09 February, 2023

 

तृणधान्याचा आहारात समावेश काळाची गरज…!

 


आधुनिक जीवनशैलीनुसार मानवाच्या दैनंदिन आहारात बदल झाला आहे. या बदलत्या आहारामुळे शरीरास आवश्यक पोषक तत्त्वांची उणीव भरुन काढून होणाऱ्या आजारांवर मात करण्याची गरज निर्माण झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी पांरपरिक आहाराला चालना देवून सर्वसामान्यांना आरोग्यसंपन्न जीवन जगता यावे यासाठी शासनाने पौष्टिक तृणधान्याचा आहारात वापर वाढविण्याचा अभिनव कार्यक्रम हाती घेतला आहे. भविष्यातील सुदृढ व आरोग्यदायी समाजासाठी प्रत्येकानेच या कार्यक्रमाचा भाग होवून पौष्टिक तृणधान्यांचा आहारात नियमित वापर करणे ही काळाची गरज बनली आहे.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पौष्टिक तृणधान्य रथाचा शुभारंभ करुन जिल्ह्यात जनजागृती करण्यासाठी रवाना करण्यात आला आहे. या प्रबोधनामुळे जिल्ह्यातील जनतेचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल तर पौ‍ष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादन व उत्पन्न वाढीमुळे बळीराजा सुखावेल.

संयुक्त राष्ट्रसंघाचा ठराव

भारताने इतर काही देशांच्या मदतीने तृणधान्याचे महत्व सर्व राष्ट्रांना समजावे म्हणून आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष हा ठराव संयुक्त राष्ट्र संघात मांडला. 70 देशांनी या ठरावाला अनुमोदन दिले आणि महत्त्वाचे म्हणजे सर्व 193 सदस्य राष्ट्रांनी भारताच्या या प्रयत्नाचे कौतुक करत हा ठराव बहुमताने मंजूर केला. आपल्या देशाच्या या प्रयत्नामुळेच 3 मार्च 2021 रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून साजरे करण्याचे ठरले आणि सर्व सदस्य राष्ट्रांनी त्या दिशेने प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे.

‘पौष्टिक तृणधान्य दिन’

वर्षारंभी मकर संक्रांत-भोगी या सणाला पौष्टिक तृणधान्ययुक्त पदार्थांचा आहारामध्ये वापर करण्याची परंपरा आहे. ही बाब लक्षात घेता राज्य शासनाने पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व अधोरेखित करण्यासाठी मकर संक्रांती-भोगी हा ‘पौष्टिक तृणधान्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

असा आहे हा कार्यक्रम

भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी दरवर्षी साजरा करतात. ‘न खाई भोगी, तो सदा रोगी’ हा वाक्‍प्रचार सर्वत्र रुढ आहेच. ह्या सणाला शेतात ताज्या पिकलेल्या पालेभाज्या व फळभाज्या वापरुन बनवलेली भोगीची विशेष भाजी, तीळ लावलेली बाजरीच्या भाकरीचे सेवन करतात.

ज्वारी, बाजरी, नाचणी ही प्रमुख तृणधान्ये तर राळा, वरई, कोद्रा, सावा व राजगिरा ही इतर लघु तृणधान्ये आपली पारंपरिक पिके आहेत. पूर्वीपासून आपल्या आहारात असलेल्या या तृणधान्यांचा वापर शहरीकरणाच्या व पाश्चात्य अनुकरणाच्या ओघात कमी होत गेल्याचे कटू सत्य तर पिझ्झा, बर्गर आदी जंकफुडचा अवास्तव उपयोग वाढल्याचे चित्र आपल्या समोर आहे. परिणामी मधुमेह, उच्च रक्तदाब व लठ्ठपणा असे विकार वाढत आहेत. याचे दुष्परिणाम पाश्चिमात्य देशांच्या लक्षात आले आहेत, म्हणूनच कोरोनानंतर आरोग्यविषयक सजगता वाढून या देशांमध्ये पौष्टिक तृणधान्याची मागणी वाढल्याचा अहवाल आहे.

पौष्टिक तृणधान्याचा असा होतो फायदा

पौष्टिक तृणधान्यात जीवनसत्वे व खनिजांचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते. त्याचा ‘ग्लायसेमिक इंडेक्स’ म्हणजे रक्तातील साखरेवर होणारा परिणाम कमी असल्याने ती मधुमेह रोधक आहेत. तसेच काही पिके ‘ग्लुटेन फ्री’ असल्याने ही पचनाला उत्तम ठरतात. तसेच त्यात तंतुमय पदार्थ, ॲण्टिऑक्सिडंट आणि रोगांना प्रतिकार करण्याचे गुणधर्म आहेत. ही तृणधान्ये कॅल्शीयम, लोह, झिंक, आयोडीन इत्यादी सूक्ष्म पोषक घटकांमध्ये समृद्ध आहेत. ग्लुटेनमुक्त असल्याने गव्हासाठी एक पर्याय म्हणून याचा वापर केला जातो.

शासनाचा पुढाकार

तृणधान्यापासून बनवलेले पदार्थ पचायला हलके व पौष्टिक असल्याने आरोग्यविषयक समस्यांवर शहरी नागरिकांमध्ये त्याविषयी जागरुकता वाढत आहे. तृणधान्य पिकांचे ग्राहक वाढत असल्याने त्याचा थेट फायदा या धान्य उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. राज्य शासनामार्फत देखील आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व, त्यांच्यातील औषधी व पौष्टिक गुणधर्माचे फायदे नागरिकांना पटवून देण्यासोबतच तृणधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढ कार्यक्रम हाती घेण्यात आला असून राज्यातील तृणधान्य उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.

तृणधान्य उत्पादनाचे शेतकऱ्यांना होणारे सर्वसाधारण फायदे

शेतकऱ्यांसाठी तृणधान्य उत्पादनाचे सर्वसाधारण फायद्यांचा विचार केल्यास कमी गुंतवणुकीत ही पिके घेता येतात. इतर पिकांच्या तुलनेत या पिकांना कमी पाणी लागते तसेच ती वातावरणाचा ताण सहन करु शकतात, तृणधान्य पिकांची वेगाने वाढ होते. इतर पिकांच्या तुलनेत या पिकांबाबत कीड-रोग समस्या फारशा नाहीत. कमी क्षेत्रातही ही पिके यशस्वीरित्या घेतली जावू शकतात. स्वास्थ्य आहारासोबतच जनावरांनाही चारा पुरवतात. कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्नास पौष्टिक तृणधान्य पिके पूरक आहेत.

उत्पादकता वाढवण्यावर भर 

पौष्टिक तृणधान्य पिकाचे उत्पादन प्रामुख्याने कोरडवाहू भागात होते. कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांची पौष्टिक तृणधान्याची पीक पद्धती टिकून रहावी, याकरिता सुधारित बियाणे व अवजारे यांचा विविध योजनांद्वारे पुरवठा करुन उत्पादकता वाढवण्यावर महाराष्ट्र शासनातर्फे भर देण्यात येणार आहे. तसेच शासनातर्फे पौष्टिक तृणधान्य पिकाच्या प्रक्रिया व मूल्यसाखळी विकसनावर भर देण्यात येत आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांकडून उत्पादित मालाचे मूल्यवर्धन होईल.या निमित्ताने पौष्टिक तृणधान्याचा खप वाढेल आणि त्याचा फायदा कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांच्या उत्पादनाला अधिक भाव मिळवून देण्यास सहाय्यभूत ठरेल.

मिलेट ऑफ दि मंथ संकल्पना :

            भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये पौष्टिक तृणधान्य पिकांच्या सेवनाला पूर्वापार महत्व आहे. ही बाब विचारात घेऊन मिलेट ऑफ दि मंथ म्हणजेच ‘तृणधान्य विशेष महिना’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे.

            1) मकर संक्रात, भोगी सणानिमित्त जानेवारी महिना हा बाजरी पिकासाठी समर्पित करण्यात आला आहे. हिवाळ्यामध्ये बाजरी खाणे हे शरीरासाठी पोषक असते.

            2) फेब्रुवारी महिन्यात सर्वत्र ज्वारी पिकाचा हुरडा खाल्ला जातो म्हणून फेब्रुवारी महिना ज्वारी पिकासाठी समर्पित करण्यात आला आहे.

            3) राजगिरा याचा श्रावणातील उपवासात केला जाणारा वापर विचारात घेऊन ऑगस्ट महिना राजगिरा पिकासाठी समर्पित करण्यात आला आहे.

            4) पितृ पंधरवाड्यामध्ये राळ्याच्या भाताला पारंपारिक महत्व आहे. यानिमित्त सप्टेंबर महिना राळा पिकासाठी समर्पित करण्यात आला आहे.

            5) माहे ऑक्टोबर मध्ये साजरा केला जाणारा नवरात्र उत्सवानिमित्त उपवासात वरई (भगर) यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यासाठी ऑक्टोबर महिना वरई पिकासाठी समर्पित करण्यात आला आहे.

            6) रागी/नाचणी या पिकांची काढणी नोव्हेंबर दरम्यान संपते त्यानंतर तिचा वापर आहारात करणे सुरु होते. यामुळे डिसेंबर महिना हा नाचणी पिकासाठी समर्पित केला आहे.          

            मिलेट ऑफ दि मंथ म्हणजेच ‘तृणधान्य विशेष महिना’ ही संकल्पना जनमानसात रुजविण्यासाठी त्या त्या महिन्यात संबंधित पिकांबाबत गाव पातळीपर्यंत जनजागृती मोहिम घेण्यात येत आहे. यासाठी ग्रामसभेत ही संकल्पना मांडून पिकाचे महत्व, पोषण मूल्य, उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान, कृषि विभागाचे धोरण याविषयी माहिती देण्यात येत आहे. 

हिंगोली जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी

जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत पौष्टिक तृणधान्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक किड व्यवस्थापन, सुधारित कृषी औजारे, पीक पद्धतीवर आधारित प्रशिक्षण या बाबींवर कृषी विभागाने लक्ष केंद्रीत केले आहे.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त कृषि विभागाने जिल्ह्यात इतर विभागाच्या सहायाने महिनानिहाय वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याचाच भाग म्हणून फेब्रुवारी, 2023 मध्ये ज्वारी पिक प्रात्यक्षिकास भेट, पौष्टिक तृणधान्य जनजागृती, ज्वारीपासून विविध खाद्य पदार्थ, रब्बी ज्वारीचे मानवी आहारातील महत्व, पौष्टिक तृणधान्य शेतकरी मेळावा, पौष्टिक तृणधान्य महिला प्रशिक्षण, पौष्टिक तृणधान्य शेतकरी गट प्रशिक्षण आदी विविध उपक्रम जिल्हाभरात राबविण्यात येत आहेत.

तृणधान्यांचे पोषणमूल्य

ज्वारी : रक्तातील सारखेची पातळी नियंत्रित करते. रक्ताभिसरण वाढवते. ज्वारी वजन कमी करण्यास मदत करते. हाडांच्या आरोग्यासाठी ज्वारी उपयुक्त ठरते. शरीरातील ऊर्जा पातळी सुधारते. तसेच ह्रदयाचे आरोग्यही ज्वारीमुळे सुधारते.

बाजरी : बाजरीमध्ये कॅल्शियम, विटामिन  ए, बी व फॉस्फरस, लोह, मँगेनीज अधिक मात्रेत उपलब्ध असते. रक्तातील मेदाचे प्रमाण नियंत्रित ठेवते तर रक्तदाबावर नियंत्रण, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी व ॲनेमिया आजारावर मात करण्यासाठी बाजरी उपयुक्त आहे.

नाचणी : शक्तीवर्धक, पित्तशामक असल्याने नाचणी रक्त शुद्ध करण्यास उपयुक्त आहे. कॅल्शियम आणि लोह मुबलक असल्याने गरोदर माता व वयोवृद्ध व्यक्तींना हाडांसाठी व ॲनिमियावर नाचणीचे पदार्थ उपयोगी ठरतात. नाचणीमुळे लठ्ठपणा कमी करणे, मधुमेही रुग्णांसाठी गुणकारी, यकृतातील चरबी कमी करण्यास मदत होते.

राळा : यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढवते. त्यातील अँटीऑक्सिडन्ट हा गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. मोड आलेले राळा खाल्यास हाडांचा ठिसूळपणा कमी होऊन हाडे बळकट होतात. तसेच अर्धशिशी, निद्रानाश, कॉलरा, ताप यांच्या उपचार पद्धतीमध्ये राळ्याचा प्रामुख्याने वापर होतो.

वरई : नवजात शिशु, बालक आणि माता यांच्यासाठी उत्तम पोषकधान्य आहे. सदृढ आरोग्य व रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यास वरई उपयुक्त आहे.  आहारामध्ये वरईचा (भगर)  वापर केल्याने मधुमेह, ह्रदयरोग यासारख्या रोगांचा धोका कमी होऊ शकतो.

तृणधान्य पिकांमधील पोषक मूल्यांमुळे परिपूर्ण आहार आणि पोषण संरक्षण मिळते. हा आहार लहान बालके, गरोदर स्त्रीया, यांच्यासह सर्वच वयोगटातील नागरिकांना आरोग्यवर्धक ठरत असल्याने तृणधान्य पिकांची मागणी वाढत आहे. ‘विकेल ते पिकेल’ अंतर्गत शेतकऱ्यांसाठी ही पिके आर्थिक फायदेशीर ठरणार आहेत. भविष्यातील कल पाहता सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यासाठी तसेच शेतकरी वर्गाला आर्थिक उत्पन्न वाढीसाठी तृणधान्य पिके फायदेशीर ठरणार आहेत. चला तर मग सर्वांनी तृणधान्य पिकांचा वापर करु या …!

                                                                                                       --  चंद्रकांत स. कारभारी

                                                                                                            माहिती सहायक

                                                                                                            जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

*****

 

No comments: