08 February, 2023

 

वेळेवर उपचार घेतल्यास भावी पिढी सुदृढ होईल

- अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी

 

* जागरुक पालक, सुदृढ बालक या कार्यक्रमाचे तालुकानिहाय आज उद्घाटन

 


हिंगोली (जिमाका), दि. 08 :  जागरुक पालक सुदृढ बालक या अभियानामध्ये 0 ते 18 वयोगटातील सर्व बालकांची तपासणी करुन त्यावर वेळेत रोग निदान व उपचार झाले तर भावी पिढी सुदृढ राहील,  असे मत अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी  यांनी व्यक्त केले .

जिल्ह्यात बाल सुरक्षा अभियानांतर्गत जागरुक पालक सुदृढ बालक अभियान राबविण्यासाठी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा टास्क फोर्स समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मिरदुडे, शिक्षणधिकारी प्राथमिक माध्यमिक,अदिवासी विभाग, सर्व वैद्यकीय अधीक्षक, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व गट शिक्षणाधिकारी, सर्व प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ) इत्यादी उपस्थित  होते.

यावेळी बोलताना अपर जिल्हाधिकारी श्री. परदेशी म्हणाले, संभाव्य दहावी व बारावीच्या परीक्षा लक्षात घेता प्राधान्यक्रम ठरवून सर्व बालकांची तपासणी करावी. तसेच सर्व शाळांना आरोग्य तपासणीचे वेळापत्रक उपलब्ध करुन द्यावे. शाळांच्या वेळेनुसार त्याची वेळ ठरवून तपासणी करावी.  सर्व सूचनाचे तंतोतत पालन करुन जागरुक पालक सुदृढ बालक या अभियानामध्ये 0 ते 18 वयोगटातील सर्व बालकांची तपासणी करुन हे अभियान शंभर टक्के यशस्वी करावे. तसेच या आरोग्य तपासणी अभियानात आढळलेल्या आजारी बालकावर वेळीच उपचार करुन त्याच्यावर औषधोपचार करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी

ही मोहीम सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री प्रा.तानाजी सावंत  यांनी दिलेल्या सूचनेनुसार या अभियानात 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालके तसेंच किशोरवयीन मुलामुलींना सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी  सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग, महिला बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग व समाज कल्याण विभाग यांच्या समन्वयाने संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील खासगी शाळा, आश्रम शाळा, दिव्यांग शाळा, अंगणवाडी, खाजगी नर्सरी बालवाडी, बालगृह, बाल सुधारग्रह, अनाथ आश्रम, समाज कल्याण व आदिवासी विभाग वस्तीगृहातील मुले/मुली यासह शाळा बाह्य मुले मुली असे अंदाजे 3 लाख 33 हजार 812 बालकांची तपासणी करण्यात येणार असल्याची सविस्तर माहिती दिली .

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार यांनी जागरुक पालक सुदृढ बालक या अभियानामध्ये बालकांची संपूर्ण तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणी अभियानात आजारी आढळून येणाऱ्या बालकावर तातडीने उपचार करण्यात येणार आहे. हे अभियान 9 फेब्रुवारी पासून संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. तसेच या दिवशी महाआरोग्य शिबीर व महारक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे, अशी माहिती दिली.

            जागरुक पालक, सुदृढ बालक या कार्यक्रमाचे तालुकानिहाय उद्घाटन 9 फेब्रुवारी रोजी खालील ठिकाणी होणार आहे. हिंगोली येथे बस स्थानकासमोरील माणिक स्मारक विद्यालयात, कळमनुरी तालुक्याचे उद्धाटन कार्यक्रम वारंगा फाटा येथील साई इंग्लीश स्कूलमध्ये, वसमत तालुक्याचे गुंडा येथील प्राथमिक शाळेत, औंढा नागनाथ तालुक्याचे जवळा बाजार येथील इंदिरा गांधी कन्या विद्यालयात व सेनगाव तालुक्याचे वरुड चक्रपान येथील ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये उद्घाटन होणार आहे.

अभियानाचे उ्दिष्टे : 0 ते 18 वयोगटातील बालकांची व किशोरवयीन मुला-मुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करणे. आजारी आढळलेल्या बालकावर त्वरित उपचार करणे .  गरजू आजारी बालकांना संदर्भ सेवा देऊन उपचार करणे. प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे. सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे हा आहे.

******

No comments: