01 February, 2023

 

तोंडापूर येथील कृषि विज्ञान केंद्रात

सेंद्रीय शेती विषयी दोन दिवशीय प्रशिक्षण संपन्न

 



हिंगोली (जिमाका), दि. 01 : भारतीय अनुसंधान परिषद नवी दिल्ली , कृषी विज्ञान केंद्र हिंगोली व कृषी विभाग आत्मा, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत सेंद्रीय गटातील शेतकऱ्यांसाठी सेंद्रीय शेती या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. दोन दिवस दोन तुकड्यामध्ये हे प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात घेण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कृषी विद्या विशेषज्ञ प्रा. राजेश भालेराव यांनी कृषी विज्ञान केंद्राचे कार्य व प्रक्षेत्रावरील प्रात्यक्षिकांची सविस्तर माहिती देऊन कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली. प्रशिक्षणाच्या प्रथम सत्रामध्ये उदघाटनपर भाषणामध्ये कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी रासायनिक, सेंद्रीय आणि नैसर्गिक शेतीबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. यामध्ये सेंद्रीय शेती कशी  करावी. तसेच जीवामृत, बीजामृत, दशपर्णी अर्क, निमार्क यांचे महत्व समजावून सांगत सखोल मार्गदर्शन केले.

आत्माचे  तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक के. एस. घुगे यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना परंपरागत कृषी विकास योजनेची मार्गदर्शक तत्वे आणि सूचना, अंमलबजावणी आणि कर्तव्य याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करताना गट प्रवर्तक, शेतकरी उत्पादक कंपनी, तज्ज्ञ प्रशिक्षक यांची निवड व कार्य याची सवस्तिर माहिती उपस्थित शेतकऱ्यांना प्रशिक्षणामध्ये दिली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या मृदा शास्त्रज्ञ डॉ. पपिता गौरखेडे यांनी सेंद्रीय शेतीची संकल्पना, महत्व व तत्वे या विषयावर उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना सेंद्रीय शेतीची सुरुवात, सेंद्रीय शेतीचे महत्व, सेंद्रीय शेतीचे टप्पे, सेंद्रीय पीक उत्पादन व्यवस्थापन आणि सेंद्रीय शेतीतील संधी आणि आव्हाने  याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. आंतरराष्ट्रीय सेंद्रीय प्रमाणीकरण निरीक्षक हर्षल जैन यांनी या प्रशिक्षणामध्ये सेंद्रीय शेतीचे प्रामाणिकरणासाठी काय करावे व काय करु नये याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच सेंद्रीय प्रमाणीकरणाची गरज, प्रामाणिकरांच्या पद्धती आणि प्रमाणीकरण करण्यासाठी आवश्यक नोंदी याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन केले.

परभणी कृषी महाविद्यालयाच्या वनस्पती विकृती शास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. मिनाक्षी पाटील यांनी शेती बांधावरील प्रयोगशाळा, जमिनीमधील सूक्ष्म जीवांच्या वाढीसाठी स्थानिक कल्चर निर्मिती, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, अद्रक लसूण मिरची अर्क, जैविक अर्क, जैविक रोग व्यवस्थापनाचा मुख्य हेतू याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. कृषी विद्या विशेषज्ञ प्रा.राजेश भालेराव यांनी गांडूळ खत, जीवामृत, बीजामृत उत्पादन व निर्मिती युनिटचे प्रक्षेत्रावरील पाहणी व प्रात्यक्षिकाबाबत उपस्थित शेतकरी बांधवांना सखोल मार्गदर्शन करुन प्रक्षेत्रावर भेट दिली. मृदा शास्त्र विशेषज्ञ प्रा.साईनाथ खरात यांनी या प्रशिक्षणामध्ये जमिनीमधील सूक्ष्म जीवांच्या वाढीसाठी स्थानिक कल्चर निर्मिती कशाप्रकारे करता येईल याबद्दल सादरीकरण केले आणि मातीचा नमुना कसा घ्यावा याबद्दल उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. अकोल्याचे शिवाजी भारती यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना बायोडायनॅमिक कंपोस्ट नॅडेप इत्यादी घटकांची उत्पादन निर्मिती  व प्रात्यक्षिक करुन दाखविले.

हिंगोली येथील स्मार्ट प्रोजेक्टचे जिल्हा समन्वयक डॉ. जी. बी. बंटेवाड यांनी या प्रशिक्षणामध्ये उपस्थित शेतकरी बांधवांना परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत महिनानिहाय करावयाच्या कामाचे नियोजन व आराखडा कसा करायचा याचे सखोलपणे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला वसमत तालुक्यातील 265 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. राजेश भालेराव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.रोहिणी शिंदे, ओमप्रकाश गुडेवार, गुलाबराव सूर्यवंशी, संतोष हनवते, प्रेमदास जाधव,  आफ्रिन शेख, योगेश जाधव, ज्ञानेश्वर माने यांनी अथक परिश्रम केले.

****

No comments: