23 February, 2023

 

कळमनुरी तालुक्यातील देवजना येथे ग्राम बाल संरक्षण समितीची बैठक संपन्न

 


हिंगोली (जिमाका), दि. 23 :  कळमनुरी तालुक्यातील देवजना येथे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार ग्राम बाल संरक्षण समितीची बैठक दि. 21 फेब्रुवारी, 2023 रोजी घेण्यात आली.

या बैठकीत गावातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांविषयी तसेच ग्राम बाल संरक्षण समितीमध्ये नव्या 20 ते 30 वयोगटातील युवक-युवतीची बाल मित्र म्हणून निवड करण्यात यावी याविषयी चर्चा करण्यात आली. तसेच बाल कायद्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 विषयी सविस्तर माहिती सांगण्यात आली. ज्यामध्ये मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 असावे आणि जर मुलाचे व मुलीचे वय यापेक्षा कमी असेल तर असे विवाह बेकायदेशीर ठरले जातात व अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व 02 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा होऊ शकते. या विषयी पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. तसेच बाल विवाहाची कारणे व दुष्परिणाम या विषयी माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे यांनी दिली.

बाल विवाहास प्रतिबंध करण्यासाठी दि. 21 ऑक्टोंबर, 2022 रोजी दिलेल्या अधिसुचनेनुसार ग्राम सेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात बाल विवाह होऊ नयेत याबाबत खबरदारी घेण्यात यावी. तसेच विद्यार्थी शाळेत सतत 15 दिवस गैरहजर असेल तर संबंधित विद्यार्थ्याची नोंद करुन ग्राम सेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी यांच्याकडे देण्याबाबत तसेच गावात ज्यांचे ज्यांचे लग्न ठरलेले आहेत त्यांच्या वयाची पडताळणी करुन त्यापैकी कोणी अल्पवयीन आहे का ? याची शहानिशा करण्यबाबत जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कायदा तथा परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित यांनी माहिती दिली.

या बैठकीत ग्राम बाल संरक्षण समिती व पोलीस प्रशासनाच्या सहकार्यातून एका अल्पवयील बालिकेचा बाल विवाह थांबविण्यास जिल्हा बाल संरक्षण कक्षास यश आले. या बैठकीस पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे (पो.स्टे आ.बाळापुर), गावातील संरपंच प्रविणा वागमारे, ग्रामसेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी शेख समीर शेख समदानी, मुख्याध्यापक महेश शेवाळे, अंगणवाडी सेविका संगीता कल्याणकर, आशा वर्कर अरुणाबाई गाढे, ग्राम पंचायत सदस्या मंगल कल्याणकर, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

 

*****

 

No comments: