16 February, 2023

 

मुलांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी ‘जागरुक पालक, सुदृढ बालक’ अभियान

 


शून्य ते अठरा वर्षांपर्यंतची बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी ‘जागरुक पालक, सुदृढ बालक’ हे अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात दि. 9 फेब्रुवारी, 2023 पासून या अभियानाला सुरुवात झाली आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सुमारे 1297 शाळा व 2523 अंगणवाडीमधील 18 वर्षांखालील जवळपास 03 लाख 33 हजार 812 मुलांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 299 तपासणी पथकांमार्फत ही अभिनव योजना राबविली जात आहे.  काळाची गरज ओळखून बालकांना संदर्भसेवा, रोग निदान, औषधोपचार यासाठी नियोजित केलेले अभियान म्हणजे “जागरुक पालक, सुदृढ बालक होय. या अभियानात सहभागी होऊन प्रत्येकाने आपल्या बालकांची तपासणी करुन आपण जागरुक पालक असल्याचे दाखवून द्यावे.

अभियानाची रुपरेषा आणि उद्दिष्ट

राज्यातील 0 ते 18 वर्षापर्यंतची बालके तसेच किशोरवर्यीन मुला-मुलींच्या  सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, आदिवासी विभाग व समाजकल्याण विभाग यांच्या समन्वयाने हे अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे.

उद्दिष्ट :

  • 0 ते   18 वर्षापर्यंतच्या बालकांची व किशोरवयीन मुला-मुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करणे.
  • आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करणे.
  • गरजू आजारी बालकांना संदर्भ सेवा देऊन उपचार करणे. (उदा. औषधोपचार,शस्त्रक्रिया इ.)
  • प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे.
  • सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे.

राज्यातील शाळा/अगंणवाडी, शासकीय व निमशासकीय शाळा, खासगी शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, बालगृहे, अनाथालये, अंध, दिव्यांग शाळामधील विद्यार्थ्यांसह शाळाबाह्य विद्यार्थ्यांची तपासणी या मोहिमेअंतर्गत होणार आहे.

अशी असतील तपासणी पथके :

  1. ग्रामीण भागात- उपकेंद्राच्या संख्येनुसार (प्रती उपकेंद्र एक पथक).
  2. शहरी व महानगरपालिका विभाग- शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या संख्येनुसार (प्रती प्राथमिक आरोग्य केंद्रात एक)

तपासणीची ठिकाणे :

1) शासकीय निमशासकीय शाळा व कनिष्ठ महाविद्यालये.

2) खाजगी शाळा,

3) आश्रमशाळा

4) अंध शाळा, दिव्यांग शाळा

5) अंगणवाडया,

6) खाजगी  नर्सरी, बालवाड्या

7) बालगृहे, बालसुधार गृहे

8) अनाथ आश्रम,

9) समाज कल्याण व आदिवासी विभाग वस्तीगृहे (मुले/मुली),

10) शाळा बाह्य (यांचे उपरोक्त दिलेल्या नजीकच्या शासकीय शाळा व अंगणवाडीच्या ठिकाणी) मुले-मुली.

या अभियानांतर्गत बालकांच्या  तपासणीसाठी स्थानिक पातळीवर  बाल आरोग्य तपासणी पथक स्थापन करण्यात आले आहे.

प्राथमिक तपासणी पथक :

प्राथमिक स्तरावर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे (आरबीएसके) आरोग्य पथक असेल यामध्ये वैद्यकीय अधिकारी पुरुष/महिला, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी यांचा समावेश आहे. दुसरे भरारी पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक/ सेविका यांचा समावेश असणार आहे. तिसरे पथक हे बाल आरोग्य तपासणी पथक असणार आहे. या सर्व पथकांसोबत स्थानिक आशा व अंगणवाडी सेविका काम पाहणार आहेत.

