्तम बंदोबस्त ठेवला होता. आयोजनासाठी नगरपालिका प्रशासनाचे सुध्दा उत्कृष्ट सहकार्य लाभले. शेवटी सहभागी झालेल्या शेतकरी, अधिकारी व कर्मचारी यांचे आभार कृषि उपसंचालक एस. व्ही. लाडके यांनी मानले.

****

 

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शासकीय ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

 



हिंगोली (जिमाका), दि. 28 : कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येत असतो. त्यानिमित्ताने हिंगोली जिल्ह्यातील साहित्यिकांकडून प्राप्त साहित्यकृतींचे /विविध ग्रंथांचे प्रदर्शनाचे आयोजन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय हिंगोली येथे करण्यात आले होते. याचे उद्घाटन जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

या ग्रंथ प्रदर्शनासाठी जिल्ह्यातील सर्व साहित्यिकांना त्यांच्या साहित्यकृती शासकीय ग्रंथालयास पाठविण्याचे आवाहन करण्यात आलेले होते. या ग्रंथप्रदर्शनामध्ये अशोक अर्धापूरकर, प्रा. विलास वैद्य, कलानंद जाधव, प्रा.माधव जाधव, बबन शिंदे,  डॉ.रंगनाथ नवघडे, पांडुरंग गिरी, डॉ. महेश मंगनाळे, डॉ. किशन लखमावार, अनिल शेवाळकर, डॉ.कमलाकर चव्हाण, सौ.सिंधुताई दहिफळे, सौ.सुमन दुबे, श्रीमती संगीता देशमुख, पुंजाराव जाधव, प्रभाकर जाधव, मारोती कोटकर, गणपत माखणे अशा विविध लेखक /साहित्यिकांनी साकारलेले 60 पेक्षा अधिक साहित्याचा समावेश करण्यात आलेला आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व साहित्यिकांचे प्रकाशित साहित्य/ ग्रंथ एकत्रित करुन नवोदित साहित्यिकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळण्यासाठी संदर्भ साहित्य म्हणून शासकीय जिल्हा ग्रंथालय हिंगोली येथे ‘हिंगोली जिल्हा ग्रंथ वैभव दालनात’ उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.

            या वेळी जेष्ठ साहित्यिक अशोक अर्धापुरकर, कलानंद जाधव, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, औरंगाबाद विभाग ग्रंथालय संघाचे कोषाध्यक्ष संतोष ससे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, मिलींद सोनकांबळे, रामभाऊ पुनसे व ग्रंथालय पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

            हे ग्रंथ प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरु नगर, रिसाला नाका हिंगोली येथे सर्वांसाठी खुले आहे. सर्वांनी या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी  केले आहे.

*****  

25 February, 2023

 

शेतकरी अन्नदाता नाही तर ऊर्जादाता बनला पाहिजे

-- केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

 

* वाशिम-पांगरे राष्ट्रीय महामार्गाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  यांच्या हस्ते लोकार्पण

* बासंबा फाटा येथे उड्डाणपूल उभारण्यासाठी 20 कोटी रुपयाच्या कामाला मंजुरी

* भेंडेगाव येथे 75 कोटी रुपये खर्चनू रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामास मंजुरी

* हळदीच्या क्लस्टर पार्कसाठी 100 एकर जागा उपलब्ध करुन दिल्यास लॉजिस्टीक पार्क उभारण्यात येईल.

* गेल्या आठ वर्षात देशात 50 कोटी रुपयाची रस्त्याची कामे केली.

* जिल्ह्याचा मागासलेपणा दूर करण्यासाठी जलसंवर्धनाची कामे झाले पाहिजे

 






 

हिंगोली (जिमाका), दि. 25 : या भागातील शेतकऱ्यांनी गावातले पाणी  गावातच जिरविले पाहिजे , तर शेतातले पाणी शेतात जिरवून जमिनीतील पाण्याचा स्तर वाढविला पाहिजे तर शेतकरी समृद्ध होईल आणि अन्नदाता न राहता उर्जादाता बनला पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज हिंगोली येथे विविध रस्ते प्रकल्पाचे लोकार्पण कार्यक्रमात केले.

येथील रामलीला मैदान येथे वाशिम-पांगरे चौपदरी मार्ग प्रकल्पाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार, खासदार हेमंत पाटील, खासदार भावना गवळी, सर्वश्री आमदार वसंत खंडेलवाल, विप्लव बाजोरिया, तानाजी मुटकुळे, लखन मलिक, संतोष बांगर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. गडकरी म्हणाले, शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. या भागातला शेतकरी समृध्द झाला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे. स्मार्ट शहरे नाही तर स्मार्ट गावे झाली पाहिजेत. तरुण मुलांना मुंबई-पुण्याला जाण्याची गरज पडणार नाही. यासाठी आपल्या जिल्ह्यात काम मिळाले पाहिजे. या भागाचा ग्रोथ रेट वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच वाशिम व हिंगोलीच्या विकासासाठी जेजे करता येईल ते करण्याचे प्रयत्न करण्यात येईल, असे सांगून शेतकरी अन्नदाता नाही तर ऊर्जा दाता बनला पाहिजे.  यासाठी मी शेतकऱ्यांना डांबर तयार करायला लावणार आहे. तसेच इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिजेल, बायोसीएनजी इलेक्ट्रीक, हायड्रोजन यासारखे प्रकल्प उभारल्यास या भागातील शेतकरी सुजलाम, सुफलाम होईल, असे ते म्हणाले.

आपल्या भागात हळदीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात आहे. या भागात रस्त्याच्या बाजूने शासकीय जागा उपलब्ध करुन दिल्यास 1100 कोटी रुपये खर्च करुन हळदीच्या कल्स्टरसाठी लॉजिस्टीक पार्क उभारण्यास 100 एकर जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. येथे हळदीपासून विविध उत्पादने निर्माण केल्यास आपली हळद जगाच्या नकाशावर येऊन साता समुद्रापलीकडे जाईल असा विश्वास दिला. सध्या जालना येथे एक्सपोर्ट-इंम्पोर्ट सुरु होणार आहे. त्यामुळे हिंगोली येथील हळद सातासमुद्रा पलीकडे जगात जाईल आणि आपला शेतकरी समृध्द होईल, असे ही ते यावेळी म्हणाले.

हिंगोली जिल्ह्याचा मागासलेपणा दूर करण्यासाठी जलसंवर्धनाची कामे झाली पाहिजेत.  यात ब्रीज कम बंधारे झाले पाहिजेत. या माध्यमातून नदी, नाल्याचे खोलीकरण करुन गावातले पाणी गावात, घरातले पाणी घरात, शेतातले पाणी शेतात जिरले पाहिजे. तसेच नदी नाल्याचे खोलीकरण करुन पाणी साठवण क्षमता वाढवली पाहिजे. यासाठी आवश्यक ती मदत करण्यात येईल. प्रशासनाने देखील जलसंवर्धनाच्या कामास प्राधान्य दिले पाहिजे तरच आपला भाग सुजलाम सुफलाम होईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

मागील 8 वर्षात हिंगोली जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर एकूण 13 कामे मंजूर करण्यात आली असून यांची किंमत 5 हजार 587 कोटी रुपये आहे. यापैकी 6 कामे पूर्ण झाली असून 7 कामे प्रगतीपथावर आहेत. अपूर्ण कामे पुढच्या चार महिन्यात पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी दिला. आज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 वरील वाशिम ते पांगरे महामार्गाचे चौपदरीकरणाचे लोकार्पण होत आहे. याचा मला आनंद आहे.

नामदेव महाराजाच्या जन्मस्थानी रस्ता करण्यासाठी सीआरएफमधून मंजूरी दिलेली आहे. मी दिलेले वचन पूर्ण झाले आहे. विशेषत: वाशिम हिंगोली जिल्ह्यामध्ये 13 कामे मंजूर होती. त्याची किंमत सहा हजार कोटी रुपये होती. त्याची 6 कामे पूर्ण झाली असून 7 कामे प्रगतीथावर आहेत. आज वाशिम ते पांगरे याचे चौपदीकरण झाल्याचा आनंद झाला आहे. वाशिम ते पांगरे या मार्गामुळे नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे. गेल्या आठ वर्षात 50 लाख कोटी रुपयाची कामे करण्याची संधी मिळाली आहे. वारंगा फाटा रस्त्याचे काम पुढच्या महिन्यात मी माहूरला रोपवे आणि त्याच्या सौंदर्यीकरणाच्या भूमिपूजनासाठी येईपर्यंत पूर्ण होतील. तसेच येथे जंक्शन तयार करण्याची सूचना दिलेली आहे. हिंगोलीचा बायपास मंजूर करण्यात आलेला आहे. इंदोर ते हैद्राबाद नवीन रस्ता मंजूर केलेला आहे. यामुळे हिंगोली व वाशिमला हैद्राबादसाठी चांगली कनेक्टीविटी मिळणार आहे. उद्योग व्यापार वाढवण्यासाठी फायदा होणार आहे.  समृध्दी महामार्गामुळे आपली खूप सोय झाली आहे. संभाजीनगर ते पुणे हा दू्रतगती महामार्ग तयार करण्यात येणार आहे. हिंगोलीतून साडेतीन तासात संभाजीनगरला पोहोचणार आहे. या माध्यमातून हिंगोली जिल्ह्याचे सामाजिक, आर्थिक मागासलेपण दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

नामदेव महाराज हे आमचे साहित्य, संस्कृती विरासत आहे. त्यांच्या गावचा रस्ता होतोय त्यामुळे मला आनंद होत आहे. या ठिकाणी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिल्यास त्या उपलब्ध करुन देता येतील. आज भेंडेगाव येथे रेल्वे उड्डाणपुलाच्या 75 कोटी रुपयाच्या कामाला मंजुरी दिली. हिंगोली शहरात बासंबा फाटा येथे 20 कोटी रुपयाच्या उड्डाणपुलाला सीआरएफ मधून मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रीय महामार्गामुळे विकासाला चालना देण्याचे काम होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे गेल्या आठ महिन्यात विकासाला चालना देण्याचे काम करत आहेत. राष्ट्रीय महामार्गामुळे शेतकऱ्याला सक्षम करण्याचे काम झाले आहे. यामुळे शेतकऱ्याच्या मालाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी कनेक्टीविटी निर्माण झाली आहे. या जिल्ह्याचे खासदार व आमदार यांनी मागणी केलेल्या कामाला मान्यता द्यावी.  तसेच राज्य शासनाच्या वतीने या जिल्ह्याचे भूमिपूत्र असलेल्या नानाजी देशमुख यांच्या नावाने कृषी विभागाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्याचा टप्पा क्र. 2 ची दहा हजार कोटीची कामे करण्यात येणार आहेत, असे  त्यांनी सांगितले.

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी खासदार भावना गवळी, खासदार हेमंत पाटील, आमदार तानाजी मुटकुळे यांची समायोचित भाषणे झाली.

यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

 

*****

24 February, 2023

 

महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज 5 मार्च पर्यंत सादर करावेत

हिंगोली (जिमाका), दि. 24 : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या दोन विभागातर्गत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना तसेच व्यावसायिक पाठ्यक्रमाशी सलग्न असणाऱ्या विद्यार्थ्याना निर्वाह भत्ता या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित,विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयातील सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन भरुन आपल्या महाविद्यालयात त्याची हार्ड कॉपी जमा केलेली आहे. परंतु मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे महाविद्यालय स्तरावर अनुसूचित जाती प्रवर्गातील जवळपास 1101 शिष्यवृत्ती अर्ज व विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील जवळपास 896 शिष्यवृत्ती अर्ज अद्यापही महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. तसेच मागील वर्षाच्या तुलनेत अर्ज नोंदणीचे प्रमाणही कमी दिसून येत आहे. तसेच सहायक आयुक्त समाज कार्यालयामार्फत वेळोवेळी लेखी पत्राद्वारे, प्रेसनोटद्वारे व तोंडी सूचना देऊन अद्यापही महाविद्यालयाकडुन यावर कार्यवाही झालेली नाही,

ज्या महाविद्यालय स्तरावर शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित आहेत अशा महाविद्यालयांनी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज दि. 05 मार्च, 2023 पर्यंत तपासून पात्र असल्याची खात्री करुन तात्काळ सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, हिंगोली यांच्या स्तरावर फॉरवर्ड करावेत. एकही मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या महाविद्यालयाचे प्राचार्य यांची राहील याची नोंद घ्यावी, असे शिवानंद मिनगीरे, सहायक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*****

 

"आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष-2023" च्या अनुषंगाने

28 फेब्रुवारी रोजी तृणधान्य प्रभात फेरीचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 24 : "आंतरराष्ट्रीय पोष्टिक तृणधान्य वर्ष 2023" या संकल्पनेअंतर्गत ज्वारी, बाजरी, नाचणी " इत्यादी पौष्टिक तृणधान्य पिकाच्या उत्पादन वाढीबरोबरच या पिकांचे आरोग्यविषयक फायद्याबाबत जनजागृती करुन लोकांच्या आहारातील त्यांचे प्रमाण वाढविणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.

"आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023" साजरे करण्यासाठी केंद्र शासनाने "विशेष महिना म्हणुन महाराष्ट्र राज्यासाठी फेब्रुवारी-2023 हा महिना नेमून दिलेला असल्याने या महिन्यात या तृणधान्य पिकांची जास्तीत  जास्त प्रसिध्दी करावयाची आहे. त्याचबरोबर "पोष्टिक तृणधान्य विशेष माहिना (मिलेट ऑफ द मंथ)" या संकल्पनेअंतर्गत फेब्रुवारी महिना हा ज्वारी पिकासाठी समर्पित असल्याने ज्वारी पिकाच्या प्रचार व प्रसिध्दीवर विशेष भर द्यावयाचा आहे. पौष्टिक तृणधान्य पिकातील पोषण मूल्य व त्यांच्या सेवनामुळे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम जन सामान्याच्या लक्षात येण्यासाठी दि. 28 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 8.00 वाजता जिल्हा परीषद शाळा येथुन प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रभात फेरीचा मार्ग जिल्हा परिषद शाळा- पिपल्स बँक-आखरे मेडिकल पॉईट-जवाहर रोड-गांधी चौक-इंदिरा गांधी चौक असा आहे. या प्रभात फेरीचा समारोप अण्णाभाऊ साठे वाचनालय येथे पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व या विषयावरील डॉ.संजय घुगे यांच्या व्याख्यानाने होणार आहे.

या प्रभात फेरीमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी, विविध शासकीय विभाग, शाळा, महाविद्यालये यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवराज घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली

यांनी केले आहे

****

 

स्वप्नपूर्ती लोकसंचलित साधन केंद्राची गरुड झेप

जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव यांच्या हस्ते नूतन इमारतीचे व मसाला युनिटचे उद्घाटन

 





हिंगोली (जिमाका), दि. 24 : आज महिला आर्थिक विकास महामंडळाच्या 48 व्या वर्धापन दिनानिमित्त स्वप्नपूर्ती लोकसंचलित साधन केंद्राच्या (सीएमआरसी) नूतन इमारतीचे जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर मानव विकास योजनेअंतर्गत सीएमआरसीला प्राप्त झालेल्या मसाला युनिटचे देखील उद्घाटन यावेळी करण्यात आले.

या उद्घाटन कार्यक्रमास अमरावती विभागाचे विभागीय सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी केशव पवार तसेच जिल्हा समन्वय अधिकारी विलास जगताप त्याचबरोबर लेखाधिकारी संकेत महाजन, गजानन इंगळे तसेच तसेच सर्व सीएमआरसी व्यवस्थापक, लेखापाल सहयोगिनी, कार्यकारणी व सर्व महिला सभासद उपस्थित होते.

महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत विविध प्रकल्पाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लोकसंस्था उभारणीचे कार्य सुरु आहे, यामध्ये लोकसंचलित साधन केंद्र (CMRC) स्वबळावर उभ्या होणे, शाश्वत होणे यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत, ही लोकचळवळ म्हणून पुढे येत आहे, अशातच महिलांच्या अपेक्षा वाढून गेल्या आहेत. त्यामुळे ज्याप्रमाणे लोकसंचलित साधन केंद्र (CMRC) आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या आहेत, त्यातील एक महिलाचे स्वप्न म्हणजे लोकसंचलित साधन केंद्र (CMRC) ला स्वतःचे, मालकीचे, हक्काचे कार्यालय व प्रशिक्षण केंद्र उभे राहावे, याच हेतूने प्रेरित होऊन हिंगोली जिल्ह्यातील स्वप्नपूर्ती लोकसंचलित साधन केंद्र (CMRC) सेनगावने हे महिलाचे स्वप्न साकार केले आहे, यासाठी लोकसंचलित साधन केंद्र (CMRC) ने 2014-15 मध्ये स्वखर्चाने 1100 स्क्वेअर फूटचा एक प्लॉट 03 लाख रुपयाला खरेदी केला होता, तेव्हापासून थोडे थोडे काम करत आज रोजी 9 लाख 50 हजार रुपये किमतीची इमारत कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा शासकीय योजनेचा निधी न घेता स्वतःच्या उत्पन्नातून स्वखर्चाने उभी केली आहे, यामुळे खऱ्या अर्थाने लोकसंचलित साधन केंद्र (CMRC) लोकसंस्था म्हणून भरभराटीस येत आहे, या लोकसंचलित साधन केंद्र (CMRC) च्या महिलांचे विशेष कौतुक म्हणजे ज्या छत्रछायेखाली आपण घडलो, त्याच माविम (महिला आर्थिक विकास महामंडळ) चे 48 व्या वर्धापन दिनानिमित्त या नवीन वास्तूचे प्रवेश व उद्घाटन समारंभ आयोजित केला आहे, 

आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे आणि आमच्या या आनंदात सर्वांनी खूप सहकार्य केले. त्याबरोबर महिला सभासदांच्या पुढाकाराने आज खऱ्या अर्थाने आमच्या स्वप्नपूर्ती  सीएमआरसीने गरुड झेप घेतली, असे मनोगत व्यक्त केले.

****

23 February, 2023

 

मूल्य साखळी विकास कार्यक्रमांतर्गत

समुदाय आधारित संस्थाचे संचालक व शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 



 

हिंगोली (जिमाका), दि. 23 : मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (SMART) च्या मूल्य साखळी कार्यक्रमांतर्गत शेती दिनाचे औचित्य साधून औंढा नागनाथ तालुक्यातील तूर्क पिंपरी येथे प्रत्यक्ष शेतावर भेट दिली. तर सेनगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील किसान दिशा फार्मर कंपनी येथे भेट देऊन संपादन समिती स्थापन करण्याबाबत व संपादन (खरेदी) बाबत उत्पादक कंपन्यांना नोडल अधिकारी (स्मार्ट) जी. बी. बंटेवाड यांनी व पुरवठा व मूल्य साखळी तज्ञ गणेश कच्छवे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले .

**** 

 

जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 23 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी, मधुकर खंडागळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनीही यावेळी संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. 

**** 

 

कळमनुरी तालुक्यातील देवजना येथे ग्राम बाल संरक्षण समितीची बैठक संपन्न

 


हिंगोली (जिमाका), दि. 23 :  कळमनुरी तालुक्यातील देवजना येथे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार ग्राम बाल संरक्षण समितीची बैठक दि. 21 फेब्रुवारी, 2023 रोजी घेण्यात आली.

या बैठकीत गावातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांविषयी तसेच ग्राम बाल संरक्षण समितीमध्ये नव्या 20 ते 30 वयोगटातील युवक-युवतीची बाल मित्र म्हणून निवड करण्यात यावी याविषयी चर्चा करण्यात आली. तसेच बाल कायद्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 विषयी सविस्तर माहिती सांगण्यात आली. ज्यामध्ये मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 असावे आणि जर मुलाचे व मुलीचे वय यापेक्षा कमी असेल तर असे विवाह बेकायदेशीर ठरले जातात व अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व 02 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा होऊ शकते. या विषयी पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. तसेच बाल विवाहाची कारणे व दुष्परिणाम या विषयी माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे यांनी दिली.

बाल विवाहास प्रतिबंध करण्यासाठी दि. 21 ऑक्टोंबर, 2022 रोजी दिलेल्या अधिसुचनेनुसार ग्राम सेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात बाल विवाह होऊ नयेत याबाबत खबरदारी घेण्यात यावी. तसेच विद्यार्थी शाळेत सतत 15 दिवस गैरहजर असेल तर संबंधित विद्यार्थ्याची नोंद करुन ग्राम सेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी यांच्याकडे देण्याबाबत तसेच गावात ज्यांचे ज्यांचे लग्न ठरलेले आहेत त्यांच्या वयाची पडताळणी करुन त्यापैकी कोणी अल्पवयीन आहे का ? याची शहानिशा करण्यबाबत जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कायदा तथा परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित यांनी माहिती दिली.

या बैठकीत ग्राम बाल संरक्षण समिती व पोलीस प्रशासनाच्या सहकार्यातून एका अल्पवयील बालिकेचा बाल विवाह थांबविण्यास जिल्हा बाल संरक्षण कक्षास यश आले. या बैठकीस पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे (पो.स्टे आ.बाळापुर), गावातील संरपंच प्रविणा वागमारे, ग्रामसेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी शेख समीर शेख समदानी, मुख्याध्यापक महेश शेवाळे, अंगणवाडी सेविका संगीता कल्याणकर, आशा वर्कर अरुणाबाई गाढे, ग्राम पंचायत सदस्या मंगल कल्याणकर, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

 

*****

 

 

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-2022 करिता प्रवेशिकांना 8 मार्चपर्यंत मुदतवाढ

 

 

             हिंगोली (जिमाका), दि. 23 :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार देण्यात येतात. सन 2022 च्या पुरस्कारासाठी दिनांक 1 जानेवारी, 2022 ते 31 डिसेंबर, 2022 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका दि. 31 जानेवारी 2023 पर्यंत मागविण्यात आल्या होत्या, तथापि, प्रवेशिका पाठविण्यास 8 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

            उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2022 चे माहितीपत्रक/अर्जाचे नमुने महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच राज्यातील विविध भागातील स्पर्धकांना संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांना, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेता येईल.

*****  

 

राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 23 :  जिल्हयात युवकांचे नेटवर्क तयार करणे भारत सरकारच्या विविध योजनेत सहभाग घेणे व युवकांचे सक्षम नेतृत्व स्विकारुन राष्ट्र निर्माण कार्यात योगदान देण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी दि. 9 मार्च, 2023 पर्यंत अर्ज मागविले आहेत.

भारत सरकार व्दारा युवकांनी त्यांची ऊर्जा व क्षमता यांचा स्वयंसेवेच्या माध्यमातून राष्ट्र निर्माण कार्यात योग्य वापर करणे. तसेच साक्षरता, आरोग्य, स्वच्छता, लिंगभेद, सामाजिक समस्येबाबत जागरुकता अभियान राबविणे तसेच विविध कार्यक्रमांमध्ये प्रमुख भूमिका निभावणे आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे अथवा आपातकालीन परिस्थितीमध्ये प्रशासनास मदत करणे, अशा विविध कार्यक्रमात त्यांना योग्य दिशा देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील विशेषतः ग्रामीण युवक युवतींकडून हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी 02 याप्रमाणे 05 तालुक्यासाठी 10 युवक युवतीची निवड करण्यासाठी तसेच कार्यालयासाठी 02 युवक युवती संगणकाचे काम करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

यासाठी शैक्षणिक पात्रता किमान एस.एस.सी. (दहावी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उच्च शिक्षण पदवी, पदव्युत्तर व बेसिक कॉम्प्युटर ज्ञान असलेल्यांना प्राधान्य असणार आहे. वयोगट 18 ते 29 वर्षे असून दि. 01 एप्रिल, 2023 ला 18 वर्ष पूर्ण व 29 वर्षापेक्षा कमी असावे. उमेदवारांकडे स्मार्ट मोबाईल फोन व त्याचे विविध ॲपसंबंधी बेसिक माहिती असणे आवश्यक आहे. यामध्ये ई-बँकींग, डीजी धन, सोशल मिडिया इत्यादी ज्ञान असलेल्यांना प्रथम प्राधान्य असणार आहे.

नेहरु युवा केन्द्र संगठन सोबत सलग्नीत युवा मंडळाच्या युवकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. शिक्षण सुरु असणाऱ्या युवक युवती या पदासाठी पात्र ठरणार नाहीत.

 मासिक मानधन व प्रवास भत्ता दरमहा 5 हजार रुपये देण्यात येणार आहे. ही शासकीय नोकरी नाही. एक किंवा दोन वर्ष कार्य केल्यानंतर या कार्याच्या आधारे नौकरी करीता कायदेशीर हक्क दाखविता येणार नाही.

अर्ज कसा करावा नेहरु युवा केन्द्र संगठनच्या WWW.nyks.nic.in  या वेबसाईटवर या योजनेची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. याच संकेतस्थळावर दि. 09 मार्च, 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. ऑनलाइन अर्ज करण्यास अडचण येत असल्यास आवश्यक कागदपत्रासह दि. 09 मार्च, 2023 पर्यंत नेहरु युवा केन्द्र कार्यालयात नाईक नगर जिल्हाधिकारी कार्यालय समोर, हिंगोली या पत्त्यावर येवून विचारपूस करु शकता. अर्जदार ज्या तालुक्यासाठी अर्ज करीत असेल त्या तालुक्यातील रहिवासी असावा आणि त्याच तालुक्यात त्याला काम करावे लागेल, असे जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*****

21 February, 2023

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा

हिंगोली जिल्हा दौरा

 

 

        हिंगोली (जिमाका), दि. 21 :  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे दि. 25 फेब्रुवारी, 2023 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

            शनिवार, दि. 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.10 वाजता परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथील हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने हिंगोलीकडे प्रयाण . 12.50 वाजता पोलीस मैदान हेलिपॅड हिंगोली येथे आगमन. दुपारी 1.00 वाजता मोटारीने रामलीला मैदानाकडे प्रयाण व तेथे आयोजित राष्ट्रीय महामार्गाच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती . 2.05 वाजता रामलीला मैदान येथून मोटारीने शास्त्रीनगर कडे प्रयाण. 2.15 वाजता शास्त्री नगर येथील श्री. राणा खुराणा यांच्या निवासस्थानी राखीव. 2.45 वाजता शास्त्रीनगर हिंगोली येथील हेलिपॅड हिंगोली कडे प्रयाण. 3.00 वाजता हिंगोली हेलिपॅड येथून आगमन करुन हेलिकॉप्टरने नांदेड कडे प्रयाण .

           

*****  

 

हिंगोली येथील दिव्यांग शाळेत हर घर नर्सरी उपक्रम

 





 

        हिंगोली (जिमाका), दि. 21 :  येथील जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण कार्यालय, ज्योतीबा फुले सेवा ट्रस्ट नांदेड व लोकशिक्षण प्रसारक मंडळ हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली निवासी मूकबधीर शाळेत दि. 20 फेब्रुवारी, 2023 रोजी हर घर नर्सरी या उपक्रमांतर्गत बिजारोपण करण्यात आले.

            यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिलहा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कोषागार अधिकारी डॉ.माधवराव झुंजारे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेश येडके, सहाय्यक सल्लागार प्रशांत वैद्य, लक्ष्मण मुंडे, संस्थेचे सचिव व्ही. एस. गुट्टे हे उपस्थित होते.

            याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोषागार अधिकारी श्री. झुंजारे यांनी सद्य परिस्थितीचा आढावा घेता प्राणवायूची कमतरता, त्यासाठी वृक्ष लागवडीचे महत्व उपस्थित कर्मचारी व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले.

            उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या परिसरातील वृक्ष लागवड, परिसर स्वच्छता, शालेय कामकाजाचे नियोजन पाहून कौतूक केले. शाळेतील दीड एकर परिसरातील वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याचे दिसून आल्याने आनंद व्यक्त केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आले.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन राजकुमार वायचाळ यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मूकबधीर विद्यालय, मतिमंद विद्यालय, अस्थिव्यंग विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

*****  

20 February, 2023

 

मॉडेल करिअर मार्गदर्शन व रोजगाराच्या संधीबाबत ऑनलाईन वेबिनार

 

        हिंगोली (जिमाका), दि. 20 :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली अंतर्गत दि. 27 फेब्रुवारी, 2023 रोजी दुपारी 12.30 वाजता google meet https://meet.google.com/ypw-vdio-aiz या लिंकवर मॉडेल करिअर मार्गदर्शन व रोजगाराच्या संधीबाबत ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

            या ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये नवनाथ टोनपे, यंग प्रोफेशनल, मॉडेल करिअर सेंटर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली हे मार्गदर्शन करणार आहेत.

या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचा लाभ घेण्यासाठी https://meet.google.com/ypw-vdio-aiz या ऑनलाईन लिंकवर (meeting URL)  क्लिक करावे. आपल्याकडे गुगल मीट ॲप (google meet app)  यापूर्वी इन्स्टॉल केलेले नसेल तर इन्स्टॉल करुन घ्यावे. आपण गुगल मीट ॲप (google meet app)  मधून कनेक्ट झाल्यानंतर आस्क टू जॉइन (Ask to join) वर क्लिक करावे. या सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी 10 मिनिटे अगोदर जॉईन करावे. दिलेल्या लिंकमधून कनेक्ट झाल्यावर लगेच आपला व्हिडिओ व माईक बंद (Mute) करावा. सत्राच्या शेवटी काही प्रश्न विचारावयाचे असल्यास माईक सुरु (unmute) करुन विचारावे व लगेच माईक बंद करण्याची दक्षता घ्यावी. प्रश्न विचारताना मोजक्या शब्दात विचारावेत. या सर्व सूचनांचे पालन करुन मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी व्हावेत.

त्या अनुषंगाने जिल्ह्यातील उमेदवारांनी ऑनलाईन मोफत मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. रा. म. कोल्हे, सहायक आयुक्त , जिल्हा कौशल्य  विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. 

****