बाल विवाहास पाठींबा दिल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी
- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश
हिंगोली (जिमाका), दि. 17 : जिल्ह्यातील लग्नविधी पार पाडणाऱ्या भटजी काजी,
भन्ते, ब्राह्मण, मंगल कार्यालय, प्रिंटीग प्रेस, फोटो ग्राफर, व्हिडीओ ग्राफर,
आचारी इत्यादीनी वधुवराच्या वयाची पडताळणी न करता बालविवाहास पाठिंबा दिल्यास
संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
यांच्या अध्यक्षतेखाली येत्या दि. 22 मे, 2023 रोजी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर
होणाऱ्या विवाहांमध्ये जिल्ह्यात कोठेही बाल विवाह होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील
लग्नविधी पार पाडणाऱ्या भटजी, काजी, भन्ते, ब्राह्मण, मंगल कार्यालय, प्रिंटीग प्रेस,
फोटो ग्राफर, व्हिडीओ ग्राफर, आचारी इत्यादीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर बोलत होते.
या बैठकीत बाल विवाह प्रतिबंध कायदा, 2006 नुसार बाल विवाह
प्रतिबंधक अधिनियम, 2006 नुसार मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 असावे असे निर्देशीत
करण्यात आलेले आहे. जर मुलाचे व मुलीचे वय यापेक्षा कमी असेल तर असे विवाह
बेकायदेशीर ठरले जातात. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी शालेय निर्गम उताऱ्यावरुन वधुवरांच्या
वयाची पडताळणी करुनच विवाहाची कामे करावीत. वयाची पडताळणी न करता विवाहात सामील झाल्यास,
तो विवाह बाल विवाह असल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्याविरुध्द कायदेशीर कडक कारवाई
करावी. तसेच जिल्ह्यात इतरत्र कोठेही बाल विवाह झाल्याचे निदर्शनास आल्यास बाल
विवाहात सामील झालेल्या प्रत्येक व्यक्तीवर व अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व 02
वर्ष सक्त मजुरीची शिक्षा अशी कठोर कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर यांनी दिले.
बाल विवाहास प्रतिबंध करण्यासाठी दि. 21 ऑक्टोंबर, 2022 रोजी
दिलेल्या अधिसूचनेनुसार ग्राम सेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी यांनी
त्यांच्या कार्यक्षेत्रात बाल विवाह होऊ नये, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना
दिल्या. तसेच विद्यार्थी शाळेत सतत 15 दिवस गैरहजर असेल तर संबंधित विद्यार्थ्यांची
नोंद करुन ग्रामसेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी यांच्याकडे माहिती देण्यात
यावी, असे आदेश श्री. पापळकर यांनी दिले.
या बैठकीस शिक्षणाधिकारी माधव सलगर, उपशिक्षणाधिकारी नितिन नेटके,
जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रतिनिधी डॉ. व्ही. वाय. करपे, विकास प्रिंटर्स, स्वयंवर
मंगल कार्यालयाचे स्वप्नील सोनपावाडे, सुरभी ऑफसेटचे आशिष राठोड, जिल्हा माहिती
अधिकारी यांचे प्रतिनिधी सी. एस. कारभारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
विठ्ठल शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी डॉ. प्रकाश जाधव, जिल्हा बाल
संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे,
कायदा तथा परिविक्षा अधिकारी अॅड. अनुराधा पंडित, समुपदेशक सचिन पठाडे सामाजिक
कार्यकर्ता रामप्रसाद मुडे उपस्थित होते.
*******
No comments:
Post a Comment