सिंचन
विहिरींकरिता पात्र लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतीमार्फत अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 30 :- “समृध्द महाराष्ट्र
जनकल्याण योजने” अंतर्गत हिंगोली जिल्ह्याकरिता 10 हजार सिंचन विहिरीचे
उद्दिष्ट महात्मा गांधी नरेगा अंतर्गत शासनाकडून दि. 28 ऑक्टोबर, 2016 च्या पत्रकान्वये
प्राप्त झाले आहे. यानुसार यापुर्वी दि. 07 नोव्हेंबर, 2016 रोजी सर्व शेतकऱ्यांचे
माहितीसाठी वृत्तपत्रात बातमी प्रसिध्द केली आहे. सदर वैयक्तिक लाभाच्या कामाच्या लाभार्थी
निवडीसाठी ग्रामस्तरावर विशेष ग्रामसभांचे आयोजन करून त्यामध्ये ग्रामसभेने निवडलेल्या
पात्र लाभार्थ्यांचे विहित नमुन्यातील अर्ज ग्रामपंचायतीने भरून द्यावयाचे आहेत. ग्रामपंचायतीने
सदर प्राप्त प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी पंचायत समिती कडे सादर करावयाचे आहेत. तांत्रिक
मान्यता प्राप्त प्रस्तावाना गट विकास अधिकारी पंचायत समिती यांनी प्रशासकीय मान्यता
द्यावयाची आहे. प्रशासकीय मान्यता प्राप्त सिंचन विहिरीच्या कामांची संबंधित तांत्रिक
अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय आखणी करुन व प्रत्यक्ष कामास सुरूवात करून दि. 15 मार्च,
2017 पर्यंत कामे पुर्ण करून काम पुर्णत्वाचे प्रमाणपत्र ऑनलाईन करावयाचे आहेत.
सिंचन विहिरींच्या लाभार्थी निवडीची प्रक्रिया शासन
नियमाप्रमाणे पारदर्शकरित्या करण्यात येणार असून यासाठी लाभार्थ्यांनी दलालामार्फत,
एजंटामार्फत देण्यात येणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या आमिषांना, भुलथापांना बळी पडु नये,
सर्व इच्छूक शेतकरी यांनी सिंचन विहिरीच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत काही
अडचणी असल्यास किंवा काही तक्रारी असल्यास तसे जिल्हाधिकारी कार्यालय (रोहयो शाखा)
हिंगोलीशी संपर्क साधावा व लेखी तक्रारी दाखल केल्यास सदर तक्रारीची गंभीर दखल घेऊन
चौकशी केली जाईल व दोषी अधिकारी/कर्मचारी यांच्या विरुध्द शिस्त भंगाची कार्यवाही केली
जाईल, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****