अल्पसंख्यांक
समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी शिक्षण महत्वाचे
---
जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी
हिंगोली,
दि.19:- अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात
आणण्यासाठी शिक्षण हे सगळ्यात प्रभावी माध्यम आहे. तसेच अल्पसंख्यांकाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन सदैव संवेदनशिल
आणि कटिबध्द आहे. समाजाच्या
सर्वांगिण विकासासाठी अल्पसंख्याक समाजाला शिक्षणाची संधी
मिळवून देणे महत्वाचे आहे, असे जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित अल्पसंख्यांक
हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानावरून श्री. अनिल भंडारी बोलत होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात यावेळी अप्पर
जिल्हाधिकारी राम गगराणी, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, उपशिक्षणाधिकारी
डी. आर. गुप्ता, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक शिवाजी राऊत, माजी
नगराध्यक्षा अनिताताई सुर्यतळ, राज्य
संघटक महाराष्ट्र राज्य बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र संघाचे डॉ. विजयकुमार निलावार , साप्ताहिक
पुसेगाव की खबरचे संपादक नजीर अहेमद, सिध्दीक अहेमद अब्दुल खुद्दुस, बुऱ्हाण
पहेलवान, प्रकाश सोनी , धरमचंद्र बडेरीजी आदींचीही व्याख्याने झाली.
जिल्हाधिकारी श्री. भंडारी पुढे
म्हणाले की, व्यक्तिच्या जडणघडणीत आणि सुसंस्कृत समाजाच्या उभारणीमध्ये शिक्षणाची
भूमिका महत्वाची आहे. विशेषतः ग्रामीण
भागातील तसेच दुर्बल घटकांना शिक्षणाची
संधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. अल्पसंख्याक समाजाच्या प्रगतीमध्ये या समाजातील
मुलींची प्रगती हा महत्वाचा टप्पा आहे. अल्पसंख्याक समाजाची सामाजिक, आर्थिक
उन्नती होण्यात समाजातील सुशिक्षित मुलीं-स्त्रीयांची भूमिका महत्वाची ठरणारी आहे,
त्यादृ्ष्टीने बदलत्या काळानुसार कौशल्याधारीत शिक्षण देण्यावर विशेष भर द्यावा,
प्रसार व प्रचार यावरही भर देण्यात यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
देशाच्या
स्वातंत्र्य लढ्यात आणि नंतर देश उभारणीसाठी अल्पसंख्यांक समाजाने दिलेल्या
योगदानाचा गौरवपुर्ण उल्लेख करुन जिल्हाधिकारी अनिल भंडारी म्हणाले की, शिक्षणाने
जगण्याचे शहाणपण प्राप्त होत असते. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तिला
शिक्षणाची संधी मिळाली पाहीजे. त्यादृष्टीने ग्रामीण भागातील शाळांची गुणवत्ता वृद्धीगंत करणे व अल्पसंख्यांकपर्यंत
योजनाचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे.
अल्पसंख्याकांच्या विकासाठी विभागामार्फत भरीव प्रयत्न केले जात असुन
मुलींचे शिक्षणातील प्रमाण वाढण्यासाठी शिष्यवृर्ती, मोफत शिक्षणाची संधी, वसतिगृहाची
सुविधा यासारख्या विविध उपयुक्त योजना राबण्यात येत आहेत. उच्च शिक्षित
विद्यार्थ्यांना रोजगार, व्यवसाय करण्यासाठी विभागामार्फत बिनव्याजी कर्ज उपलब्ध
करुन देण्यात येत आहे. याचाही लाभ अल्पसंख्यांक
समाजानी घ्यावा, असे जिल्हाधिकारी श्री. भंडारी यांनी सांगितले.
अप्पर जिल्हाधिकारी श्री. राम
गगराणी म्हणाले की, अल्पसंख्याकांसाठीच्या योजनांचा प्रसार व प्रचार, प्रसिध्दी
होणे आवश्यक आहे. ती आपल्यापासून सुरुवात करावी त्यामुळे योजनांचा फायदा शेवटच्या
घटकापर्यंत पोहचतील.
राज्य
संघटक महाराष्ट्र राज्य बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र संघाचे डॉ. विजयकुमार निलावार
यांनी अल्पसंख्यांक व बहुसंख्यांक यांचा सलोखा निर्माण करावा. तसेच हम सब एक है
अशी भावना निर्माण करावी , असे त्यांनी सांगितले.
माजी
नगराध्यक्षा श्रीमती अनिताताई सुर्यतळ म्हणाल्या की, शिक्षणाकडे पाहण्याचा
दृष्टीकोन सकारात्मकतेने घ्यावा. तसेच आपल्या मानसिकतेत बदल घडवून आणणे गरजेचे
आहे. शिक्षणामुळे स्त्री सक्षम बनते व माणूस म्हणून ओळख निर्माण होते.
या कार्यक्रमाला विविध विभागांचे
विभागप्रमुख,प्राध्यापक,विद्यार्थी,मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागतपर भाषण जिल्हा समन्वयक मानव विकास एम. एम. राऊत
यांनी केले. तर आभार जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी यांनी मानले.
विद्यार्थ्यांना
पुरस्काराचे वितरण
जिल्ह्यात जिल्हास्तरीय भिंतीपत्रक
स्पर्धा, निंबध स्पर्धा निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. सदर
पुरस्काराचे वितरण जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी व अन्य व्यासपिठावरील
मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करुन सत्कार करण्यात आला.
भिंतीपत्रक स्पर्धेमध्ये प्रथम
क्रमांक हिंगोली येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेची इयत्ता नववीमधील
विद्यार्थींनी कु. सिमा
आनंदा अंभोरे , द्वितीय क्रमांक सरजुदेवी भिकुला भारुका विद्यालयाची विद्यार्थींनी इयत्ता आठवीमधील कु. अवंतिका उत्तमराव शिंदे तर तृतीय
क्रमांक श्रीमती गोदावरीबाई कागलीवाल विद्यालयाची इयत्ता नववीमधील विद्यार्थींनी
कु. कमल लक्ष्मण मांडगे .
निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक भारतीय
विद्यामंदिरची विद्यार्थींनी इयत्ता नववीची कु. गौरी राम शेटे, द्वितीय क्रमांक बहुविध
प्रशालेची विद्यार्थींनी इयत्ता नववीची कु. महेविश शहाबाज खाँ पठाण, तृतीय क्रमांक
श्रीमती गोदावरीबाई कागलीवाल विद्यालयाची इयत्ता नववीमधील विद्यार्थींनी कु.
साक्षी बाळू सुर्वे यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम
क्रमांक बाबुराव पाटील महाविद्यालयाची इयत्ता बारावीची कु. स्मिता सर्जेराव कवडे, द्वितीय
क्रमांक मौलाना आझाद ऊर्दू विद्यालयाची इयत्ता बारावीची कु. हिना कौसर वहिदुल्ला
खाँन , तृतीय क्रमांक मौलाना आझाद ऊर्दू विद्यालयाची इयत्ता बारावीची कु. जैनेब
फातेमा सरफराज खाँन .
****
No comments:
Post a Comment