या पथकामार्फत प्रतिदिन 150 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच शासकीय व खाजगी शाळा, अंगणवाडी यांच्या तपासणीचा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. ही पथके कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व अंगणवाडीला दररोज (सार्वजनिक सुट्टी दिवस वगळून) भेटी देणार असून तपासणीनंतर आवश्यकतेनुसार बालकांना  प्रथम, द्वितीय, तृतीय स्तरावर उपचाराकरिता संदर्भित करणार आहेत.

प्रथम स्तर तपासणी :

शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपग्रामीण रुग्णालये, सीएचसी, महापालिका रुग्णालये, प्रसुतीगृहांमध्ये ही प्रथमस्तर तपासणी होणार आहे. याअंतर्गत प्रा. आ. केंद्रामध्ये, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय/ उपजिल्हा रुग्णालये/सामुदायिक आरोग्य केंद्रे/महापालिका रुग्णालये/प्रसुतीगृहे येथे आठवड्यातून दोन वेळा (दर मंगळवारी व शुक्रवारी) तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार बालकांना पुढील उपचारासाठी संदर्भ सेवा देणार आहे.

द्वितीय स्तर तपासणी/संदर्भ सेवा :

शासकीय वैद्यकीय महाविद्यालये/महापालिका वैद्यकीय महाविद्यालये/दंत रुग्णालये/महिला रुग्णालये आदीमध्ये द्वितीय स्तर तपासणी होणार आहे. यामध्ये शल्य चिकित्सक, बालरोगतज्ञ, भिषक, स्त्रीरोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, नेत्र शल्य चिकित्सक, नेत्र चिकित्सा अधिकारी, त्वचारोग तज्ञ, दंतरोगतज्ञ, मानसिक रोग तज्ञ, जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महानगरपालिका रुग्णालय येथील सर्व विशेषतज्ञ सहभागी असणार आहेत. यामध्ये आठड्यातून  एकदा (दर शनिवारी) तपासणी होणार आहे. सर्व स्तर व तपासणीमध्ये उच्चस्तरीय उपचार व शस्त्रक्रियेची आश्यकता  असलेल्या बालकांना येथे संदर्भित करण्यात येणार आहे. तसेच अशा बालकांना पुढील उपचारासाठी करारबद्ध करण्यात आलेली खाजगी रुग्णालये, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना/प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालये व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये पाठविण्यात येणार आहे. 

अभियानाची पूर्व तयारी :

अभियानाचे नियोजन, अंमलबाजावणी व  आढावा घेण्यासाठी ग्रामीण व शहरी भागासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दल  स्थापन करण्यात आले आहे.

असे असेल अभियानाचे नियोजन :

  • हे अभियान कालबध्द पध्दतीने  8 आठड्यात  म्हणजे दि. 31 मार्च, 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
  • त्यादृष्टीने सर्व ग्रामीण, शहरी भागातील संस्थांचा / अधिकाऱ्यांचा आढावा घेवून वेळेत तपासणी पूर्ण होईल याकरिता सूक्ष्मकृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
  • यासाठी मनपा,नगरपालिका, जिल्हा, तालुका, आरोग्य संस्थास्तरावर नियोजन बैठक आयोजित करण्यात आल्या आहेत.

तपासणीचा सूक्ष्म कृती आराखडा

  • विविध स्तरावर प्रथम/द्वितीय स्तर पथके व बाल आरोग्य तपासणी पथक” स्थापन करणे.
  • पथकनिहाय त्यांच्या कार्यक्षेत्रानुसार तपासणी करिता सूक्ष्म कृती आराखडा तयार करणे.
  • प्रत्येक तपासणी पथकाने पूर्ण दिवसामध्ये किमान 150 विद्यार्थी तपासणीचे नियोजन करणे.
  • राष्ट्रीय बाल स्वास्थ्य केंद्राच्या पथकांमार्फत त्यांच्या नियोजनातील तपासणी करण्यात येणाऱ्या शाळा व अंगणवाडी वगळून कार्यक्षेत्रातील इतर सर्व उर्वरित शाळा अंगणवाडीच्या तपासणीचे गठित बाल आरोग्य तपासणी पथक” नियोजन करत आहे.
  • जिल्ह्यातील अंध-दिव्यांग शाळा, बालगृहे, अनाथ आश्रम, समाज कल्याण व आदिवासी विभाग वस्तीगृहे (मुले/मुली) यातील विद्यार्थ्यांची तपासणी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या पथकामार्फत करण्यात येणार आहेत.  

रुपरेषा

अ. तपासणी :

  • डोक्यापासून ते पायापर्यंतसविस्तर तपासणी
  • वजन व उंची घेवून सॅम/मॅम/बीएमआय(६ वर्षावरील बालकांमध्ये) काढणे
  • पद्धतशीर वैद्यकिय तपासणी करणे.
  • आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचे रक्तदाब व तापमान मोजणे व गरजू विद्यार्थ्यांना त्वरित उपचार वा संदर्भित करणे.
  • नवजात बालकांमधील जन्मजात व्यंग ओळखणे.
  • रक्ताक्षय,डोळ्यांचे आजार, गलगंड, स्वच्छ मुख अभियान, दंतविकार, हृदयरोग, क्षयरोग,
  • कुष्ठरोग, कॅन्सर, अस्थमा, एपिलेप्सी ई. आजारांच्या संशयित रुग्णांना ओळखून  त्वरित संदर्भित  करणे.
  • ऑटीझम, विकासात्मक विलंब, शिकण्याची अक्षमता (Learning Disability) इ. च्या संशयित रुग्णांना ओळखून त्वरित डीईआयसी येथे संदर्भित करणे.
  • किशोरवयीन मुला-मुलींमधील शारिरिक/मानसिक आजार शोधून त्यांना आवश्यकतेनुसार संदर्भित करावे. 

ब. उपाययोजना व औषधोपचार :

1. प्रत्येक आजारी बालकांवर औषधोपचार.

2. तपासण्या-नजीकच्या आरोग्य संस्थेमध्ये उपलब्ध सर्व रक्त-लघवी-थुंकी, एक्सरे/यूएसजी आदी तपासण्या आवश्यकतेनुसार करण्यात येणार आहेत.

3. डीईआयसी अंतर्गत आवश्यकतेनुसार बालकांना थेरपी, शस्त्रक्रिया.

4. न्युमोनिया,जंतुसंसर्ग, अतिसार, रक्तक्षय, दृष्टिदोष, दंतविकार, क्षयरोग, कुष्ठरोग, इ. व्याधींने आजारी असलेल्या बालकांना राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपचार होणार आहेत.

5. नवजात बालकासोबत आलेल्या मातेस स्तनपान, पोषण, बीएमआय (6 ते 18 वयोगटासाठी 18.5 ते 25 च्या दरम्यान ठेवण्याबाबत), मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती संदर्भात समुपदेशन करण्यात येणार आहे.

क. संदर्भ सेवा :

अंगणवाडी व शाळा स्तरावरील बालके/विद्यार्थ्यांच्या तपासणी दरम्यान आढळून येणाऱ्या आजाराच्या तीव्रतेनुसार पुढील योग्य ते उपचार करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय/उपजिल्हा रुग्णालय/जिल्हा रुग्णालय/डीईआयसी व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे.

राज्य शासनाने काळाची गरज ओळखून बालकांना संदर्भसेवा, रोग निदान, औषधोपचार यासाठी ही योजना सुरु केली आहे. प्रत्येक जागरुक पालकाने आपल्या पाल्याची तपासणी करुन तो सुदृढ कसा राहील यासंदर्भात जागरुक रहावे. बालके सुदृढ राहिले तरच आपला जिल्हा, राज्य, देश सुदृढ राहील…! 

 

                                                                                                                                       --  चंद्रकांत स. कारभारी

                                                                                                                                                माहिती सहायक

                                                                                                                                                जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

 

*****

No comments: