20 February, 2023

 

महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून शासन आपल्या दारी

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

  • पात्र उमेदवारांना जागेरच नियुक्ती पत्राचे वितरण

 




        हिंगोली (जिमाका), दि. 20 :  राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात पंडीत दीनदयाळ महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून शासन आपल्या दारी रोजगार घेऊन आले असून याचा लाभ सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले यावेळी केले .

            जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात भव्य पंडीत दीनदयाळ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . त्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन श्री. पापळकर बोलत होते. यावेळी माजी खासदार शिवाजीराव माने, माजी आमदार गजानन घुगे, रामदास पाटील, वसंतराव पालवे, शिवाजीराव मुटकुळे, फुलाजी शिंदे, हमीदभाई प्यारेवाले, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त डॉ.राजपाल कोल्हे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी व्ही. पी. रांगणे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आर. व्ही. बोथीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांची उपस्थिती होती. 

            जिल्हाधिकारी श्री. पापळकर पुढे म्हणाले, राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोंदणीसाठी क्यूआर कोड तयार करण्यात आला आहे. या क्यूआर कोडवर एकदा नोंदणी केल्यावर आपणास रोजगार उपलब्ध होईपर्यंत वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्याची तसेच रिक्त पदाची माहिती मिळणार आहे. त्यामुळे आपणास रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यासाठी उद्योजक कंपन्या या रोजगार मेळाव्यात येऊन आपली निवड करणार आहेत. या रोजगार मेळाव्यामुळे तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाला स्थैर्य मिळवून देण्याचा उद्देश आहे. तसेच ज्यांना स्वयंरोजगार करावयाचा आहे त्यांनाही स्वयंरोजगार उभारण्यासाठी प्रशिक्षण देण्याची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी आपणाकडे असलेल्या कौशल्याचा वापर करुन रोजगार व स्वयंरोजगार मिळवून स्वावलंबी व्हावे आणि आपला व जिल्ह्याचा कायापालट करावा, असे आवाहनही श्री. पापळकर यांनी यावेळी केले.

            याप्रसंगी बोलताना शिवाजीराव मुटकुळे यांनी पंडित दीनदयाळ महारोजगार मेळाव्यामुळे बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची मोठी संधी निर्माण झाली आहे. यापुढेही असे मेळावे आयोजित करावेत, असे सांगून उपस्थित बेरोजगार उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.  

            पंडित दीनदयाल महारोजगार मेळाव्याचे प्रथमच जिल्ह्यात आयोजन करण्यात येत आहे. या रोजगार मेळाव्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. तसेच मुलांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे राज्य शासनातर्फे सुशिक्षित बेरोजगार उमेदवाराची नोंदणी करण्यासाठी क्यूआर कोड विकसित करण्यात आले आहे. या माध्यमातून तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आपल्याला रोजगार उपलब्ध होईपर्यंत या ॲपच्या माध्यमातून रोजगार (जॉब)चे  संदेश मिळणार आहेत. तसेच आपल्याला रोजगार मिळाला का नाही याचे ट्रॅकींग करण्यात येणार आहे. या संधीच्या माध्यमातून आपली गुणवत्ता वाढवली पाहिजे. तसेच हिंगोलीच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे रामदास पाटील यांनी सांगितले.

            प्रत्येक बेरोजगार उमेदवाराला रोजगार मिळाला पाहिजे ही प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांची सकल्पना आहे. त्यामुळे राज्य शासनाने कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे शासन आपल्या दारात येऊन नोकऱ्या देण्यासाठी येथे आले आहे. या मेळाव्यात आपल्या कौशल्यानुसार रोजगार स्वीकारुन स्वावलंबी बनावे, असे सांगून उपस्थित सर्व बेरोजगार युवकांना माजी आमदार गजानन घुगे यांनी शुभेच्छा दिल्या.

            सध्या शासनाने कौशल्यावर आधारित शिक्षणाला प्राधान्य दिले आहे. देशातले उत्पादन वाढवण्यासाठी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे आपल्या कौशल्यानुसार आपल्या आवडीचा व्यवसाय निवडावा, असे सांगून माजी खासदार शिवाजीराव माने यांनी उपस्थित युवकांना शुभेच्छा दिल्या.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविकात कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त डॉ.राजपाल कोल्हे यांनी महारोजगार मेळावा आयोजनाची भूमिका विशद करताना लोकप्रतिनिधी  आणि शासन यांच्या पुढाकारामुळे या रोजगार मेळाव्याला भव्य प्रतिसाद मिळाला असल्याचे सांगितले.

            या महारोजगार मेळाव्यात सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना जागेवरच प्राथमिक नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी सुशिक्षित बेरोजगार युवकांनी जागेवर नियुक्ती पत्र मिळाल्यामुळे व रोजगार उपलब्ध करुन दिल्यामुळे शासनाचे आभार मानले .

या रोजगार मेळाव्यात युवाशक्ती स्कील इंडिया प्रा.लि.पुणे (महिंद्रा ॲन्ड महिंद्रा पुणे, एन्डयुरन्स औरंगाबाद), धूत द्रान्समिशन औरंगाबाद, परम स्कील ट्रेनिंग इंडिया प्रा.लि. औरंगाबाद, डीएसटीए एज्युकेशन फाऊंडेशन एमआयडीसी चिंचवड पुणे, अभिनव इंन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट मुंबई, ठाणे, नाशिक, आर्मस इ.प्रा.लि. वाळूज औरंगाबाद, इम्पेरेटीव्ह बिझनेस वेंन्चर्स प्रा.लि.ठाणे, टॅलेनसेतू सर्व्हिस प्रा.लि.पुणे, श्रीकृपा सर्व्हिस प्रा.लि.पुणे, एक्साईड इंडस्ट्रीज लि.औरंगाबाद, भारतीय जीवन विमा निगम हिंगोली, रक्षा सिक्युरिटी फोर्स हिंगोली, मनसा मोटर्स प्रा.लि.हिंगोली, एसबीआय लाईफ इंन्शूरन्स हिंगोली, बन्सल कोचिंग क्लासेस अशा महाराष्ट्रातील नामांकित कंपन्या सहभागी झाले होते .

या रोजगार मेळाव्याचे सूत्रसंचालन ए. बी. भुसारे यांनी केले तर आभार जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी व्ही. पी. रांगणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन व स्वागत गाऊन कार्यक्रमाला सुरुवात केली. या रोजगार मेळाव्यास मोठ्या संख्येने सुशिक्षित बेरोजगार उमेदवार उपस्थित होते.

*****

No comments: