जिल्हा वार्षिक योजनेतून 163
कोटींच्या प्रारूप आराखडयास मान्यता
हिंगोली, दि.28: जिल्हा वार्षिक योजनेच्या
सर्वसाधारण योजनेतंर्गत सन 2017-18 या वर्षासाठी अंमलबजावणीकरीता विभागांनी विविध
योजनासांठी 330 कोटी 45 लाख 45 हजार एवढी मागणी केली असता जिल्हा नियोजन समितीने
प्रत्यक्ष 163 कोटी 85 लाख 89 हजार खर्चाच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन
समितीच्या बैठकीत आज पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता
देण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीस यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा
श्रीमती लक्ष्मीबाई यशवंते, सर्वश्री आमदार तान्हाजी मुटकूळे, डॉ. जयप्रकाश
मुंदडा, डॉ. संतोष टारफे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी
अधिकारी एच. पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी नियोजन समिती सदस्य यांची
उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे
म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत स्वच्छ भारत अभियान, सिंचन, जलसंधारण,
ग्रामीण रस्त्यांच्या कामांना सन 2017-18 च्या आराखड्यात प्राधान्य देण्यात आले.
उपलब्ध निधीचे योग्य नियोजन करुन सदर निधी लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी
वेळेत खर्च करावा. तसेच सन 2016-17 आराखड्यातील विविध कामांवर झालेल्या खर्चाचा
तसेच नियोजित प्रस्तावित खर्चाचा देखील आढावा घेतला. तसेच सर्वसाधारण वार्षिक
योजना, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती उपयोजनेतंर्गत नाविन्यपूर्ण योजना,
केंद्र पुरस्कृत योजनांसाठी झालेल्या खर्चाचा व नियोजित खर्चाचा आढावा घेतला. वन,
पर्यटन विकास, शिक्षण, व्यवसाय शिक्षण, जलसंधारण, आरोग्य, ग्रामीण नळ पाणीपुरवठा,
स्वच्छ भारत अभियान आदीबाबतही संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा
घेतला. जिल्हा परिषद निवडणुक आचारसंहितेचा विचार करुन सर्व विभागप्रमुखांनी योग्य
नियोजन करुन कामांना गती द्यावी अशा सूचना हि पालकमंत्री कांबळे यांनी यावेळी
दिल्या.
तसेच आमदारांनी देखील आमदार
निधीचा उपयोग आपल्या कार्यक्षेत्रातील विकासकामाकरीता करावा. सन 2017-18 साठी
सर्वसाधारण वार्षिक योजनाकरीता 85 कोटी 73 लाख तर अनुसूचित जाती उपयोजनाकरीता 48
कोटी 95 लाख 59 हजार आणि अनुसूचित जमाती उपयोजनेतंर्गत 29 कोटी 17 लाख 30 हजार अशा
एकुण 163 कोटी 85 लाख 89 हजार खर्चाच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन
समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
यावेळी बैठकीस जिल्हा नियोजन
समितीचे सदस्य जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, यांच्यासह विविध विभागातील
विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
*****
No comments:
Post a Comment